डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जे गरीब आणि निराधार रूग्ण दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्यांना जेवण आणून देणारे कोणीही नाही…. या जगात ज्यांचं आपलं म्हणावं, असं कोणीही नाही….. अशा सर्व गरीब रुग्णांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पामधून” आपण रोज डबे पुरवित आहोत. ….. श्री अमोल शेरेकर, या कष्टाळू दिव्यांग कुटुंबाकडून आपण डबे तयार करून घेत आहोत , आणि जिथे खरंच गरीब आणि गरजू रुग्ण आहे, अशांनाच आपण हे मोफत जेवणाचे डबे देत आहोत.  (सरसकट दिसेल त्याला आपण जेवण देत नाही) …. याचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ मनीषा पाहत आहे. 

यांनाही आयुष्यात उभं करायचं आहे ….परंतु, भरल्या पोटाने दिलेला सल्ला, उपाशी पोटाला पचत नाही…!

… बघू प्रयत्न सुरू आहेत…! 

  • ज्यांच्याकडे चुली आहेत, परंतु शिधा नाही, अशा गोरगरीब आणि रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांना आपण शिधा पुरवित आहोत.  या महिन्यात जवळपास ३०० लोकांना दोन महिने पुरेल इतका शिधा आपण दिला आहे. 

यांना चिंता आहे ती भविष्याची… त्यांच्या मुलांची… ! 

मेल्यावर जाळते ती “चिता” आणि मरण्याअगोदर जाळते ती चिंता…! 

फरक फक्त एका टिंबाचा….!

  • जवळपास ६०० लोकांच्या रक्त, लघवी आणि इतर सर्व शारीरिक तपासण्या आपण रस्त्यावर आणि रेड क्रॉस हॉस्पिटल येथून करून घेतल्या आहेत. तपासण्याचे रिपोर्ट पाहून त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा रस्त्यावरच दिली आहे. .. मी त्यांना रस्त्यावर  “मोफत” दवा देतो…. ते मला “अनमोल” दुवा देतात… ! 

… इथेही फरक फक्त… उकाराचा…!  मी हा उकार घेवून मस्त जगतोय…. शप्पथ घेऊन सांगतो… मनशांती मिळवायची तर फक्त हा उकार महत्वाचा ! 

आपण आपल्या विचारात त्रस्त असतो तेव्हा असते ती “मनःस्थिती”…. दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तेव्हा होते ती “नमःस्थिती ” …! 

… फक्त शब्दांची अदलाबदल करायची…? की विचारांची आणि वागण्याची??  हे ज्यानं त्यानं ठरवायचं ! 

  • रस्त्यावर पडलेले… एक्सीडेंट होऊन हात पाय मोडलेले… डोके फुटलेले…. दहा रुपयांसाठी मारामारी होऊन, भोसकाभोसकी झालेले, कॅन्सर, कावीळ झालेले असे बारा रुग्ण आपण या महिन्यात मॉडर्न हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आणि या सर्वांचे जीव वाचले आहेत. 

… हे पुन्हा उठून उभे राहतील अशी आशा आहे…! 

सूर्यापासून एक शिकायचं असतं ….संध्याकाळी मावळलं तरी रोज सकाळी पुन्हा उगवायचं असतं ! 

  • कडाक्याच्या थंडीत जे गारठले आहेत, अशा रस्त्यावरच्या सर्वांना…. कान टोपी, स्वेटर, ब्लॅंकेट, घोंगडी देऊन झालं आहे. सौजन्य : डॉ राजेश केणी, गोवा.
  • आयुष्याच्या अंताला जे लागले आहेत… रस्त्यावर पडून आहेत…. असे आजी आजोबा, जग सोडून गेले तर बेवारस म्हणून नोंद होऊन ते जातील…. ना कुणाला खंत, ना कोणाला खेद ! मला हे मंजूर नाही !  आणि म्हणून, अशा अनेकांना या महिन्यात वेगवेगळ्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आहे. जेव्हा ते जातील, तेव्हा किमान वृद्धाश्रमातून मला फोन येईल आणि आम्ही त्यांचे मुलगा / नातू / सून म्हणून अंतिम संस्कार करू… 

… त्यांच्या आयुष्यात जगण्याची ठिणगी पेटवू शकलो नाही …  पण…. जाताना किमान अग्नी तरी देऊ…!

मनातलं काही…

भीक मागणाऱ्या / याचना करणाऱ्या अनेक लोकांच्या अंगात अनेक कला असतात, परंतु अनेक लोकांच्या अंगात कोणतीही कला आणि कौशल्य नसते…. !  ज्यांच्या अंगात कोणतेही कला आणि कौशल्य नाही अशा लोकांना हे कौशल्य शिकवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

उदा. गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण, परफ्युम तयार करण्याचे प्रशिक्षण, साडीला फॉल पिको करण्याचे प्रशिक्षण, किंवा गिफ्ट आर्टिकल तयार करण्याचे प्रशिक्षण इ… इ…

प्रशिक्षण झाल्यानंतर त्या प्रकारचा ते व्यवसाय करू शकतील. पण अशा प्रशिक्षणासाठी जागा लागते.

याचना करणाऱ्या लोकांसाठी असे प्रशिक्षण केंद्र उभारणे हे माझे अंतिम स्वप्नं आहे…. यासाठी मी पुणे किंवा पुण्याजवळ पाच गुंठे जागा शोधत आहे. 

अगदीच नाही तर ८०० ते १००० स्क्वेअर फुटाचा बांधीव हॉल भाड्याने घेण्यासाठी पहात आहोत . 

महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे गेल्या पाच वर्षापासून यासाठी मागणी / विनंती / अर्ज करून मी आता थकलो आहे…. पूर्णतः हरलो आहे…! 

… असो, त्यांच्याही काहीतरी अडचणी असतीलच !

तर, कोणाच्या पाहण्यात अशी जागा अथवा हॉल असेल तर कळवावे… जेणेकरून, याचना करणाऱ्या माझ्या लोकांसाठी मला “कौशल्य विकास केंद्र” निर्माण करून, या समाजाला स्वतःच्या पायावर उभे करता येईल. 

एखाद्याला ढकलून पाडायला ताकद लागत नाही… हात धरून उठवायला ताकद लागते…! 

आपणच माझी ही ताकद आहात…! 

ज्या कामाचा मी फक्त नोव्हेंबर महिन्याचा लेखा जोखा वर सादर केला आहे, त्याला अवाढव्य आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत लागते. 

… वरील सर्व मदत समाजाकडून मला मिळत आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे….! 

तरीही, माझ्यासमोर असलेले खर्च आणि माझ्याकडे उपलब्ध असलेला निधी यांची सांगड कधीच बसत नाही…! 

‘तुमचे बिल पुढील महिन्यात भागवतो साहेब,’ हे हात जोडून समोरच्या व्यक्तीला सांगण्याची नामुष्की दरवेळी माझ्यावर येतेच…!

हरकत नाही, घरोघरी मातीच्या चुली…! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे… उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं …! 

मी पडल्यानंतर, उठून उभे करण्यासाठी तुम्हा सर्वांचेच हात पुढे येतात… आणि दरवेळी मी उभा राहतो…

पुन्हा नव्याने… नव्या जोमाने ! 

… मी नतमस्तक आहे आपणासमोर…! 

माझा प्रणाम स्वीकार करावा जी… 

— समाप्त —

(मी करत असलेल्या कामाचे सर्व फोटो आपणास दाखविण्याचा मला खूप मोह होतो… परंतु असे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया स्वीकारत नाही हा भाग एक …आणि दुसरा म्हणजे, असे फोटो {पायात अळ्या पडलेले, झोपेत कुत्र्याने पाय खाल्लेले, एक्सीडेंटमध्ये डोकं फुटलेले, हाडांचे तुकडे झालेले, ब्लेडने पोट फाडलेले, दगडाने बोट ठेचलेले इ.. इ… वाचूनच कसंसं  झालं ना ? } अनेक व्यक्तींना असे फोटो बीभत्स, ओंगळवाणे, किळसवाणे वाटतात. अनेक लोक हे फोटो पाहून कित्येक दिवस जेवू शकणार नाहीत किंवा झोपू शकणार नाहीत, याची जाणीव आहे, आणि म्हणून या कारणास्तव मी असे फोटो दाखवणे टाळत आहे.)

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments