सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि  ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे! 

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे?” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी,  “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली!” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस,” असं म्हणत. 

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का!”  खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून.” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!!”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’! 

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते..”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’……‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

(४ डिसेंबर… विजयाबाई मेहता यांचा जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा)

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments