सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 2 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

(अप्पासाहेबांनी अगदी हौसेने त्याला लागून पार बांधला होता. आम्ही हळूहळू चालत त्या पारावर जाऊन बसलो.)  इथून पुढे —

‘‘ तुझ्या वहिनीने दीपकला पैशांची जमवाजमव करायला सांगितली होती. तुला कदाचित्  माहिती नसेल, पण रिटायर झाल्यावर मिळालेल्या सात लाखांपैकी दोन लाख रुपये मी घरावर खर्च केले होते… अर्धा प्लॉट रिकामाच होता, त्यावर बांधकाम करून घर आणखी वाढवलं होतं, आणि चार लाख रुपये दीपकला दिले होते.”

‘‘ चार लाख? इतकी मोठी रक्कम त्याला देऊन टाकलीत तुम्ही?”

“ हो ना. काय झालं… एम्.ई. झाल्यानंतर सूरजला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे त्याच्याबद्दलची काळजी मिटली. पण बी.ई. झाल्यावर दीपकला नोकरी मिळत नव्हती. तो तर एम्.बी.ए. पण झालेला आहे. पण तरीही कितीतरी दिवस त्याला नोकरी मिळाली नाही. मग आता त्याने एम्.आय्.डी.सी. मध्ये स्वत:चं एक प्रॉडक्शन युनिट सुरू केलंय. बँकेकडून त्याने थोडं कर्ज घेतलं, आणि चार लाख मी दिले.”

‘‘ बरं. पण मग आता पैसे देण्याबद्दल काय म्हणाला तो?”

‘ म्हणाला… की आत्ता दोन लाख रुपयांची सोय करणं त्याला शक्य नाहीये… ‘ अजून माझा व्यवसाय नवा आहे. आणि दरमहा बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठीच खूप आटापिटा करावा लागतोय् अजून मला.’ ”

‘‘ अरे बापरे… मग सूरज…?”

‘‘ सूरजने तर आधीच सांगून टाकलं होतं, की त्याने त्याच्या सोसायटीकडून आणि प्रॉव्हिडंड फंडातूनही कर्ज काढलं, तरी पन्नास हजार रुपये मिळणंही कठीण आहे.”

‘‘ पण अप्पासाहेब, मी तर तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय ना, की पैशांचा काही प्रश्न असेल तर मला सांगा म्हणून. नोकरीत असतांना तुम्ही इतक्या संस्थांना मदत केली आहेत, की तुमचं नुसतं नाव सांगितलं तर तीन लाख रुपये सहज गोळा होतील. फक्त सांगायचाच अवकाश…”

‘‘ ही गोष्ट तुझ्या वहिनीने जेव्हा सुचवली, तेव्हा दोन्ही मुलं आणि सुना केवढे संतापले… म्हणाले की, तुमच्या उपचारांसाठी तुम्ही अशा प्रकारे वर्गणी गोळा करुन या शहरात, समाजात आमची बदनामी करू बघताहात.”

‘‘ त्यांचं बोलणं सोडून द्या अप्पासाहेब. मी आजच काही सोसायट्यांच्या प्रमुख अधिका-यांची मिटिंग बोलावतो, आणि त्यांच्याशी चर्चा करून आठवड्याभरात तीन लाख रुपये उभे करून दाखवतो.”

‘‘ अरे अजून माझं बोलणं संपलं नाहीये रवी. हे बघ, मी एका दिवसात फक्त तीनच नाही, तर तीस लाख रुपये उभे करु शकतो. फक्त सांगायचाच् अवकाश… कुणीही या घराचे एका तासात तीस लाख रूपये देऊन जाईल… पण…”

‘‘ माफ करा अप्पासाहेब, पण खरं सांगतो, तुमची मुलं इतकी अविचारी असतील यावर माझा विश्वासच बसत नाहीये.”

‘‘ नाही रवी, ते अविचारी नाहीयेत्. पण ते जेवढा विचार करतात, तेवढा विचार आपण आयुष्यात कधीही केला नाही. रात्री तुझ्या वहिनीने दोन्ही मुलांना समोर उभं करून इतकं कठोरपणे काय काय सुनावलं, आणि घर विकून माझ्यावर उपचार करण्याबाबत सांगितलं, तेव्हा सूरज काय म्हणाला माहिती आहे?”

‘‘ काय म्हणाला?”

‘‘ म्हणाला, ‘ येऊन-जाऊन एवढं एक घर तर आहे आपल्याकडे. आता त्याच्यावरही डोळा आहे का तुमचा? बाबांच्या हाताखाली काम करणा-यांकडे लाखोंची संपत्ती आहे आज. पण बाबा?… आयुष्यभर फक्त प्रामाणिकपणा आणि ईमानदारी, यांचेच गोडवे गात राहिले… बाकी काहीच केलं नाही. आज जर बँकेत त्यांचे पाच-दहा लाख रूपये शिल्लक असते, तर उपयोगी नसते पडले का अशावेळी? डॉ. अख्तर यांचं वीस दिवसांचं बील पन्नास हजार झालं होतं… तिथेच आमची पास-बुकं रिकामी झाली. आता घर विकलं तर आपण सगळेच उघड्यावर येऊ.’– हे ऐकून तुझी वहिनी गप्पच झाली. सूरज आणखी असंही म्हणत होता की, ‘ मम्मी तू तुझ्या स्वत:चाही विचार करायला हवास. माझा पगार इतका कमी आहे, की मी माझ्या कुटुंबाचाच खर्च कसा तरी भागवतो आहे. आभाची नोकरी तर पार्टटाईमच आहे… आणि आज आहे… उद्या असेल की नाही सांगता येत नाही. तुम्हा दोघांनाही बहुतेक माहिती नसावं की, या नोकरीसाठी मला कॉलेजच्या मॅनेजमेंटला रोख चाळीस हजार रुपये द्यावे लागले होते…’ सूरजचं समर्थन करणं चालूच होतं, इतक्यात दीपकही बोलायला लागला. ‘ मम्मी, मी बाबांच्या ऑपरेशनबद्दल माझ्या डॉक्टर मित्रांचंही मत घेतलंय. त्यांचं मत असं पडलं की, बाय-पास् जरी केली, तरी ते ऑपरेशन नक्की यशस्वी होईल, असं खात्रीने सांगता येणार नाही. उपचार पद्धती आता खूपच प्रगत झाल्या आहेत असं आपण कितीही ठामपणे म्हणत असलो, तरी आजही ५०% ऑपरेशन्स अयशस्वी ठरताहेत. असं असतांना, हे ऑपरेशन अयशस्वी ठरलं, तर बाबांच्या नशिबात जे घडायचं असेल, ते घडेलच… पण तीन लाख रुपये मात्र उगीचच वाया जातील.’  सूरजने पण दीपकच्या म्हणण्याला दुजोरा दिला. वर असंही म्हणाला की, ‘ जरी ऑपरेशन यशस्वी झालं, तरी बाबा अजून किती वर्षं जगतील?… दोन वर्षं, चार वर्षं… फार फार तर दहा वर्षं. त्यामुळे आता असा विचार करायला पाहिजे की ज्या माणसाने त्रेसष्ठ वर्षं हे जग पाहिलंय्, तो आणखी दहा वर्षं जगला, म्हणून असा काय मोठा फरक पडणार आहे त्याच्या आयुष्यात? मुख्य म्हणजे ऑपरेशननंतर बाबा काही कामही करू शकणार नाहीत. कुठली धावपळ सुद्धा करू शकणार नाहीत. उलट तुलाच एखाद्या लहान मुलासारखी त्यांची सतत काळजी घेत बसावं लागेल. अशा व्यक्ती साठी आज तीन लाख रुपयांवर पाणी सोडणं, हा कोणता शहाणपणा आहे? आमचं तर अजून सगळं आयुष्य बाकी आहे. तेच पैसे आम्हालाच कशासाठी तरी उपयोगी पडतील मम्मी. विचार कर जरा.’… हे सगळं बोलणं मी ऐकलं होतं. म्हणूनच तुझी वहिनी जेव्हा नंतर माझ्या खोलीत आली, तेव्हा तिने काही सांगायच्या आधीच, मी माझा निर्णय तिला सांगून टाकला… ‘ हे बघ… ऑपरेशनचं नुसतं नाव ऐकूनच प्रचंड भीती वाटायला लागली आहे मला. त्यामुळे, मी अजिबात ऑपरेशन करून घेणार नाही… आणि हा माझा ठाम निर्णय आहे. देवाची जशी मर्जी असेल, तसं जाईल माझं पुढचं आयुष्य.’ “

… हे सगळं बोलताना कितीतरी वेळा अप्पासाहेबांच्या पापण्या फडफडत होत्या… आणि तितके वेळा डोळ्यातलं पाणी तिथेच थोपवलं गेलं होतं हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. विषय बदलायचा म्हणून मी विचारलं…

‘‘ मग वहिनी काय म्हणाल्या? ”

‘‘ काय म्हणणार?… काहीच बोलली नाही. रात्रभर तिची उशी मात्र ओली होत राहिली होती. सकाळी उठून पाहिलं तर काय… तिचा सगळा दिनक्रमच बदलून गेलेला दिसला. तिने किचन आपल्या ताब्यात घेतलं…. देवघरही आधीच स्वच्छ करून ठेवलं होतं. मी दिसताच मला बजावून सांगितलं… “ आजपासून अंघोळ झाली की आधी पूजा करत जा तुम्ही .” तिचं ऐकावं लागलं… आणि आत्ता देवघरात देवासमोर बसून, जीवनाचं हे गणित त्याच्याकडून समजावून घेत होतो… तू मला माफ करशील, अशी आशा करतो मी रवी.”

—अप्पासाहेब दोन्ही हात जोडून माझ्यासमोर उभे आहेत. त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी एक शब्दही सापडणं अशक्य वाटतंय् मला. गळा इतका दाटून आलाय्… काहीच बोलूही शकत नाहीये मी. उठून त्यांना नमस्कार करत मी माझ्या घरी परत चाललो आहे… विचारात पडलो आहे की नात्यांना आकडे समजून, त्यानुसार मांडलेली फायद्या-तोट्याची गणितं, कुठल्याही पाटीवर मांडली, तरी उत्तरं एकसारखीच तर असणार ना….  

— समाप्त —

मूळ हिंदी  कथा – ‘स्लेट पर उतरते रिश्ते’ –  कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments