सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(1) अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर (2) सन्मानास कारण की — सुश्री मीरा जैन (3) पुन्हा कधीतरी — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

☆ अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नुकतंच त्याचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं होतं, आणि एक नवा ‘ सामान्य ‘ माणूस म्हणून तो या जगात प्रत्यक्ष पाय टाकू पहात होता. 

एक दिवस तो एका जगप्रसिद्ध मंदिरात गेला.. ‘ नवं आयुष्य सुरु करण्यापूर्वी देवाच्या पाया पडावं आणि त्याचे आशिर्वाद घ्यावेत  ‘ असं त्याला मनापासून वाटलं होतं. पण आत जाताच तिथे लागलेली लांबलचक रांग पाहून तो चक्रावूनच गेला – “ बाप रे … इतकी मोठी रांग ? “ तो नकळत म्हणाला. 

“ हो रे भावा.. अशी खूप मोठी रांग लागणं हे रोजचंच आहे इथे.. “ शेजारी उभे असलेले एक गृहस्थ आपणहून त्याला म्हणाले. 

“ अशाने तर देवाचं दर्शन होईपर्यंत संध्याकाळ होईल इथेच .. “ घड्याळ बघत तो वैतागून म्हणाला. 

“ अरे बाबा, संध्याकाळ कसली.. रात्र जरी झाली तरी त्यात विशेष काही नाही. “ 

“ आणि ती रांग? तिथे काय आहे ? “….. या रांगेला समांतर, पण जराशी अंतरावर असलेली तशीच एक रांग पाहून त्याला आश्चर्य वाटलं .. “ त्या रांगेतले लोक जरा जास्त शिकले-सवरलेले आणि श्रीमंत असावेत असं वाटतंय मला . “

 .. ‘ आता या मुलाला वास्तव कळायलाच हवे ‘ या हेतूने, त्याच्याहून वयस्क असणारे ते गृहस्थ शांतपणे त्याला म्हणाले … “ असतीलही त्या रांगेतली माणसं थोडी श्रीमंत… पण बाळा, ही रांग नावाची गोष्ट आहे ना ती प्रत्येक माणसाला त्याचे स्थान … किंवा योग्यता म्हणू या … दाखवून देतेच . तीही एक रांगच आहे

— फक्त  “paid line “…. 

“paid line ? – पण ती रांगही या रांगेइतकीच लांब आहे की.. मग तरी अशी वेगळी का ? “

“ ते … ते काय आहे ना बाळा… या सामान्य.. म्हणजे general रांगेत उभं रहावं लागू नये ना, एवढ्याचसाठी लावलेली आहे ती वेगळी ‘स्पेशल’ रांग…. फक्त तेवढ्याचसाठी ही धडपड …पैसे देऊन …. बाकी काही नाही . पण शेवटी उभं रहावं लागतं आहे रांगेतच “ …… 

मूळ हिंदी कथा – ‘आम छटपटाहट’ – कथाकार – श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ सन्मानास कारण की (अनुवादित लघुकथा) — सुश्री मीरा जैन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“ वृद्धाश्रमाचे सर्वश्रेष्ठ संचालक “ हा एक मानाचा समजला जाणारा सामाजिक सन्मान यावर्षी कुणाला मिळणार हे त्या कार्यक्रमात घोषित करण्यात येणार होते. त्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची आणि अर्थातच त्यांच्या आप्तांची बरीच गर्दी तिथे जमलेली होती. 

अखेर एकदाचा तो क्षण आला. निर्णायक मंडळाने या सन्मानाचे मानकरी म्हणून श्री. गौतम यांच्या नावाची घोषणा केली —– आणि —- आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर संचालकांमध्ये अस्वस्थ कुजबुज सुरु झाली. ज्या एका संचालकांना स्वतःलाच हा सन्मान मिळणार याची पुरेपूर खात्री वाटत होती, त्यांचा राग तर अनावर व्हायला लागला होता….. “ काय ? त्या गौतमला हा सन्मान मिळतो आहे ? – हे कसं शक्य आहे ? – माझा वृध्दाश्रम तर इतका स्वच्छ असतो कायम, आणि इतरही खूप सोयी-सुविधा आहेत तिथे. एवढंच नाही, तर मी जेव्हापासून त्या आश्रमाचा कारभार सांभाळायला लागलो आहे तेव्हापासून तिथल्या व्यवस्थेत सातत्याने काही ना काही सुधारणा होताहेत. म्हणूनच आधी जिथे फक्त दहा वृद्ध होते, तिथे आता पन्नास वृद्ध रहाताहेत. आणि या गौतमचा आश्रम — तिथे एकूण व्यवस्था कशी काय आहे कोण जाणे , कारण मी कधीच तिथे गेलेलो नाही. पण आकडे मात्र असं सांगताहेत की गौतम जेव्हापासून तिथला कारभार पाहतोय, तेव्हापासून वृद्धांची संख्या सतत रोडावत चालली आहे. आता तर फक्त वीस वृद्ध उरलेत म्हणे तिथे….. नक्कीच काहीतरी गडबड असणार तिथे, ज्यामुळे ही संख्या सारखी कमीच व्हायला लागली आहे. तरी त्याचा सन्मान ???? नक्कीच काहीतरी चमचेगिरी केलेली असणार …. नाहीतर त्या गौतमने निर्णायक मंडळाचे खिसे गरम केलेले असणार …. दुसरं काय ? “ 

तेवढ्यात ट्रॉफी घेण्यासाठी श्री. गौतम मंचावर आले. निर्णायक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांचे अगदी मनापासून भरभरून कौतुक करतांना सांगितले की — “ आम्ही तुम्हा सर्वांच्या संस्थांचे निरीक्षण केले. प्रत्येक ठिकाणी वृद्धांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली जाते हे आम्ही पाहिले. पण या सन्मानासाठी गौतमजी यांचं नाव  निवडलं जाण्याचं कारण हे आहे की,, आज त्यांच्या संस्थेत फक्त निपुत्रिक वृद्ध तेवढे रहात आहेत. बाकीच्यांना त्यांच्या मुलाबाळांबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी स्वतः अथक प्रयत्न केले आहेत – करत आहेत, आणि त्यांना परत स्वतःच्या घरी पाठवण्यात त्यांनी अभूतपूर्व असे यशही मिळवलेले आहे. आणि हे त्यांचं काम मुळातच खूप मोठं आणि अद्वितीय, अद्भुत म्हणावं असंच आहे. “ —

मूळ हिंदी कथा – ‘सन्मानकी वजह’ – कथाकार – सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ पुन्हा कधीतरी (अनुवादित लघुकथा) — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

‘‘साधारण किती पैसे मिळतील?” अयोध्या प्रसाद, ऊर्फ ए.पी.च्या बायकोने विचारलं. पगार वाढ होणार अशी घोषणा झाली होती, आपल्याला किती ॲरिअर्स मिळतील याचा ते दोघे हिशोब करत बसले होते. 

‘‘मिळतील बहुतेक चोवीस-पंचवीस हजार…”

‘‘फक्त एवढेच?” त्याच्या हातात चहाचा कप देत तिने विचारलं. 

‘‘हो, टॅक्सही कापला जाईल ना गं.”

‘‘हो तर, तुम्हा लोकांचा एक पैसाही लपून रहात नाही. सगळ्यात आधी, आणि तुम्हाला न विचारताच टॅक्स कापून घेतात.”

शेजारीच अभ्यास करत बसलेल्या पम्मीचं लक्ष बहुतेक त्या दोघांच्या बोलण्याकडेच होतं… ‘‘बाबा, आता तरी मला सायकल आणता येईल ना?” तिने मध्येच विचारलं. 

‘‘हो बाळा, नक्की आणता येईल.”

‘‘पण मी गिअरवाली सायकलच घेणार हं!”

‘‘नको, आत्ता साधीच घे बाळा. गियरवाल्या सायकलची किंमत किती जास्त सांगताहेत, ऐकलंस ना? फार महाग आहे ती. दहा हजारांपेक्षाही जास्त किंमतीची.”

‘‘आई, घ्यायची असली तर गियरवालीच घ्यायची. मला साधी सायकल नकोय. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे गिअरवाली सायकल आहे, मग फक्त माझ्याकडेच का नाही?”

‘‘ठीक आहे. गियरवालीच घेऊ या. पण या वर्षीही तुला ‘ए’ ग्रेडच मिळाली पाहिजे… तरच…” ए.पीं.नी तिला अट घातली. 

‘‘तुम्ही गियरवाली सायकल घेऊन दिलीत ना, तर नक्कीच मिळेल यावर्षीही ‘ए’ ग्रेड.’’

‘‘तुम्ही तर काय हो? विनाकारण डोक्यावर बसवताय तिला…”

‘‘अगं एकतर मुलगी आहे आपली. आणि सायकलने जायला लागली, तर बसचे पैसेही वाचतील ना,” ए.पीं.नी हळूच बायकोला म्हटलं. 

‘‘बरं, मी काय म्हणत होते… यावेळी आईंना ‘गुजरात दर्शन’ सहलीला पाठवायचं का? गेल्या तीन वर्षांपासून म्हणताहेत त्या. पण दरवेळी काही ना काही सबब सांगून मी त्यांचं म्हणणं टाळते आहे.”

‘‘एकूण किती खर्च सांगताहेत?”

‘‘आठ हजारात होईल सगळं धरून, आणि मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या दोन मैत्रिणी चालल्यात या ट्रीपला. दोघी येऊन सांगून गेल्या तसं. आई म्हणत होत्या की त्या दोघींची सोबत असली, तर काळजी करण्याचं काही कारणच असणार नाही.”

‘‘कधीपर्यंत करावं लागेल बुकींग?”

‘‘अजून दोन आठवड्यांची मुदत आहे. तोपर्यंत ॲरिअर्स मिळतीलच ना? आणि समजा नाही मिळाले, तरी ते गजानन-ट्रॅव्हल्सवाले आपल्या ओळखीचे आहेत. थोडा जास्त वेळ देतील ते आपल्याला.” 

‘‘ठीक आहे. तूच त्यांच्याशी बोल, आणि बुकींग करून टाक.”

‘‘आणि हो… शक्य असेल तर आणखी एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे.” 

‘‘कोणतं काम?”

‘‘माझं मंगळसूत्र तुटलंय्. गेल्या दिवाळीत दुरूस्त केलं होतं, पण आता परत तुटलंय्. खरं तर त्याची चेन बरीच झिजून गेली आहे. सोनार म्हणत होता की आणखी एक-दोन ग्रॅम सोनं घातलं, तर ती पक्की होईल.” 

‘‘म्हणजे ६-७ हजार तर नक्कीच लागतील.”

‘‘हो, हल्ली सोन्याचा भाव किती वाढलाय. मी नुसती काळी पोत वापरते आहे आता. पण कुठे बाहेर जायचं असेल, तर ते बरं नाही वाटत.”

‘‘घे मग करून तसं,” ए.पी. म्हणाले, आणि त्यांनी हिशोबाचा कागद बाजूला ठेवून दिला.

चहाचे कप उचलून बायको आत निघून गेली. पम्मी पुन्हा अभ्यास करायला लागली. ए.पी. गुपचुप आतल्या खोलीत गेले… ‘आता हे कपडे वापरायचे नाहीत’ असं ठरवून, कपड्यांचं जे एक गाठोडं त्यांनी बांधून बाजूला काढून ठेवलं होतं, ते उचलून घेऊन त्यांनी उघडलं. एवढ्यातच त्यात टाकलेल्या दोन पॅंटस् काढून, त्या उजेडात नेऊन त्यांनी नीट पाहिल्या… चांगल्या दोन-चारदा झटकल्या… आणि ‘आता तुमचा नंबर पुन्हा केव्हातरी’, असं मनातच म्हणत, इस्त्रीला द्यायच्या कपड्यांच्या बॅगेत त्या नेऊन ठेवल्या. 

मूळ हिंदी कथा – ‘फिर कभी’ – कथाकार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments