श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 2 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसाउजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच, तरी अंधार होईपर्यंत ती तिला तसीच दाबून ठेवते.) — इथून पुढे —

अण्णा पहाटे-पहाटे बैलगाडी जुंपून कामावर निघतो. अंतरा अंतरावर असणाऱ्या सात-आठ खोपीतला एक गडी आणि एकेक बैलगाडी. अशी वरात निघते. एकापाठोपाठ एक… त्यापाठोपाठ असणारी मुकादमाची बुलट. लांब लांब जाणारा बुलटचा आवाज… बुडबुडऽ… बुडबुडऽ… बुड बुडऽ… मग तळ रिकामा होतो. 

सुलीच्या घरातली एकुलती शेळी गाभण आहे. दिवस भरलेत तिचे. विल वाटतंय एक-दोन दिवसांत. शेळीचं बाळंतपण करण्यातही सुली तरबेज आहे. त्याची चिंता तिला नाही. पण ढिम्म् दुपार तिला खायला उठते. तळावर क्वचित कोणी माणूस. शेरडू, करडू, दुभत्या गायीम्हशी. एखांदी म्हाताकोतारी बाई. जनावरांच्या उसाबरीसाठी राह्यलेली. एवढेच सोबती.

शेरड्यांची उसाबर आवरल्यावर सुलीला भर दुपार उदास, एकलकोंडी वाटते. वारा गप्प गप्प होतो. वातावरण गुढगंभीर राहतं. मधेच एखादं शेरडीचं करडू आईच्या आठवणीनं कातर होऊन ओरडतं नि गंभीर दुपारच्या पोटात कुणीतरी सुरा खुपसल्यासारखं वाटतं. उगी मन अस्वस्थ होतं. काही सुचत नाही. कुठं जावावं? कुणाबरोबर बोलावं? सुली कंटाळते. हळूहळू दुपार टळते. उन्हं मवाळू लागतात. मग कारखान्यावरली उंडगी पोरं मोठ्या रस्त्यावरून हेलपाटे घालतात. पानपट्टी भोवताली टोळकं करून मावा खावून पिचीपिची थुकत बसतात. जातायेता खोपीत कुठं कोण दिसतंय का तपासून बघतात.

अलीकडं एका टोळक्याला सुलीचा शोध लागलाय. वाटेवरून तिरकं तिरकं बघत ती हेलपाटे घालतात. सुली दिसताच तोंडात बोटं घालून शिट्ट्या मारतात. विनाकारण गाडीचा हाॅर्न वाजवतात. अलीकडं त्यांचा त्रास खूपच वाढलाय. कधी कुठलं हिप्पीवालं पोरटं येऊन हात धरंल सांगता येत नाही. पण सुली घरात कुणालाच सांगत नाही. बोलत नाही. वाटेवरल्या पोरांच्या नजरेपासून लपत-छपत त्रास सहन करत रहाते. घरातलं सैपाकपाणी, जनावरांची उसाबर करत रहाते. अण्णाला काही कमी पडू देत नाही.

गावाकडं हुती तवा सुलीची आज्जी म्हणत होती, “पोरगी न्हातीधुती झालीय अण्णा.. अवंदा उजवून टाक.. ज्याचं धन जाऊंदे त्याच्या घरी!” 

तिनं लगोलग तेंच्याच टोळीतला एक नवरा मुलगा शोधून काढला. आज्जीच्या भणीकडनं लांबणं पावन्यापैचा संमंद होता. नंदू त्याचं नाव. सहा फुट उंचीचा नंदू आडदांड होता. ओबडधोबड हातपाय आणि भरीव मनगट असलेला ह्यो बापय खडबडीत तोंडाचा होता. अंगावर, हाता-पायांवर भरपूर केस होते. काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं. ऐन पंचवीशीतील नंदू कामाला वाघ होता. पहाटे पहाटेला कोयता घेऊन शेजंला भिडला की टण-दीड टण ऊस आडवा केल्याशिवाय मागं हटत नव्हता. हेच्या कोयत्याचा फडात कायम पयला नंबर. कोयता घेऊन ह्यो फडातनं बाहेर निघाला, की बारकी पोरंटोरं त्याला घाबरायची.

सुलीही त्याच्यापासून दबूनच असायची. त्याचे तांबरलेले डोळे बघितले की तिला भीतीच वाटायची. नवरा म्हणून काय, पण तो तिला शेजारी म्हणूनही आवडत नव्हता. उभ्या आयुष्यात ती त्याच्याशी कधी बोलली नव्हती. आजीची अशी समजूत होती की, तो कामाला वाघ आहे. त्याच्या मागं पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला दोन-दोन बायका पुरत नाहीत. पाण्यागत पैसा मिळवील त्यो. राणीगत ठेवील पोरीला. अशी आज्जीची समजूत होती.

जोडीदार कसा असावा याचीही तिने काही मनातल्या मनात स्वप्ने बघितलेली. नवरा मुलगा गोरागोमटा. उंचापुरा. भरदार छातीचा. मानेवर केस रूळणारा. नाका-डोळ्यानं देखणापान असावा… असं तिला वाटत होतं.

आज्जीनं, नंदूच्या स्थळाची गोष्ट एकदा अण्णांच्या कानावर घातली. नंदूबद्दल ती गुणगान गाऊ लागली. तर अण्णा म्हणालं, 

“अाजून कुठं मोठी झालीय ती, ल्हान पोरच हाय!”

“ल्हान का असतीया, हिच्याबरोबरीच्या पोरी बगजा.”

“नेमापरमाणं अठरा वरसं तरी हुंदेल. जाऊंदेल अजून दोन पावसाळं!”

त्यावर आज्जी म्हणाली, “हिच्याबरोबरच्या पोरी बगजा. लग्नं हून दोन-दोन पोरंबी झाली तेंनला!”

“जगाचं काय असायचं ते आसुंदे, माज्या पुरगीचं लगीन वय पुरं झाल्यावरच हुईल!” असं अण्णानी निकराचं सांगितल्यावर आज्जी पुढं काय बोलणार? गप्पच झाली ती. 

खूप खूप बरं वाटलं सुलीला. बापाच्या मयेनं गळा दाटून आला. कसायाच्या तावडीत घावलेलं कोकरू हातातनं सुटावं आणि लांब जंगलात पळून जावावं, तसं सुलीला वाटलं.

आठ वाजून गेले असावेत. अजून कसा आला नाही अण्णा? फडावरलं कोणच गाडीवान आल्यालं न्हाईत खरं. त्यामुळं गाड्या खाली झाल्या नसाव्यात… निदान मुकादम तरी फटफटीवरून यायला पायजे होता. काही निरोप-बिरोप घेऊन. त्योबी अजून आलेला नाही!

मांडीवर झोपलेल्या आपल्या धाकल्या भावाला थोपटत, त्याचे मऊसर केस कुरवाळीत सुली विचार करीत होती. बाळाला आता झोप लागलेली. तरी वेळ जावा म्हणून ती त्याला थोपटीत होती.

आजूबाजूच्या खोपटातल्या चुली विझत चालल्या होत्या. क्वचित कुठे हालचाल जाणवत होती. बोलण्याचा आवाज बंद झाला होता. दारापाठीमागली शेळी रवंथ करीत खाली बसली होती. तिने आता डोळे मिटले होते. चुलीवर ठेवलेली चिमणी एकाकी जळत होती. वाऱ्याच्या झुळकेवर तिची ज्योत आळोखे-पिळोखे देत होती. तीही आता आळसावली होती.

पोराला हाथरूण टाकायला म्हणून सुली आत गेली. कुडाशेजारची सप्पय जागा तिने निवडली. खाली पडलेलं खुरपं आणि कोयता तिने कुडाच्या कामठ्यात अडकवून ठेवला. खाली अंथरलेल्या पटकुरावर तिने एक मऊमऊ दुपटं अंथरलं. आणि त्यावर बाळाला घातलं. 

लांबनं कुठूनतरी बुलटचा आवाज येत होता. हळूहळू तो मोठा होऊ लागला. बुडबुडऽ.. बुडबुडऽ.. बुड बुडऽ… सुलीनं वाकून खिडकीतनं बघितलं. काळ्यामिट्ट अंधाराला चिरत बुलटचा फोकस पुढंपुढं सरकत होता. गाडीच्या आवाजावरनं सुलीनं ताडलं. ही मुकादमचीच गाडी हाय. उगीच घाबरल्यागत झालं तिला. ती चुलीजवळ जाऊन बसली. बाहेरचा अंदाज घेऊ लागली.

गाडी आली ती सुलीच्या दारातच येऊन उभी राह्यली. बाहेरून हाळी आली, 

“सुलेऽ.. ये सुलेऽ…!” 

पहिल्यांदा तिनं हाक ऐकून, न ऐकल्यागत केलं. पुन्हा दोन-तीन हाळ्या आल्या. आता बोललंच पाहिजे. ती वाकून पुढे झाली. दाराच्या वर्तुळातून तिचे दोन डोळे मांजरागत चकाकले. भितभित तिनं विचारलं, 

“कोण हाय त्ये!” 

“आगं मी हाय, मुकादम! तुझ्या अण्णाला यायला उशीर हुईल. टायर फुटलीया गाडीची. सकाळपतूर हुईल दुरूस्त. रातभर तिथंच थांबावं लागंल. जिवून झोप म्हणून सांगितलंय त्येनं!”

“हां.. हांऽ.. बरंऽ..बरंऽ..!”

“बाकी समद्या गाड्या कशा आल्या न्हाईत मग?” न राहून सुलीनं भीतभितच विचारलं. 

“येतील आत्ता एवड्यात. ह्या मुरगळ्यावर आल्यात नव्हंका!” असं म्हणून मुकादमानं गाडीला किक मारली. आपल्या खोपीपशी जाऊन तो थांबला.

आता अण्णा सकाळीच येणार, रात्रभर आपुन खोपीत एकटंच, या धास्तीनं सुलीच्या अंगाचा थरकाप उडाला. यापूर्वी कधीच आसं झालं नव्हतं. अण्णा नसलं तरी आई हमखास घरात असायची. त्यामुळं तिला निर्धास्त वाटायचं. पण, अशी वेळ कधी आली नव्हती. ती घाबरून गेली. पाय थरथरू लागले. काय करावं? आजच्या दिवस शेजारच्या कुणाच्यातरी खोपीत झोपायला जावावं का? पर आपली खोप, जनावरं वार्‍यावर सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला झोपाय जावावं. त्यात ती शेरडी एक व्याला झालीया. कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments