? जीवनरंग ?

☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 1 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆ 

आई, अगं कुठल्या विचारात हरवली आहेस एवढी? तुझी तब्येत तर बरी आहे ना? रोज मी ऑफिसमधून येतो तेव्हा तू बागेत असतेस आणि आज गाडीचा हॉर्न ऐकूनही तुझ्याकडून काहीच कसा प्रतिसाद नाही? गाडीतून उतरून फाटक उघडून मी तुझ्या पर्यंत आलेलही तुला कळलं नाही?  काय झालं सांग की ग, डोळ्यात पाणी का ग ?स्नेहा काही बोलली का तुला सांग लवकर माझा जीव घाबरा झाला आहे.

अरे ,शेखर  मला बोलू देशील तर ना? किंचित हसत नलिनीबाई म्हणाल्या, ‘तुझ्या प्रश्नांची सरबत्ती थांबेल तेव्हा मी काही बोलेन ना. आणि माझी स्नेहा नाही  हो कधी काही मला बोलत. आज पाच वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण आमच्या दोघीत कधीतरी काही कुरबुर झाल्याचं ऐकलं तरी का?’

‘अगं मग  झालं तरी काय? तू अशी उदास का ?आणि डोळ्यात पाणी का?’

‘ही कातरवेळ जीवाला खूप हुरहुर लावून जाते बघ. रमले होते जुन्या आठवणीत आणि डोळे कधी भरून आले लक्षातही आले नाही .काळजी करण्यासारखं काहीच झालं नाही खरच!’    

‘आई, तुम्हाला बाबांची आठवण झाली का? त्यांना जाऊनही  आता वर्ष होईल.’ स्नेहाने कडेवरच्या छकुलीला खाली उतरवत विचारलं.     

‘ खरं सांगू का यांची आठवण नाही आली मला. माझ्या माहेरची, आई-बाबांची ,तिथल्या सगळ्यांची आठवण आली आणि डोळे वाहू लागले.’

‘आई , आज पर्यंत बाबांच्या धाकामुळे तू आम्हाला आमच्या आजोळबद्दल कधीच काही सांगितलं नाहीस, मे महिन्याच्या सुट्टीत माझे सारे मित्र आजोळी जायचे पण मला आणि शरयूला हे सुख कधीच अनुभवायला मिळाले नाही.’

‘आई, आज तरी आम्हाला सांग ना असं घडलं तरी काय? प्लीज सांगा ना मन मोकळं कर’.     ‘शेखर, स्नेहा तुम्ही म्हणताय तर सांगीन मी माझ्या माहेर विषयी पण त्याआधी आपण सारं आवरून घेऊ. ही छकुली मग झोपेला येईल . मलाही  आठवणींचा कप्पा क्रमवार लावायला जरा वेळ मिळेल.’

‘अरे जावई गेलेत टूरवर शरयू पण इकडेच येणार आहे  रात्री. तेव्हा दोघांनाही एकदमच सांगते .नाहीतर तुला एकट्याला सांगितले म्हणून रुसु बाई रुसुन बसेल लहानपणासारखी.’ 

काय सांगेल आई? या प्रतिक्षेत दोन तास कधी निघून गेले कळलंच नाही. आई लवकर ये. सगळं काही आटपल आमचं. स्नेहा, शरयू मुले झोपली ना? या पटकन तुम्ही दोघी पण.’

शेखर,” अरे मोठा झालास तू आता एका मुलीचा बाप झालास, एवढा उतावीळपणा शोभत नाही हो. किंचित हसत नलिनीबाई म्हणाल्या.

‘आई ,गेली कित्येक वर्ष मला हे ऐकायची उत्कंठा होती. आता नाही धीर धरवत. हो की नाही ग शरयु?

‘हो ग आई ,खरय दादा म्हणतोय ते.

आमच्या लग्नापासून या कहाणीला सुरुवात झाली. चारचौघींसारख ठरवून आमचं लग्न झालं .मुलाला उत्तम सरकारी नोकरी, राहता बंगला, सुस्वभावी असे सगळे गुण असणार्याव या स्थळात एक उणीव म्हणजे मुलाचे आई-वडील दोघेही एका अपघातात नुकतेच निवर्तले होते .आणि त्यांच्या शिवाय मुलाला कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते. मुलगा एकटा होता .मुलाला बाकी कुटुंब नसलं, तरी आता आपण सगळेच  त्याचे कुटुंबीय या विचाराने माझ्या बाबांनी या स्थळाला हो म्हटलं. आईची कुरकुर चालली होती की एक तर मुलीला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल आणि तिचे कोडकौतुक  पण काही होणार नाही .पण शेवटी माझ्या बाबांनी तिला समजावलं. मी तर काय काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते, मला हे मनापासून आवडले होते.  सगळ काही ठरलं म्हणजे माझ्या बाबांनी ठरवलं.मी सासरी यायला निघाले म्हणजे वरातीची तयारी झाली होतीच. वातावरणातील सकाळचा उत्साह कमी होऊन काहीशी उदासी आली होती .हा ताण कमी व्हावा या उद्देशाने यांच्याकडे माणसेच कशी नाहीत ,नातेवाईक  नाहीत यावरुन  कोणीतरी चेष्टेत काहीतरी बोलले.  बोलण्याच्या भरात ही चेष्टा वाढत गेली., तसतसा यांच्या रागाचा पारा चढत गेला यांचा प्रचंड तापट स्वभाव मला त्या वेळी प्रथम कळला. हे एक तापट माझे बाबा सातपट  तापट.तिकडे दुर्वास तर इकडे असतील तर  इकडे जमदग्नी ! शब्दाने शब्द वाढला, मस्करीची कुस्करी झाली .शेवटी ह्यांनी मला पुढे बोलावले आणि म्हणाले ,”नलिनी झाला प्रकार तू पाहिला आहेसच. तुला सासरी यायचं नसेल ,माझ्या बरोबर संसार करायचा नसेल, तर तो निर्णय तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर घे .मात्र एक निश्चित लक्षात ठेव की आता घेशील हा माहेरचा शेवटचा निरोप असेल. मी तर पुन्हा इथे पाऊल टाकणारच नाही. पण तुलाही  इथे कधी  येऊ देणार नाही. आत्ता या क्षणी तू निर्णय घेऊ शकतेस. पण एकदा निर्णय घेतला की माघार नाही .मंडपात एकदम शांतता पसरली.आईने मला गच्च मिठी मारली आणि  डोळ्याला पदर लावत ती क्षणार्धात आत निघून गेली .वडिलांनीही थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला ,अश्रूंच्या पडद्यामुळे आम्ही एकमेकांना नीट पाहू ही शकलो नाही. तेही आत निघून गेले .माझ्या ताई ,माई आपल्या पती राजांसह रडू दाबत उभ्या होत्या .एकोणीस वीस वर्षाच माझं वय आणि एवढा मोठा निर्णय मला क्षणात घ्यायचा होता. लग्न तर झालं होतं आणि आई-बाबा आत निघून गेल्यामुळे त्यांचा विचार अप्रत्यक्षपणे मला कळला होता. त्या वेळची सामाजिक परिस्थिती ,मनावर झालेले संस्कार त्यामुळे मी परिस्थिती ओळखून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि आमची वरात सासरी आली .बाकी स्वभाव म्हणशील तर उत्तम पण एकदा राग आला की कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नसत .राग थंड झाला की चूक मान्य  करून काहीच उपयोग नसे  होणारी गोष्ट तर होऊन गेलेली असे. त्यांचा मूड कशावरून बिघडेल हे ही सांगता यायच  नाही.  त्यांच्या त्या तापट स्वभावाचे खूप चटके मी सुरवातीच्या काळात सहन केले. एरवी स्वभावाने लाख असणारा हा माणूस पण हा विषय काढला की कठोरात कठोर होत असे. त्यांचा शब्द मात्र त्यांनी अगदी आयुष्यभर पाळला. मला कशाची कमी पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली माझ्यावर, तुमच्यावर, या घरावर, अमर्याद प्रेम केलं.

माझ्या बाबांनी, दादाने, भाऊने माझ्या दोघी बहिणीनी दिलजमाईचे खूप प्रयत्न केले .पण कशाचा काही उपयोग झाला नाही. लग्नानंतर वर्षाच्या आतच मला दिवस गेले, त्या वेळेला आईला भेटायची अनिवार तहान मला लागली होती .पण ते घडलेच नाही. यांच्याकडे पोस्टात टाकायला दिलेली पत्र त्यांची आलेली पत्र मला परवा यांचे कपाट आवरताना लॉकर मध्ये मिळाली, तेव्हा मला हा सारा उलगडा झाला .

या शरयूच्या लग्नानंतर मात्र हे खूप उदास असत .मी कारण विचारलं तर माझा हात हातात घेऊन  रडायलाच लागले. वयानुसार स्वभावातला रागीटपणाही  खूप कमी झाला होता .”मला म्हणाले तू न केलेल्या शुल्लक गोष्टीची सजा मी तुला आयुष्यभर देत आलो”. तुझ्या जागी दुसरी कोणी कजाग बाई असती तर तिने केव्हाच आपलं वचन मोडले असतं. आज माझ्या लेकीचं लग्न झाल्यावर मला कळतय, काळजाचा तुकडा काढून देणे म्हणजे काय ,शरयूच्या सुदैवाने तिचे सासर ,माहेर नांदत गोकुळ आहे. पण तू हे सारं कसं सहन केलंस? मी स्वतःला एवढ संवेदनशील समजतो, पण तुझे दुःख ,तगमग मात्र मला कळत असूनही मी न कळल्या सारखा दाखवलं .,आणि खोट्या अभिमानापायी  तुला तुझ्या प्रिय माहेर पासून मी तोडलं आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय, आपण सगळेच बाबांकडे जाऊ ,मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनाने मला माफ करतील.

क्रमश: १

© सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे

मो. –  9762271250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments