श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ओतून दिलेला चहा मोरीत  वाहत होता .पाण्यात मिसळून त्याचा रंग बदलत होता ,मी टक लावून पाहत होतो.पाहता पाहता मी माझ्या बालपणीच्या आठवणीत केव्हा गेलो कळलेच नाही……….

सकाळ झाली की आमचा सर्व भावंडांचा घोळका अंगणातील चुली भोवती जमायचा .लाकडे पेटवून या चुलीवर पाणी गरम करणे,सकाळचा चहा हे सर्व सोपस्कार याच चुलीवर व्हायचे.पण खरं तर या चुलीचा फायदा हिवाळ्यात हात शेकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी अधिक व्हायचा.कधी कधी याच चुलीवर गोवऱ्यांच्या राखेत  भरतासाठी वांगी किंवा हुरड्याची कणसे भाजली जायची .पण आमच्यासाठी रोजचा आनंददायी प्रसंग म्हणजे सकाळचा या चुलीवर तयार होणारा चहा.आम्ही सात बहीण भाऊ,आत्या आई बाबा आणि वेळेवर येणारा आगंतुक असा दहा बारा लोकांचा चहा आमची आई मांडायची,चहा मांडायची म्हणजे गंजात तितके कप पाणी टाकायची,त्यात रेशन दुकानातून मिळालेली दोन मुठी साखर टाकली जायची. त्यात ब्रुक ब्रँड कंपनीची फुल छाप चहापत्ती टाकली जायची.या चाहापत्तीच्या  दहा पैसे किमतीच्या पुड्या किराणा दुकानात मिळायच्या.शिलाई मशीन द्वारा या पुड्यांच्या माळा कंपनीचं बनवीत असे, दिवाळीतील उटण्याचा पुड्या प्रमाणे त्या दुकानात लटकलेल्या असतं. आमच्या आईचं गणित असे होते की एका वेळेसच्या चहा साठी एक पुडी टाकायची ,असे हे लाल रसायन चुलीवर उकळायचे,लवकर उकळी यावी म्हणून आम्ही भावंडं फुंकनिने फुंकून जाळ वाढविण्याचा प्रयत्न करायचो. उकळी येईपर्यंत चहाकडे पहात राहणे हा आम्हासाठी आनंददायी अनुभव असायचा.सुरवातीला बुडबुडे यायचे नी मागून उकळीचा भोवरा.तो पर्यंत कुणीतरी दहा पैशाचे दूध ग्लासात विकत आणले असायचे ,ते चहाच्या रसायनात टाकले की बस चहा तयार…..चहा तयार झाला की आम्ही भावंडं आपापली भांडी पुढे करायचो.बहुदा त्या मोठ्या वाट्या असायच्या.मोठ्यांना कपबशी भरून चहा दिला जायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा.आम्हाला त्यामुळे कमी चहा मिळेल असे उगीच वाटायचे.आमच्या भांड्यात आईने थोडा जास्त चहा टाकावा म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.त्यात भांडणे व्हायची व एखाद्याचा चहा सांडायचा मग सर्व भावंडं त्याला आपला थोडा थोडा चहा दयायचे.  रात्रीच्या शिळ्या पोळ्या मग आम्ही या चहात तुकडे करून टाकत असू.थोड्या वेळात त्या मस्त नरम होत.त्याचा आस्वाद आम्हाला अमृततुल्य वाटायचा.

चहाचा एक थेंबही वाया जात नसे.भलेही या चहात भरपूर दूध, विलायची,मसाले अद्रकं नसेलही पण आम्हाला फरक पडत नसे.त्यामुळेच कदाचित आज मोरीत टाकलेल्या चाहाबद्दल हळहळ वाटली असावी.पोरांना चहाची खरी किंमत व आनंद कसा कळेल.चूक त्यांची नाही,गरिबी त्यांच्या वाट्याला आलीच नाही.         

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments