सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

☆ माझा सोबती… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

किचनमध्ये शिरताना ,सवयीने रेडिओ सुरू केला.विविध भारतीवर बाईस स्कोपकी बाते मध्ये ” तिसरी कसम “ची कहाणी लागली होती. लगेचंच राजकपूर, वहिदा,पान खाए सैया हमारे …. सारं सरसर डोळ्यांपुढं आलं… ..   नाजूक, नखरेल,डौलदार,  तेवढीच खानदानी, शालीन दिसणारी  वहिदा… माझी आवडती….. 

…एकीकडे  कथा पुढे पुढे सरकत होती….संवाद, गीतं, कथा,  तर एकीकडे मिक्सरचा आवाज,,फोडणी,..फोन .. येणारे, जाणारे, अशा दोन्ही रुळांवर समतोल साधत मी गुंगून गेले. 

या रेडिओमूळे, असे सहज जगण्याचे क्षण सुंदर होऊन जातात. तो माझा ” सखा सोबतीच” आहे….. मला हवी तेव्हा सोबत करणारा. 

मी किचनमध्ये काम करतेय, अन् तो गप्प आहे, असं सहसा होत नाही. आणि जर असं झालंच तर तो बिघडलेला असेल, किंवा मी तरी. दुसरी शक्यता जास्त !!!  कधीही कोणत्याही वेळेला सदासर्वकाळ, बिनशर्त सेवा द्यायला तो एका बटणावर तयार असतो.

तशीही मी मनातल्या मनात एकटी बडबडतच असते. ऐकायलाही मीच. पण हा माझा सखा, माझ्यासाठी बोलतो खूप कांही… अगदी ‘ चिंतन ‘ पासून दिनविशेष, बातम्या, दिलखुलास सारखे ज्ञानवर्धक आणि रंजक कार्यक्रम, सखी सहेली,अजून खूप काही, ऐकवतो सतत . रोजच ! कधी कधी छळतो, कंटाळवाणे, प्रायोजित ऐकवून. मग जरा कान पिळायचा. इकडे तिकडे बघायचं अन्नू कपूरचा कार्यक्रम अचानक ऐकू शकते.

सर्वात महत्वाचं तो काय ऐकवतो, तर सुमधुर गीतं. अगदी बरसातच असते. फक्त बटण दाबायचं अन् कानांनी सुश्राव्य आनंद टिपायचा … .बस दिन बन जाता है ! मूड बन जाता है ! एखादं आवडीचं जुनं गाणं लागलं की.

लहानपणी रात्री रेडिओवर  श्रुतिका लागायच्या. आम्ही बहिणी कान देऊन ऐकायचो. कधी ऐकता ऐकता झोप लागून जायची. मग दुसऱ्या दिवशी पुढे काय झालं, ते विचारायचं… फार मज्जा असायची. साऱ्यांचे जग एकच असायचे घरात तरी. ही रेडिओची खासियत.  आता स्मार्ट फोन आल्यापासून घरातल्या प्रत्येकाचं  विश्व वेगळ झालंय.

एखादी मैत्रीण येते,काही बाही ऐकवून उदासी देऊन जाते, तर कोणी उत्साहाचं गुलाबपाणी शिंपून आपली उदासी पळवते. तर कोणी कर्तृत्वाची कहाणी ऐकवून प्रेरणा देते. तसेच रेडिओमुळे माझ्या मनात वेगवेगळ्या मुड्सची फुलं उमलत राहतात.

रेडिओ हे एक यंत्र असलं तरी त्याचा शोध लावणाऱ्यापासून आकाशवाणीचे सारे कलाकार, कामगार, तंत्रज्ञ, इतरही असंख्य लोकांचं योगदान आहे. त्यांच्या कृपेने, सेहगल, बालगंधर्व, भीमसेनजी, कुमारजी ….. अशा अनेक अनेक मान्यवरांची गीतं आपण घरात राहून एक बटणावर ऐकू शकतो , हे केवढं अप्रुप आहे.

त्यासाठी त्यांचे सर्वांचे ऋणी रहायला हवं. 

2001 साली घेतलेला आमचा फिलिप्सचा हा रेडिओ, टेपरेकॉर्डर  (2 इन वन) 20 वर्ष सेवा देतोय. 

आता टेप बंद पडलाय. काटाही जागचा हलत नाही. अंदाजाने फेरे मोजून स्टेशन बदलता येतं. 

Tv, इंटरनेट, असे रेडिओपेक्षा खूप प्रगत शोध लागले तरी रेडिओ, तो रेडिओच — जिवाभावाचा सखा सोबती —  त्याची सर कशालाच नाही !

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments