श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – बाईंनी कृष्णाला दाखवले -‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’ आता इथून पुढे )

बापट बाईंनी पाहिलं कृष्णा जवळ पाण्याची बाटली नव्हती. बाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली.

‘‘पी हे पाणी, भरपूर पाणी प्यायला हवं, आणि वर्गात नुसतं बसून रहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जायचं, बाथरुमला जाऊन यायचं, कळलं का ?’’

अस म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या अविच्या हाताला धरुन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करु लागला.

‘‘माय व्हती तवा डबा दित होती, आज खूप दिसानी चांगलं चुंगलं खायाला मिळालं, सांच्याला बाबा दमून येतो नी भाकरी बडवतो. भाजी हाटेलातून आणतो. कवातरी भात शिजवतो. मग भात आणि भाजी खायची. अस जेवण मला रोज रोज कुट मिळाया ? पोटात अन्न गेलं तर मी शिक्षण घेईन. अभ्यास करेन. पण मला मायची लय आठवण येते. किनीची पण आठवण येते. मग काय करायचं फक्त रडायचं. माय कुठं नाहीशी झाली, किनी नाहीशी झाली.’’ कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदुन आलं.

पाच वाजता शाळा सुटली तसा कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार एवढ्यात बापट बाई अविचा हात धरुन जवळ आल्या.

‘‘कृष्णा थांब, सोबत जाऊ. कुठं राहतोस तू?’’

‘‘रामेश्वराच्या देवळापाशी, तिथं एक चाळ हाय, तिथं र्‍हातो आमी.’’

‘‘बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भरडावर राहते. तुला माझं घर दाखवते. शाळेत जाताना थोडा लवकर ये. मग आपण एकदमच शाळेत जाऊ.’’

‘‘व्हयं’’ असं कृष्णा म्हणाला. वाटेतील एका बेकरीकडे थांबून बाईंनी दोन बिस्किट पुडे विकत घेतले. कृष्णाच्या हातात ते पुडे ठेवत म्हणाल्या, ‘‘बाबा किती वाजता घरी येतात?’’

‘‘लई रात झाल्यावर येतो.’’

‘‘मग तोपर्यंत काय करतोस?’’

‘‘काय न्हाई, बसून र्‍हाहतो.’’

‘‘असं बसून राहू नये कृष्णा, या पुड्यातील बिस्किटे खा आणि तिथे मुलं खेळत असतील ना तेथे खेळायला जा. उद्या मी तुला सहावीची पुस्तके आणि वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पुरा करायचा आणि मला दाखवायचा.’’

भरडावर आल्यावर बाई एका चपलाच्या दुकानाकडे थांबून त्यांनी कृष्णासाठी चप्पल घेतले. कृष्णा मनात म्हणाला – वर्गातल्या सर्वांच्या पायत चप्पल हाई पण माझ्या पायात काही नाही. आता सहावीत गेल्यावर बाईंनी चप्पल घेतलं. आता शाळंत जाताना मजा येईल.’’

भरडावर गेल्यावर बाईंनी आपले घर दाखवले. बाई म्हणाल्या –

‘‘ही सरनाईकांची चाळ, पुढं त्यांच औषधं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं मग आपण एकदम शाळेत जायचं, कळलं ?

‘‘व्हयं’’ म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून ऐटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटाचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करुन खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला –

‘‘कुठ राहतोस रे तू ?’’

‘‘इथं देवळाच्या मागं’’

‘‘बरं, नाव काय तुझं?’’

‘‘कृष्णा, कृष्णा शिंदे’’

‘‘हा. तर कृष्णा उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुले आम्ही सर्व इथं जमतो. रोज इथं यायचं.’’

‘‘हूं, येतो साहेब’’

‘‘साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं….’’

‘‘हा दादा उद्या येतो.’’

कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किट पुडा मिळाला, आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णाने घरी येऊन दिवा लागला. एकच बल्ब घरात होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला.

सकाळी लवकर उठून विहीरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबाने काल येताना पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्यावर बाबा कामावर गेला. आणि कृष्णा नवीन चपला घालून भरडाच्या दिशेने चालू लागला. बापट बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. अवि बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापट बाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरुन आत घेतलं. पटकन आत जाऊन दोन थाळीत दोन दोन चपात्या आणि दुधाचे दोन कप बाहेर आणले. आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात करा असं म्हणत आपली तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचे घर पाहत होता. बाईंचा आणि बाईंच्या नवर्‍याचा एक फोटो दिसत होता. एक कपाट होतं. त्याच्यावर रेडिओ ठेवला होता. एक कॉट होती. त्यावर गादी गुंडाळलेली दिसत होती. दोन चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं चटपटीत घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने अविकडे पाहत चपाती दुधात बुडवून खाल्ली. अविप्रमाणेच अंगणात नळावर जाऊन ताटली कप धुतला आणि घरात नेऊन ठेवला. तो पर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, अवि आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवाळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या दोन पॅन्टी, बनियन, दोन शर्टस् दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्याचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे खंडाळेकरांच्या दुकानातून सहावीची पुस्तके एक डझन वह्या, दोन पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स आणि हे सर्व ठेवण्यासाठी स्कूलबॅग विकत घेतली. कृष्णाला खूपच आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तकं घ्यायला कधीच जमली नसती याची त्याला कल्पना होती.

आता कृष्णा सर्व तासांना व्यवस्थित लक्ष देऊ लागला. सर्व तासांचे शिक्षक त्याच्यावर खूश होते. त्याचा अभ्यास चांगलाच होता. शाळा सुटली की तो बापट बाई आणि अवि बरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला -‘‘आरं नव चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण ?’’

कृष्णाने शाळेत बापट बाई आहेत त्यांनीच हे सर्व दिलं असं सांगितलं.

तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, – ‘‘आरं ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी समज. ती सांगल तसं वागायचं, तिला कधी तरास द्यायचा न्हाई आणि अभ्यास करायचा.’’ 

असचं एकदा शाळेतून येताना फोकांड्याच्या पिंपळाजवळ एक बासरीवाला काखेतील पिशवीत भरपूर बासर्‍या घेऊन विकायला आला होता. एक बासरी ओठांत ठेवून मधुर वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी माणसं, शाळेत जाणारी येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होती. त्याचे ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णाचे आणि अविचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेलेच. बापट बाई बरोबर चालताना ते दोघं मान मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. कृष्णाची पावलं रेंगाळत आहेत हे बापट बाईंच्या लक्षात आलं. बाईंच्या मनात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट धरुन बासरी विकत घेतली असती. बाईंच्या काळजात कालवा कालव झाली. बाईंनी मागे येत त्या बासरीवाल्याला म्हटलं –

‘‘कशी दिलीस रे बासरी ?’’

तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासर्‍या दाखवू लागल्या. बाई कृष्णाला म्हणाल्या – ‘‘कृष्णा तुला बघ कुठली आवडते यातली?’’

कृष्णा पिशवीतल्या सर्व बासर्‍या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला – अरे वाजीव की, कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मघा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी त्याचे पैशे दिले. अवि पण तशीच बासरी मागू लागला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली. पण त्या बासरीवाल्याकडे त्या पध्दतीची एकच बासरी होती. बाईंनी वेगळ्या प्रकारची एक बासरी घेतली आणि अविला दिली. त्याने अवि हिरमुसला झाला. तो एक सारखा कृष्णाच्या हातातल्या बासरीकडे पाहत होता. बाईंनी अविला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत, ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत अवि आई बरोबर चालला होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.

क्रमश: भाग – २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments