श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉपच्या समोर बसलेल्या ! 

म्हंटलं “आजी काय करताय !”

” काही नाही रे फेसबुकवर फोटो अपलोड करतेय, भजनी मंडळाचे !”

मी तीनताड उडालो. ” आजी तुम्ही फेसबुकला आहात? “

“ मग ! वाटलं काय तुला ! व्हाट्सप पण वापरते मी. आणि हे आजी काय रे?  ग्रॅनी म्हण! “

मी अवाक–आं !! म्हंटलं, आजोबा– sorry, ग्रॅंडपा कुठे गेलेत ? “

” गेलेत मार्केटला, बरमुडा का काय आणायला.”

माझा चेहरा बघून आजी हसल्या म्हणाल्या, ” बस जरा गम्मत दाखवते !”

डुलत डुलत आत गेल्या आणि एक पिशवी घेऊन आल्या. “आमच्या सुशनी पाठवलंय! ” बघितलं तर आत एक पंजाबी ड्रेस ! “अरे पुढच्या महिन्यात जायचंय ना यु एस ला! तयारी हो, तिथे नऊवारीत थंडी वाजते हो, ह्याच्या आत कसे ते थर्मल वेअर की काय ते घालता येतं ना ! “

” काय हो आजी, सॉरी ग्रॅनी तुम्हाला करमतं का हो तिकडे? “

” न करमायला काय झालंय, मला आवडते तिथे, तिथे भारतीय लोकांचा आमच्याच वयाचा एक ग्रुप केलाय. सगळे दर वीकएंडला भेटतो आणि धम्माल करतो. पॉटलक करतो, बर्थडे साजरे करतो, साठी, पंच्याहत्तरी, सहस्त्रचंद्रदर्शन अगदी सगळं करतो.  काही तिथेच स्थायिक झालेले, काही आमच्या सारखे……. वारकरी.”

” तिथे भेटताना अट एकच ! घरची गाऱ्हाणी कोणी सांगायची नाहीत. मग काय मज्जा मस्तीला तर उत येतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हो, नाहीतर धपाटा घालीन.”

“बोला ना “

खुसपुसत म्हणाल्या, ” अरे गेल्या वेळी एकीचं बेबी शॉवर होतं, म्हणजे डोहाळजेवण. असा बावळटासारखा बघू नकोस. तर तिथे एका म्हातारीने मला टकीला की काय म्हणतात ना ती पाजली. आणि मी लागले ना झिंगायला ! 

बरं झालं तिने मला आत नेऊन झोपवलं, नाहीतर काय धिंगाणा केला कोणास ठाऊक? तरी हे दुसऱ्या दिवशी 

माझ्याकडे संशयाने बघत होते, मी आपलं तोंड लपवले.” असं म्हणताना त्या गोडश्या लाजल्या. आणि इथे हे ऐकताना माझी हसून हसून पुरेवाट!

” काय हो आजी हल्ली सकाळी तुम्ही फिरायला जाताना दिसत नाही?”

“अरे नाही उठवत रे, रोज रात्री आमच्या नातवंडांशी चॅटिंग फिटिंग करतो दोघं आणि मग झोपायला उशीर होतो.  आणि जाऊन तरी करायचंय काय तिथे, सुनेच्या, जावयाच्या कागाळ्याच ऐकायच्या ना ! नाहीतर तब्बेतीची रडगाणी ! अरे आता त्या गुप्तेआजी ! सून इतकी चांगली आहे. डॉक्टरेट केलंय, पण ह्या म्हणतात की ती घरी पोळीभाजी करत नाही. आता ती तिच्या कंपनीत मोठमोठ्या फाईली उपसत बसेल की पोळ्या लाटेल?” 

” दुसरी ती परांजपीण, सारखं मेलीला काही न काही होत असतं. आज काय अर्धशिशी, उद्या काय बद्धकोष्ठ, तर परवा काय जुलाब. कुठला रोग झाला नाही असे नाही. तरी बरं मुलगाच डॉक्टर आहे. पण हिला वाटतं की माझ्या उशापायथ्याशी सगळ्यांनी बसावं. गेल्या महिन्यात आली होती तेव्हा रडत होती की सारखं पाठीत दुखतंय. अस्सा राग आला. म्हंटलं उडी मार तळ्यात ज्या काठावर बसलोय तिथून, नाहीतर मी ढकलते तुला. तशी घाबरली आणि पळाली घरी. तेव्हापासून मला आजी कट्ट्यावर हिटलर म्हणतात.  मी सांगू का एक गोष्ट तुला, मला नाही आवडत हे सगळं. आपणच मुलांना शिकवलं ना? आणि ती मुलं शिकल्यावर त्याचा उपयोग नको का करायला? सारखं आपलं उणंदुणं काढायचं. आमच्या ह्यांची नोकरी होती फिरतीची, दर पाच वर्षांनी बदली, सारखं संसार मांडा- परत बदला, मुलांचीपण फरफट आमच्याबरोबर, तेव्हा मुलांनी तक्रार केली का? नाही ना? मग आता त्यांच्यामागे आपण गेलो तर कशाला रडायचं. माझी सून तर तिकडचीच आहे. पण तिथे गेले की सगळं छान करते, सुरवातीला पूर्ण अमेरिका फिरवलं आम्हाला, अगदी युरोप टूर पण केली. आणखी काय हवं म्हणते मी. “

” मी तर म्हणते मुलं मार्गी लागली, त्यांची लग्न झाली की आपण ज्येष्ठांनी विश्वस्त व्हावं घराचं,आपल्याला सल्ला विचारला तरच द्यावा, आणि सल्ला दिल्यावर तोच मानला जाईल असा अट्टहास करू नये. त्यामुळे भांडणं कमी होतात. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही होत नाही. आणि आताच्या जमान्यात, ना आम्ही त्यांच्यावर अवलंबून, ना ते आमच्यावर ! आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मुलांना खूप माहिती असते, आणि त्यांच्या परीने ते आपली काळजी घेतातच की. आयुष्यात तक्रार न करता आणि दुसऱ्याचं कौतुक करत राहिलं ना की खूपसे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. “

” चल आवरते आता ! तुझ्याशी बोलत बसले तर कामं कोण उरकणार, आमचा म्हसोबा येईलच एवढ्यात.

चल पळ तू पण!!”

मी निघालो खरा तिथून, पण त्यांचा ‘ विश्वस्त ‘ हा शब्द मनात कुठेतरी खोल जाऊन बसला. किती छान विचारसरणी ना ? 

— असे जर विचार आपल्या सगळ्याच ज्येष्ठांनी केले तर त्यांचे कितीतरी प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत.

लेखक – श्रीरंग खटावकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments