सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ हरवलेला वासुदेव – भाग-२७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
हरवलेला वासुदेव..
काळाच्या पडद्याआड गेलेला वासुदेव – व्हॉट्सॲप वरचे, लेखी, फॉरवर्ड केलेले सुप्रभात, गुड मॉर्निंग शब्द त्यावेळी नव्हते. साखर झोपेत मऊशार गोधडीत गुरफटलेले आम्ही जोगेश्वरीच्या देवळातल्या घंटा नादानेच जागे व्हायचो. पाठोपाठ टाळ बासरीचे सूर कानावर पडायचे. आमच्यासाठी मग सुप्रभात काय सुदिनही सुंदर व्हायचा. ‘खंडोबाच्या नावांनी दान पावलं’ असा खणखणीत तालासुरातला आवाज ऐकल्यावर “अरे अरे! वासुदेव आला रे! उठ लवकर”असं म्हणून आम्ही बिछाना गुंडाळायचो. वासुदेव हाच आमच्यासाठी घड्याळाचा गजर होता. पहाटेपासून “अरे उठा आंता गाढवासारखे लोळताय काय! ” आईने आरडा ओरडा करून, आंजारून गोंजारूनही, न ऊठणारेआम्हीं, वासुदेवाच्या घुंगर आवाजाने, , उडी मारून खिडकी गांठत होतो. डोक्यावर मोरपिसाची टोपी, पायघोळ अंगरखा आणि आमच्या वाडवडिलांपासूनची नांवे घेत, ताला सुरात नाचणारा वासुदेव आम्हांला फार फार म्हणजे फारच आवडायचा, आमची प्रभात तो सुप्रभात सुमंगल करायचा. त्याच्या खांद्यावरच्या गव्हा तांदुळाच्या झोळ्या कधी मूठमूठ धान्याने भरायच्या तर कधी फक्त्त पसाभरचं धान्य झोळीत पडायचं. अशावेळी आधीची उत्साहाने नाचणारी त्याची पावलं जड व्हायची. त्याचा चेहरा उतरायचा. जड मनाने परत जाणारा वासुदेव आम्हाला केविलवाणा वाटायचा. तशीच कींव आम्हाला पोतराजाची यायची नावाने’पोतराज’पण परिस्थितीने रंक असा तो लांब केस राखलेला कमरेला चोळीचे खण गुंडाळणारा आणि पाठीवर आसुडाचे फटाफट आवाज काढत फिरणारा ‘पोतराज’ आम्हांला भयभीत करायचा. सारं काही पोटासाठी करणाऱ्या या लोकात, “नागोबा नरसोबा दोन पैसे, रंगीत चित्रपट दोन पैसे, “असे ओरडत जाणाऱ्या छोट्या मुलांचीही गणना असायची. तसंच श्रावणात आघाडा दुर्वा, फुलेविकणाऱ्या नऊवारीतल्या बायकांचीही वर्णी असायची. तेवढीच नवऱ्याच्या पिठाला मीठाची जोड असं म्हणून चार पैसे त्यांच्या कनवटीला लागायचे. पावसाळ्यापासून त्यांच्या मिळकतीला सुरुवात व्हायची तसेचं छत्रीवाले, ” ऐ छत्री दुरुस्तवालेsss, ” असे ओरडत गल्लोगल्ली फिरायचे. दरवर्षी नवीन छत्र्या घेणे परवडणार तरी कसं हो? मग काय! माळ्यावरच्या छत्र्या खाली उतरवल्या जायच्या. छत्रीच्या काळ्या झग्याला भोकं पडलेली असायची, तर कुठे काड्यांनी माना टाकलेल्या असायच्या. अशावेळी धाकटे, मिस्कील काका म्हणायचे, “अरे छत्र्यांच्या डॉक्टरांची हाळी ऐकली की त्याला थांबवा बरं कारे! सगळ्या छत्र्या दुरुस्त करून घ्यायच्यात. दोन पावसाळे तरी सहज जातील. ” हा छत्री डॉक्टर इतका हुशार की, कधीकधी काळ्या छत्रीवर पांढरी ठिगळं जोडायचा. बाकी पावसाळ्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांबरोबर त्याचा खिसाही नाण्यांनी भरायचा. पावसाळ्यात अशी कलाकुसरीने पॅचवर्क केलेली छत्री डोक्यावर घेऊन आम्ही शाळेत जात होतो. काळ्यावर पांढरं ठीगळं उठून दिसायचं, आणि अहो! जातांना इतकी लाज वाटायची म्हणून सांगू! पण छत्रीआड चेहरा लपवून आम्ही शाळागाठायचो. कधी कधी उसवलेल्या छत्रीतून चुकार थेंब आमच्या डोक्यावर गुलाब पाणी शिंपडायचे. डोकं भिजायचं, पण पावलं म्हणायची, ‘असुंदे तू चाल पुढे’–
आमच्या लहानपणी गॅस नव्हतेच, फरफरणारे स्टो पेटवले की एका मिनिटात दूध सरसर वर येऊनहमखास उतू जायचंच आम्हाला स्टो जवळ पहारा करायला सांगून आई आंघोळीला जायची. समुद्राच्या लाटेसारखं दूध वर वर आल्यावर इतकी त्रेधा तिरपीट उडायची की, दुधाला भरती येऊन ते सूळकन सांडून स्टो’राम’म्हणायचा. आई यायच्या आत तो पसारा आवरतांना ‘दे माय धरणी ठाव’ व्हायचं, बहिणींच्या हातून खळखळ उकळणारी आमटी खळखळून पातेल्याबाहेर उसळी मारायची. ‘स्टो’ विश्रांती गृहात जायचा. आईचा ओरडा बसायला नको म्हणून, बहिणी पसार व्हायच्या. अष्टावधानी आईच्या हातात मात्र, हे तंत्र सांभाळण्याचं अजब असं कसब होतं. मग काय! आमच्या हातून बिघडलेले स्टो, दुरुस्त करणं भागच होतं, कारण आईचं कामठप्प व्हायचं. इतक्यात ‘प्राsssयमस ‘अशी रिपेअर करणाऱ्या फेरीवाल्याची आरोळी कानावर पडली की ओरडून टाळ्या वाजवून त्याला वर बोलवलं जायचं. तो नाही आला तर दुकानातल्या स्टो दुरुस्त करणाऱ्याला आमंत्रण पत्रिका द्यावी लागायची.
आता आला दुसरा कारागीर. छत्रीला ठिगळं जोडणाऱ्या कारागिरापेक्षाही अत्यंत हुशार असा भांड्यांना डाग देणारा कल्हई वाला “भांड्यांना कलाहहीय्येsss “, अशी हाळी द्यायचा, गृहिणी लगबगीने खेळणाऱ्या पोरांना पकडून माळ्यावर चढवायच्या. मग माळ्यावरची पातेली, सतेली, तेलाची बरणी इत्यादी सामान खाली उतरायचं. माळ्यावर टाकलेली भांडी खाली आल्यानंतर या फेरीवाल्यांचा भांड्यांना डाग देणाऱ्यांचा धंदा जोरात चालायचा सोबतीला कल्हई वाले होतेच, कल्हई वाल्यांनी कोपऱ्यात भट्टी लावली रे लावली की पूर्ण वाड्यातला संसार अंगणात उतरायचाचं भांड्यांना मरण नव्हतं. दिलखुलास हंसत खुशीने शीळ घालत तो भांड तापवायचा मग त्यात नवसागर टाकून आतून कापसाचा बोळा फिरवला की पातेल्यात चंदेरी दुनिया बरसायची. बोळा फिरवताना तो चिमट्याने पातेलं बादलीत बुचकळायचा आहाहाहा! तो चर्रर्रर्रर्र आवाज अजूनही कानांत घुमतोय. नंतर मग काय! ते पितळ्याच पिवळं, कळकट मळकट पातेलं, भांड आंतून चांदीचं व्हायचं. तास दोन तास भांड्याशी लढाई खेळणाऱ्या या कारागिराची पण चांदी व्हायची कारण त्याचा खिसा पैशाने फुगलेला असायचा. तो उठला रे उठला की! आमची कामट्या घेऊन भट्टी विस्कटून नवसागराचे तयार झालेले मणी शोधण्यासाठी हाणामारी सुरू व्हायची. श्रावणात फड्या नाग घेऊन “नागोबाला दूध “असा आरोळा ठोकणारा, झाकणाच्या टोपलीतल्या नागाला टपल्या मारून फडा काढायला लावणारा गारुडी आम्हाला ग्रेट वाटायचा. ग्रहणाचे वेध लागताचं “दे दान सुटे गिऱ्हान “म्हणून आम्ही खिडकीतून टाकलेले कपडे अचूक झेलणारा वर्ग आता गायब झालाय जग पुढे गेलय, पण मन मात्र मागे वळून म्हणतेय, ‘कुठे गेले हे सारे कारागीर, तो वासुदेव आणि फेरीवाले? मैत्रिणींनो पाह्यलंत कां तुम्ही त्यांना? दिसले तर त्यांना धन्यवाद सांगा हं! कारण एके काळी त्यांनी आम्हांला लाख मोलाची मदत केली आहे. म्हणून लेखात त्यांचा आवर्जून उल्लेख करतांना मन मागे मागे जातंय.
– क्रमशः भाग २७
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈