श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

बेलीफचं ते चार ओळींचं पोस्टकार्ड माझ्या उत्साहावर विरजण ओतायला पुरेसं होतं. एका हुकूमनामा मिळालेल्या कर्जखात्यातील जामिनादारावर अटक वाॅरंट बजावण्यासाठी बॅंकेमार्फत मला केळघर ग्रामपंचायतीत हजर रहायला सांगणारं ते पत्र!

कामाच्या घाईगर्दीतला एक अख्खा दिवस कर्जवसुलीची कांहीही आशा नसलेल्या एका खात्यासाठी  फुकट घालवायचा ही कल्पना मनाला पटणारी नव्हतीच. पण कायद्याचा एकदा उगारलेला बडगा कोणत्याही आदेशाविना शेवट गाठण्याआधी केवळ माझ्या इच्छे न् मतानुसार आवरणं बँकेच्या नियमात बसणारं थोडंच होतं?

मला जाणंच भाग होतं.   

बेलीफच्या पत्रानुसार मी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधे हजर रहाणं आवश्यक होतं. पण मी गेलो साडेनऊ वाजताच. कारण ‘बेलीफ’या व्यक्तीपासून मी आधीपासूनच सावध रहायचं ठरवलं होतं.  त्याला कारणही तसंच होतं.  जिथे जायचं त्यांना आधीच भेटून, वर्दी देऊन त्यांच्याकडून बक्षिसी उकळायचं त्यातील काहींचं तंत्र आणि कसब राष्टीयकृत बॅंकेचा मॅनेजर म्हणून मला ऐकून माहिती होतं. आज इथेसुध्दा संशयाला जागा होतीच. कारण माझ्या आधीच बेलीफ हजेरी लावून कामानिमित्त बाहेर गेल्याचं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून मला समजलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.  सहजासहजी आपली अशी फसवणूक करायचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय मला तिडीक यायला पुरेसा होता. पण डोक्यात राख घालून चालणार नव्हतं.  मी शांत रहायचं ठरवलं.  आता एक तर पुरेसा पुरावा नसताना चिडून संतापून उपयोग नव्हताच.  त्यामुळे त्याच्या कलाने घेणे माझ्या दृष्टीनं सोयीचंच नव्हे तर

आवश्यकसुद्धा होतंच. पाच-दहा रुपयांसाठी स्वत:चं इमान विकायचीही तयार असणाऱ्या या माणसाची मला आता किंव वाटू लागली.

पुढे अर्ध्या-पाऊण तासानंतर बेलीफ आला.

धोतर, वर पांढराच पण मळकट शर्ट,डोक्यावर कळकट टोपी,तोंडात पानाचा तोबरा, ओबडधोबड मातकट चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट,आणि हातात लोंबती पिशवी. तो माझ्याकडेच पहात थोडा घुटमळलाय हे लक्षात येताच सावध अंदाजानेच त्याच्याकडे पाहून मी ओझरता हसलो.

“मॅनेजर सायब का ?”

“हो. तुम्ही बेलीफ?तुम्ही तर मघाशीच आला होतात ना?”

“हां.. म्हंजी.. तुमच्या म्होरं घटकाभर आधी तर आलोतो.. पन.. ”  

“मग गावात गेला होतात कां?”

तो बावचळला.

“हा़.. म्हंजी काम हुतं वाईच”

“नाना कुलकर्ण्यांकडे ?” मी वर्मावर बोट ठेवल्यासारखं तो दचकलाच एकदम.. थुंकायचं निमित्त करून मला नजर द्यायचं टाळत त्याने मान वळवली.

“म्हंजे त्ये मास्तर व्हय. ? अवं तेंच्याकडं आत्ता तुमच्यासंगट जायचं नव्ह का.. “तो सव्वाशेर निघाला होता. मी स्वतःशीच हसलो. गप्प बसलो. रस्त्यातून जाताना मी विचारलेल्या प्रश्नांना तो न अडखळता मुद्देसूद उत्तरे देत होता.

“नाना कुलकर्णी असतील, भेटतील का हो घरी?”

“व्हय तर. जात्यायत कुटं?हांतरुन सोडता याय नगं?”

“म्हणजे?”

“अवं समद्या हातापायाच्या काटक्या झाल्यात. वाळून कोळ झाल्यालं म्हातारं मानूस त्ये. दिस मोजत पडून आसतंय. “

“अस्सं? मग त्याना अटक कशी करायची. ?”

“आता कायदा म्हणतोय न्हवं अटक करा म्हणून..  आपण करायची. अवं ही काय फौजदारी अटक हाय का ?सादी शिव्हील अटक ही. ततं जायाचं. त्येना म्हनायचं,’मी बेलीफ. ह्ये बॅंकेचं सायब. आन् ह्ये कोरटाचं वारंट. नाना भिकू कुलकरनी , आमी तुमाला अटक केलीय. ‘ त्ये व्हय म्हनतील. पन त्यो वाळका ओंडका उचलून न्याचा कसा न् ठिवायचा कुटं?म्हनून मंग अटकंचा पंचनामा करायचा. त्येचा कोर्टात रिपूर्ट लिवायचा. मंग कोर्ट नोटीस काढंल,पुलीस धाडंल. त्ये समद त्येंचं काम.  कोर्टात हजर नाही झालं तर  पुलीस त्यांना बेड्या घालून नील. त्ये समदं त्येंचं काम. आपनाकडं त्येचं काय नाय. “

मी ऐकत होतो. कायदा कोळून प्यालेला तो बेलीफ किती निर्विकारपणानं सांगत होता सगळं! माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली,शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती नकळत तरळून गेली… माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहाणारी.. दयेची भीक मागणारी..

“हं.., चला हतंच. “

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. अवशेषांच्या रुपात डुगडुगत कसाबसा उभा असणारा दिंडीदरवाजा.. वाळवीनं पोखरलेलं त्यावरचं नक्षीकाम..  पुढचा कोंदट अरुंद बोळ..  वाटेतला गंजका नळ..  धुण्याच्या दगडाजवळची सुकलेली केळ.. वाळून गेलेला आळू..  जांभळाचं वाळत चाललेलं म्हातारं झाड..

भुसभुशीत भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरुन उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता, बेलीफ अलगद आत शिरला.  मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.

“साहेब, या..आत या” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो.. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती.. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments