सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆  हतबल ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात  आली. ” काकू– काकू ऐका ना”….मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती. ” कशी आहे माझी साडी ?”…. “मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर “.. मी मनापासून म्हणाले. पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा

आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला….” मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती”… तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा….२१-२२ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. नीटनेटकी राहायची. चेहरा शांत पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला  येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं …..

पटापट काम संपवून ती निघूनही गेली …… आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, काल तिच्यामुळे एक वेगळाच आनंद दरवळला होता … त्या आनंदाची मी वाट पहात होते. …‘ अजून का नाही आली ही ?‘.. मी अस्वस्थ व्हायला लागले होते.

—- बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती….. पण ही अशी ?….. लालबुंद डोळे… विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा….. खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली,आणि ‘ आई ‘….म्हणत

एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई‘ ?……माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसं -तरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितलं …….. तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली साडी नवऱ्याने तिच्यासाठी नाही, तर त्याच्या ‘ मानलेल्या‘ बायकोसाठी आणली होती म्हणे. आणि हिने ती नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं. नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. म्हणून मग कामाला आली होती. माझ्यात तिच्या आईला शोधत होती. … फार फार हत- बल होऊन गेली होती….

आणि मी ?….मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं. जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी प्रत्यक्षात काय करू शकणार होते तिच्यासाठी? मला आई म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का शहाजोगपणाने?….प्रत्यक्षात तिची आई होणं झेपणार होतं का मला खरंच? मलाच खूप हतबल झाल्यासारखं वाटतं होतं. फार फार अगतिक वाटतं होतं …….

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

चटका लावणारी कथा.

सुहास रघुनाथ पंडित सांगली

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी!