श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.)

कृष्णा घरी आला. शाळेची बॅग घरात टाकून नारायण मंदिराकडे आला. त्याठिकाणी दादाभोवती बरीच मुलं जमली होती. हात छातीजवळ घेऊन मुलं म्हणत होती –

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे 

कृष्णा पण त्या मुलांसमवेत छातीजवळ हात घेऊन प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमवेत कृष्णा तल्लीन होऊन दादाचे म्हणणे ऐकत होता. काळोख पडू लागला तशी मुलं आपआपल्या सायकली घेऊन घरी निघाली. दादापण आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे झाला. त्याने दादाला आज बाईंनी घेऊन दिलेली बासरी दाखवली.

‘‘दादा, ही बघ माझ्या बापट बाईंनी बासरी घेतली.’’

‘‘अरे व्वा कृष्णा ! छानच आहे.’’

‘‘पण दादा, मला बासरी वाजीवता येईना, तुला येत का ?’’

‘‘थोडी थोडी येते’’

‘‘मग मला शिकीव नां’’

दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे सहा होल दाखवले. वरच्या तीन होलावर डाव्या हाताची बोट धरुन प्रत्येक होलावरील एक एक बोट कमी करत – सा रे ग म कसे वाजवावे हे त्याने दाखवले. बासरी फुंकावी कशी हे पण दाखवले आणि रोज बाकीची मंडळी घरी गेली की बासरी शिकवायचे मान्य केले. कृष्णा घरी गेला आणि दादाने दाखविल्या प्रमाणे बासरीवर सारेगम वाजवू लागला. बर्‍याच वेळा सराव केल्यानंतर त्याला थोडा थोडा सारेगम वाजवायला येऊ लागला. दुसर्‍या दिवशी दादाने खालचे तीन होल हळू हळू उघडून सारेगम उलट कसं वाजवाचं हे शिकवलं आणि कृष्णाचा हा रोजचा कार्यक्रम झाला. शाखेत जायचं, शाखा संपली की दादाकडून बासरी शिकायची.

एका महिन्यात कृष्णाने बापट बाईंना बासरी वाजवून दाखवली तेव्हा त्यांना कमाल वाटली. अविला काहीच वाजवता येत नव्हते. अविने बासरी आणली ती कपाटावर ठेवली ती परत हातातपण घेतली नाही. सहामाही परीक्षेत कृष्णा वर्गात तिसरा आला. बाईंना आनंद झाला. पाच महिन्यापूर्वी वर्गात तोंड न उघडणारा कृष्णा आता वर्गात सर्वांत मिसळू लागला.

दिवाळीत अवीचे बाबा पुण्याहून आले तेव्हा त्यांनी अविसाठी टीशर्ट, फुलपॅन्ट आणली तशीच कृष्णासाठी पण आणली. अर्थात बापट बाईंनी पत्राद्वारे आपल्या नवर्‍याला तसं कळवलं होत. बापट काकांनापण कृष्णा आवडला. त्याचा अभ्यास, त्याची बासरी याच्या ते प्रेमात पडले. शाळेच्या गॅदरींगमध्येपण कृष्णाने बासरी वाजवली. त्याची सर्वांनी प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेत कृष्णा संपूर्ण वर्गात पहिला आला. रिझल्ट नंतर मुख्याध्यापक सामंत सरांनी बापट बाईंना बोलावून घेतले.

‘‘बापट बाई, तुम्ही कमाल केलीत, सात-आठ महिन्यापूर्वी ज्या मुलाची तुम्ही काळजी करत होतात तो मुलगा वर्गात पहिला आला.’’

‘‘हो सर, मी खूप आनंदात आहे. तुम्ही म्हणाला होतात – त्याच्या बाई नव्हे आई व्हा, मी आई होण्याचा प्रयत्न केला.’’

‘‘हो बाई, तुम्ही यशस्वी झालात, मी पाहतोय रोज शाळेत येताना जाताना तो तुमच्या बरोबर असतो. माझ्या माहिती प्रमाणे मधला डबा सुध्दा तुम्हीच देता, हे पुण्य आहे बाई.’’ 

थँक्यू सर म्हणत बापट बाई बाहेर पडल्या. आज सामंत सरांनी त्यांच कौतुक केलं याच त्यांना समाधान वाटलं. कृष्णा सातवीत गेला. अवि पाचवीत गेला. कृष्णाचे रोज लवकर बापटांकडे येणे, न्याहारी, मग बाई आणि अवि समवेत शाळेत जाणे, दुपारी बापट बाईंच्या घरचा डबा, सायंकाळी परत घरी गेल्यावर शाखेत जाणे आणि मग बासरीची प्रॅक्टीस. सातवीतपण कृष्णा पहिला आला. शाळाचा रिझल्ट लागला आणि बापट बाई अविसह पुण्याला गेल्या. पुण्यात अविच्या बाबांनी लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूपूजा आणि बाईंची तब्येत तपासणीपण करायची होती. बाई कृष्णाला म्हणत होत्या – तू पण चल आमच्या बरोबर. पण कृष्णा म्हणाला – ‘‘बाबा येकटा आय इथं, मी इथं राहतो तुमी जावा’’

बापट बाईंना हल्ली लवकर थकवा येत होता. पुण्यात केलेल्या तपासणीत मधुमेह निघाला. बाईंच्या माहेरी आईलापण मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यावर बंधने आणली आणि औषधे लिहून दिली. दिड महिना पुण्यात राहून बापट बाई आणि अवि पुणे मालवण एसटीने मालवणात आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा थोडा पाऊस सुरु झाला होता. बापट बाई बसमधून उतरल्या, बाईंनी ब्रेड आणि दूध घेतले आणि दोघे भराडावर बिर्‍हाडी आले. दार उघडून आत आल्या आल्या बाई अविला म्हणाल्या – अवि आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा. कृष्णाला घेऊन ये. तो पर्यंत मी आंघोळ करते आणि तुमच्यासाठी खाणे करते. बाईंनी नळावरुन पाणी भरले आणि गॅसवर पाणी गरम करुन अविला दिले. अविने आंघोळ केली आणि सायकल घेऊन कृष्णाच्या घरी निघाला. बाहेर पावसाची भूरभूर सुरु होती. तसाच भिजत अवि गेला आणि सात-आठ मिनिटात परत आला. बाईंचे आत-बाहेर सुरु होते. कधी एकदा कृष्णाला पाहते असे झाले होते त्याला. अवि सायकल लावून घरात आला तो सांगत – ‘‘अगं आई त्या घरात दुसरेच कोणीतरी राहत आहेत. कृष्णा आणि त्याच्या बाबांनी हे घर सोडले आणि ते गावाला गेले.’’ बाई आश्चर्यचकित झाल्या.

‘‘काय ? पण कुठल्या गावाला ?’’

‘‘ते माहित नाही, पण त्या घरात आता माने म्हणून रहायला आलेत, ते म्हणाले शिंदेनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे रहायला आलो.’’

बाईंना वाटले मालवणात दुसरीकडे रहायला गेले असतील किंवा आजूबाजूच्या गावात कुठेतरी गेले असतील. दोन वर्षापूर्वी देवबाग सोडून मालवणात कसे आले तसे. पण बाईंना चैन पडेना. थोडा पाऊस कमी झाला तसा त्या म्हणाल्या, ‘‘अवि चल मी येते तुझ्याबरोबर आपण परत एकदा कृष्णाच्या घरी जाऊया.’’ बाई आणि अवि छत्री घेऊन चालू लागले. नारायण मंदिराजवळ बाई आल्या. चाळीच्या खाली मालक भेटले. त्यांना विचारले – ‘‘ओ शिंदे कुठे गेले माहिती आहे का?’’

मालक म्हणाले – ‘‘शिंदे त्यांच्या गावाक गेले. शिंदे म्हणा होते तेंचा लगीन ठरला हा. त्यांच्या गावच्या लोकांनी हेंचा दुसर्‍यांदा लगीन ठरल्यानी. म्हणून ते झिलाक घेवन गेले. आता ते थयसरच रवतले. झिलाक थयल्याच शाळेत घालतले असा म्हणा होते.’’

‘‘क्काय ?’’ बापट बाई चित्कारल्या.

‘‘ पण कुठल्या शाळेत ?’’

‘‘ता म्हायत नाय ओ, कराड सातारा भागात आसा खयचा तरी खेडेगांव, आता येवचे नाय ते. हयला तेलयाकडचा कामपण सोडल्यानी तेनी’’

‘‘हो का, बरं बरं. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला कळवा हां ! मी येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे – बापट. बरे येते मी.’’ 

बापट बाई आणि अवि बाहेर पडल्या. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला. बाई नारायण मंदिरात येऊन बसल्या. अवि एकसारखा कृष्णा केव्हा येईल गं म्हणून विचारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत बापट बाई पावसाकडे पाहत विचार करत होत्या.

कुठं असेल हा पोरगा ? कुठल्या शाळेत, कुठल्या गावात ? शिंदेंनी परत लग्न केलयं तर ह्याला धड जेवणतरी मिळत असेल काय? शाळा सुरु असेल ना याची ? एवढा हुशार मुलगा वाया जायचा. विचार करता करता बाईंच्या छातीत थोड थोड दुखू लागलं. त्यांनी अविला एखादी रिक्षा मिळते का पहायला सांगितलं. रिक्षा मिळाली आणि बाई आणि अवि घरी आले. घरी आल्यावर सुध्दा बाईंना अस्वस्थ वाटायला लागले. त्या त्यांच्या घराजवळ असलेल्या झांटयेच्या दवाखान्याकडे गेल्या. डॉक्टरनी त्यांना तपासलं.

‘‘बाई ! ब्लडप्रेशर फार वाढलयं, बर झाल तुम्ही लगेच आलात. आता मी इंजेक्शन देतो आणि एका महिन्याच्या गोळ्या देतो. रोज सकाळी एक गोळी घ्यायची. कसला विचार करताय का?’’

‘‘तसं नाही, आज सकाळीच प्रवास करुन आले ना !’’

‘‘ठिक आहे, काळजी घ्या. दगदग करु नका. आठ दिवसांनी पुन्हा दाखवायला या.’’ 

बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या.

 क्रमश: भाग – ३

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments