सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ काय काय विसरलो… कवी – अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून 

ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी ‘वदनी कवळ’ आणि 

श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll

*

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक,

फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो,

सार-सुधारस विसरलो ll२ll

*

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून,

तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर 

आवडीने खायला विसरलो ll३ll

*

हाताने वरण भात, ताक भात 

कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून 

तोंडात घालायला शिकलो ll ४ll

*

पाव भाजीवर अमूलचा 

जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची 

तुपाची धार विसरलो ll५ll 

*

पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस,

जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?? 

ह्या नातवंडांच्या प्रश्नाना उत्तर देताना पार अडखळलो ll६ll

*

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर 

ताव मारायला कधीच विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम,

टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll

*

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे 

तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले,

एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार मात्र विसरलो ll८ll

*

सँलड या भपकेदार नावाने 

झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी,

रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll

*

इटालिअन पिझ्झा, पास्ताची अन 

तेलात लोळणाऱ्या पंजाबी भाज्यांची चटक लागली,

आणि आळूचे फतफते पातळ भाजी,

भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

*

मठ्ठा, ताक, सार आता आवडेनासे झाले 

आणि फ्रेश लेमन ज्यूस,

सोडा किंवा लस्सी का नाही. ?? 

म्हणून विचारू लागलो ll११ll

*

साखर भात, गव्हाची खीर, लापशी 

इतिहास जमा कधीच झाली अन 

स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम 

स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

*

मसाल्याचे वास हातावर तसेच ठेवून,

पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो 

पण पाण्याने खळखळून 

तोंड धुवायला मात्र साफ विसरलो ll१३ll

*

फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना 

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो…

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments