सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 164
☆ युगांतर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
शांत धरित्री शांत सरोवर
एक मी आणि एकाकी हे मन….
आयुष्याच्या सायंकाळी,
उमगली नात्यातील….
सूक्ष्म शी कळ !
असंख्य नाती अवती भवती,
स्नेह, जिव्हाळा,
असतो कोठे ?
वाढत जाते असेच अंतर …
शांत धरित्री शांत सरोवर…
मनात मात्र अजून खळबळ
एकाकी मन शोधत राही,
हरवलेले ते आपलेपण!
नसेच काही इथले शाश्वत,
परंतु दिसले काल अचानक,
तुझ्या डोळ्यातील,
ते गहिरेपण,
की या जन्माचे हे…
अनुबंधन ??
रक्ताचीच ओढ रक्ताला,
मिटले वादळ,
मिटले ..आक्रंदन….
वाद विवाद ही मिटून गेले !
तुझ्या मिठीतच बहिणाबाई…
आताच झाले इथे युगांतर…
अखंड घडते, घडत रहाते…
रोजच येथे एक महाभारत..
शांत धरित्री.. शांत सरोवर…
हे जगण्याचे मर्म खरोखर!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈