सुश्री शुभदा जोशी

अल्प परिचय

शिक्षण – B.Arch.1985, ME Townplanning.1987

सम्प्रति –

  • दहा वर्षे आर्कीटेक्ट व इंटीरियर डिझायनर व्यवसाय.
  • अक्षरानंदन या संस्थेत एक वर्ष काम केले.
  • पालकनीती या मासिकाच्या संपादकीय मंडळावर 20 वर्षे.
  • पालकनीती परिवार या एन् जी ओ वर 1996 पासून विश्वस्त.
  • स्वतःच्या घरी ‘खेळघर’ या, झोपडपट्टीतील मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात.
  • 1998 पासून शिक्षण आणि पालकत्व या क्षेत्रात तज्ञ मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत.

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

खूप वर्षे झाली…. कधीपासून बरं? आपल्या मनातल्या विचारांबद्दल कळायला लागलं तेव्हापासून हा शोध मनात पिंगा घालतोय.

आपल्याच जगण्याकडे थोडे बाहेरून बघायला लागल्यावर कधी कधी काही उलगडल्यासारखं वाटतं… त्याबद्दल लिहायचं आहे.

कधी छान वाटतं? कशामुळे? कशामुळे रुसतो आनंद आपल्यावर?

आवर्जून प्रयत्न करून मिळवता येतो का आनंद? शोधुयात बरं … असं ठरवलं आणि लिहायला सुरूवात केली. 

बहुसंख्य वेळा मन व्यापलेलं असतं  कशाने तरी… काय असतं हे ओझं? 

काळजी, ताण, भविष्यात करायच्या गोष्टींची आखणी किंवा मनासारखं झालं नाही म्हणून राग, अचानक काही वाईट घडतं त्याचं दुःख, गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून असहायता… अशा अनेक गोष्टींनी व्यापलेलं असतं मन! 

त्यात मुळी जागाच उरत नाही आनंदाला! 

अच्छा असं होतंय का?

थोडे आणखी खोलात जायला हवे…… 

काळजी, ताण, राग, दुःख अशा भाव भावनांची वादळे आपल्या मनाचा अवकाश व्यापून रहातात आणि म्हणून आनंदाला जागा रहात नाही शिल्लक! म्हणजे हे तर अडथळे आहेत आनंदाच्या वाटेवरचे. पण असे कसे, आपण माणूस आहोत, भावना तर असणारच. ते संवेदनाक्षम मनाचे लक्षण आहे. 

या भावभावना उत्स्फूर्तपणे आपल्याही नकळत मनात उफाळून येतात आणि दंगा घालतात. मला आठवतंय, छोटीशी घटना घडते आणि खूप काही जुनं जुनं वर येतं आणि मन अस्वस्थ होऊन जातं. असं का होतं? खरंच या  भाव भावनांना समजून घ्यायला हवं आहे. भावनांचे वादळ जरा शमले, की ते सारे विसरून पुढे जायची घाई असते आपल्याला!

मनाच्या शांत अवस्थेत स्वतःच्या वर्तनाला, भावनांना निरखून पहायला वेळ काढला तर… ?

लहानपणी ऐकलेल्या एका प्रार्थनेच्या ओळी आठवताहेत,

” दिसाकाठी थोडे शांत बसावे,

मिटूनी डोळे घ्यावे क्षणभरी.

एकाग्र करोनी आपल्या मनाला,

आपण पहावे निरखोनी.”

——ही शांतता, हा ठेहेराव मिळवू शकू का आपण…?

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments