श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘हद्द…’ – भाग – 5 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

बसून घोटभर पाणी प्याल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. काहीतरी आठवताच तात्या झटकन उभाच राहिले. ते अचानक उभा राहिल्याने त्यांच्याकडे आश्चर्याने आणि घाबरून पाहणारी बायको त्यांना काहीतरी विचारणार तोच ते बॅटरी घेत म्हणाले,

“जरा त्याच्याकडे बघ. आलोच मी. “

” अहो पण…”

” आलोच..”

बायकोला पुढं काही बोलू न देता तात्या बॅटरी घेऊन बाहेर पडले आणि पुन्हा शेजारी आले. सावकाश कानोसा घेत साऱ्या ढिगाऱ्यावरून, तुळयांजवळून दोन तीनदा फिरले. कुठंच कण्हण्याचा आवाज येत नव्हता. त्यांना वाटत होतं जसा तो सापडला तशीच त्याची आईसुद्धा सापडेल. मनात आशा होती काहीच मागमूस लागत नाही म्हणल्यावर त्या दगड-मातीच्या मलब्यात गाडल्या गेल्या असणार.. आता जिवंत असण्याची तिळमात्र शक्यता नव्हती. ते निराश झाले, दुःखी-कष्टीही झाले. तात्या उदास मनाने घरी परतले. तात्यांची बायको त्याच्याजवळ बसली होती. तिने त्याचा चेहरा पुसून काढला होता.. जखम दिसेल तिथं हळद भरलो होती. रक्तस्त्राव थांबला होता. तो बेशुद्ध होता.

तात्यांना आल्याचे पाहताच त्यांच्या बायकोने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तात्यांनी नकारात्मक मान हलवली तेंव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आत येताच तात्यांनी चिंब भिजून निथळत असलेले त्यांचे कपडे बदलले. पाऊस मंदावला होता पण होताच.

” गावात पोलीसपाटलांकडे जाऊन येतो. “

हातात बॅटरी आणि छत्री घेत तात्या म्हणाले तसे त्यांच्या बायकोने हातानेच त्यांना थांबायची खूण केली. आत जाऊन चहा करून आणून तात्यांच्या हातात देत त्या म्हणाल्या,

” रात्रभर भिजलाय, चहा घ्या न् जावा. “

चहा पिता पिता त्यांची नजर  तात्यांच्या सालटे निघालेल्या पायाकडे गेली.

” अहो, हे काय लागलंय ?”

” काही नाही गं.. याला बाहेर काढताना जरासे खरचटलंय..”

” अहो, सांगायचंत तरी ..? “” अगं, वेळ कुठली ? अन् त्यात सांगण्यासारखं काय आहे  ? “

त्यांनी आतून हळद आणली. तात्यांच्या पायाला खरचल्याजागी लावली.

” जावा पण काळजी घ्या.. आणि आता फटफटायला लागलंय.”

” वेळेचं काही भानच राहिलं नाही बघ. “

बॅटरी फडताळात ठेवत तात्या म्हणले आणि छत्री  घेऊन बाहेर पडले.

गावात जाऊन तात्यांनी पोलीस पाटलांना सगळं सांगितले. गावात बऱ्याच ठिकाणी पडझड झाली होती पण ती किरकोळ होती. जीवघेणी पडझड त्याच्या घराचीच झाली होती.. सारे घरच भुईसपाट झाले होते. थोड्याच वेळात बातमी साऱ्या गावात पसरली.पडत्या पावसातही सारं गाव गोळा होऊन त्याच्या घराकडे धावले. तुळया बाजूला झाल्या, दगड माती बाजूला झाली. स्वयंपाकघराची भिंत आतल्या बाजूला त्याच्या आईच्या अंगावर पडली होती. बिचारी झोपल्या जागीच, झोपेतच गेली असावी.

गावातील डॉक्टरही धावून आले होते. तो बेशुद्धच होता. डॉक्टरनी त्याला तपासून औषधेही दिली होती. तात्या, त्यांची बायको त्याची काळजी घेत होते. त्या दोघांनाही त्याच्याबद्दल वाईट वाटत होते.. काही महिन्यांपूर्वी त्याचे वडील गेले होते.. अगदी अचानक आणि आत्ता आई गेली होती. तो पोरका झाला होता. डॉक्टरांच्या उपचाराने  तो दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच त्याने सभोवती नजर फिरवली. तो तात्यांच्या घरात होता. तात्या आणि त्यांची बायको समोर काळजीभरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होते.

त्याला घराची भिंत पडल्याचे आठवले.. आपण आईकडे माजघराकडे जात असतानाच अंगावर भिंत कोसळून पडल्याचे आठवले.

” आई ss ! “

तो ओरडला तसे तात्यांची बायको त्याच्याजवळ आली आणि त्यांनी त्याला जवळ घेतले. तात्याही जवळ आले. त्या दोघांचेही वाहू लागलेले डोळे पाहून तो समजायचे ते समजला आणि ‘ आईss !’  म्हणून त्याने हंबरडा फोडला. तात्यां त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते.

तात्यांचा, त्यांच्या बायकोचा तो मायेचा, आधाराचा स्पर्श जाणवला तेंव्हा त्याला तात्यांशी असणारे त्याचे वागणे, बोलणे आठवले. आपण त्यांच्याशी तसे वागूनही ते सारे विसरून संकटात तात्या धावून आले होते. त्यांनी तसल्या परिस्थितीतही प्रयत्नांची शिकस्त करून त्याला वाचवले होते. त्याला अपराधी वाटू लागले होते. तो क्षमायाचना करणारे काहीतरी बोलणार तितक्यात  जवळ घेत तात्या त्याला म्हणाले,

” काही बोलू नकोस पोरा. जशी ती दोन माझी मुलं तसा तू तिसरा…”

आणि त्याच्या, तात्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आसवे वाहू लागली होती. त्या आसवांच्या पुरात त्यांच्या मनातील ‘हद्द ‘ ही पार विरून गेली होती, वाहून गेली होती.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments