? मनमंजुषेतून ?

 ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

नेहाशी, फोन  वर  बोलत  होते. “आई, तुम्ही सांगितलं तश्या  कापसाच्या गाद्या बनवून  घेतल्या हं.”

“बरं केलंत… इतक्या लहान  वयात  कसली  ती पाठदुखी आणि कंबरदुखी.!!”””मी म्हटलं..

इकडचं तिकडचं बोलून मी फोन  ठेवला—-

—-आणि  त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोहोचले .

मला  तो खांद्यावर  काठी  टाकून धनुष्यासारखी  दोरी ताणत  “एक विशिष्ट  टिंग टिंग “आवाज  करीत  चाळीत  शिरणारा लखन आठवला … कापूस पिंजून गाद्या शिवून  देणारा. शिवाजी  पार्कच्या १३० बिऱ्हाडं असलेल्या चाळीत  तो रोज यायचा . एकही दिवस  असा नाही जायचा  की त्याला काम नाही मिळालं…

.. माझ्या चाळीतल्या आठवणी  “चाळवल्या  “गेल्या… 

कित्ती लोकं यायची सकाळपासून !!!!

आता सोसायटी किंवा कॉम्प्लेक्समधेही  सकाळपासून माणसं येत असतात. पण ती “स्विगी” ची, नाही तर  “झोमॅटो”ची.  नाहीतर  “amazon, myntra, etc. ची.   कुठल्याही वेळी आणि बिन चेहऱ्याची , अनोळखी माणसं..

खरं  तर  इमाने इतबारे, कष्टाने  इकडची  वस्तू तिकडे “पोचवण्याचं  ” काम करीत  असतात बापडी.

पण मनात  “पोहोचू  “शकत  नाहीत.

याउलट  साठ सत्तरच्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी  होऊन मनापर्यंत  पोहोचली  कळलंच  नाही.

सकाळची  शाळा असायची. रेडिओ  वर मंगल  प्रभात सुरू असायचे . त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या “वासुदेवाची ” Entry व्हायची. तेव्हढ्या ” घाईतही  त्याला दोन पैसे  द्यायला धावायचो ..

रोज नाही यायचा  तो. पण त्याच्या विचित्र पोशाखाचं  आणि गाण्याचं वेड होतं आम्हाला…

कधी  एक गृहस्थ  यायचे . भगवी  वस्त्र ल्यायलेले. हातात कमंडलू असायचं. तोंडाने “ॐ, भवती  भिक्षां देही “असं म्हणत  सगळ्या चाळीतून  फिरायचे, कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचे ही नाहीत.

मी आईला  कुतूहलाने विचारायचे, “ ह्यांचाच  फोटो असतो का रामरक्षेवर ? “

आठवड्यातून  एकदा घट्ट  मुट्ट, चकाकत्या  काळ्या रंगाची  वडारीण  यायची . “जात्याला, पाट्याला टाकीय,…”

अशी  आरोळी  ठोकत . जातं नाही तरी  पाटा घरोघरी  असायचाच . त्यामुळे दिवसभर  तिला काम मिळायचंच .

तिची  ती विशिष्ट पद्धतीने  नेसलेली साडी.. अंगावर  blouse  का घालत  नाही याचं आमच्या  बालमनाला  पडलेलं कोडं असायचं. (हल्लीची  ती कोल्ड shoulder आणि  off shoulder ची  फॅशन  यांचं  चित्र बघून आली  की काय?)

हमखास  न चुकता  रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची  गाडी असायची . “मिठ्ठाची  गाडी आली , बारीक मीठ,

दहा  पैसे  किलो, दहा  पैसे  “!!!!  ही त्याची हाक ऐकली  की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो. 

तसाच  एक तेलवाला यायचा . कावड  असायची  त्याच्या खांद्यावर . दोन बाजूला दोन मोठ्ठे डबे . एकात खोबरेल  तेल एकात गोडं तेल. घाणीवरचं.. तेलाच्या घाणी एवढाच  कळकटलेला  आणि  तेलकट.. ढोपरापर्यंत  घट्ट  धोतर ., कधीकाळी पांढरं असावं, वर बंडी आणि काळं जॅकेट ..त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरपण माझ्या डोळ्यासमोर  येते.

अशा  तेलवाल्याकडून, पॅकबंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ  पोसली. हायजीनच्या कल्पनाही  घुसल्या नव्हत्या डोक्यात.

सकाळची  लगबग, गडबड  आवरून घरातल्या  दारात गृहिणी  जरा  निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास  बोवारीण यायची . मुळात कपड्यांची चैन होती कुठे  हो. पण त्यातल्यात्यात जुने कपडे  देऊन, घासाघिस  करून, हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर  चाळीतले  अनेक संसार  सजले  होते.

हे सगळं सामूहिक चालायचं हं . जी बोवारणीला कपडे  देत असायची  तिच्या घरात  गंज  आहे  का, परात  आहे  का, “लंगडी “आहे  का हे तिच्या शेजारणींना माहित असायचं.

अशाच  दुपारी कधी  कल्हई वाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत  तो फणसाच्या  झाडाखाली  बस्तान बसवायचा .

त्याचा तो भाता, नवसागराचा  विशिष्ट धूर  आणि वास..कळकटलेली  भांडी, पातेली, कापसाचा बोळा  फिरवून चकचकित  झालेली पहिली  की आम्हाला काहीतरी  जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चूर्र आवाज . तो गेल्यावर ते बॉलबेअरिंग्ससारखे  छोटेछोटे  मातीत पडलेले गोळे गोळा करायचे… 

कशातही  रमायचो  आम्ही. 

संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्यावेळी कुरमुऱ्याच्या पोत्याएवढाच जाडा– पांढराशुभ्र  लेंगा सदरा  घातलेला  कुरमुरेवाला यायचा . खारे  शेंगदाणे, चणे, कुरमुरे  हा त्या वेळचा  खाऊ …जो घेईल  तो एकटा नाही खायचा –  वाटून खायचा . चाळीचा  संस्कार होता तो.- “sharing is caring ” हे शिकवायला नाही लागलं आम्हाला..

घंटा  वाजवत , रंगीबेरंगी  सरबताच्या  बाटल्यांनी भरलेली  बर्फाचा  गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर  रस्त्यावर उभी  राहायची . महिन्यातून एखादेवेळी खायला आम्हाला परवानगी  मिळायची . १३० बिऱ्हाडातली कमीत कमी  दिडेकशे  पोरं तो बर्फाचा  गोळा कधी ना कधी खायची,  पण कोणी आजारी  पडल्याचं मला  तरी  आठवत  नाहीये..

संध्याकाळी सात वाजेपर्यंत  पटांगणात धुमाकूळ  घालून , गृहपाठ , परवचा, म्हणून गॅलरीमधे कोण आजोबा  आज  गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत  असायचो .

उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की “कुल्फीय..” ओरडत  डोक्यावर ओला पंचा  गुंडाळलेला मटका  घेऊन  कुल्फी विकणारा यायचा ..चाळीत  तेव्हा तरी  कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची  सहसा . पहिला  दुसरा नंबर आला तर  क्वचित मिळायची ..

अशी  ही बाहेरून येणारी सगळी  माणसं “आमची  “झाली होती.

शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नातेवाईकही “आपले “वाटायचे …

या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा  व्यक्तिमत्व विकास होत राहिला.

माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी  आजही अधूनमधून अशा “चाळवतात” .

पु. लं च्या बटाट्याच्या चाळीने  “चाळ  संस्कृती  “घराघरात “पोहोचवली.

आमच्या चाळीने  मात्र ती आमच्या  “मनामनात  “रुजवली …

लेखिका – सुश्री नीलिमा जोशी 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments