? मनमंजुषेतून ?

☆ पदर, मदर आणि सदरा… ☆ योगिया ☆

(मातृ दिवस निमित्तची कविता)

आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा.

खरं तर आईची ओळख झाली आणि

मग नऊ महिन्यांनी पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला

आणि मी आश्वस्त झालो

तेव्हा पासून तो खूप जवळचा वाटू लागला…

आणि मग तो भेटतच राहिला…आयुष्यभर…

 

शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला

उन्ह्याळात कधी तो टोपी झाला

पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला

खावून घाईत खेळायला पळताना तो नँप्कीन झाला

प्रवासात तो कधी शाल झाला…

बाजारात भर गर्दीत कधी आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो…

त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना तो चिमटा झाला

उन्हाळयात लाईट गेल्यावर तो फँन झाला

 

निकालाच्या दिवशी तो पदर माझी ढाल व्हायचा

बाबा घरी आल्यावर…चहा पाणी झाल्यावर

तो पदरच प्रस्ताव करायचा….

छोटूचा रिझल्ट लागला…चांगले मार्क पडले आहेत

एक-दोन विषयात कमी आहेत

पण आता अभ्यास करीन अस तो म्हणलाय..

बाबांच्या सुऱ्याची सुरी होताना

मी पदरा आडून पाहायचो

 

हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून….

त्या पदरानीच मला शिकवलं

कधी-काय अन कस बोलावं

तरुणपणी पदर जेव्हा बोटाभोवती घट्ट गुंडाळला

त्याची खेच बघून तिसऱ्या वेळी आईने विचारलंच

“कोण आहे तो…नाव काय??”

लाजायलाही मला पदरच  चेहऱ्यापुढे घ्यावा लागला

 

रात्री पार्टी करून आल्यावर…जिन्यात पाऊल वाजताच

दार न वाजवताच… पदरानेच उघडलं दार

कडी भोवती फडकं बनून…कडीचा आवाज दाबून

त्या दबलेल्या आवाजानेच दिली शिकवण नैतिकतेची

 

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल

अनुकरणाच्या सोसात असेल किवा

स्व:ताच्या शोधात असेल

साडी गेली…ड्रेस आला…टाँप आला..पँन्ट आली

स्कर्ट आला…छोटा होत गेला

प्रश्न त्याचा नाहीच आहे…

प्रश्न आहे तो

आक्रसत जावून गायब होवू घातलेल्या पदराचा

खरं तर सदऱ्यालाही फुटायला हवा होता पदर….

– योगिया

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments