श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “घरभरणी !” भाग -२ श्री संभाजी बबन गायके 

(रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता.) — इथून पुढे — 

आवाज ऐकून शेजारच्या घरातून नारायणपंत गोविंदभटांच्या ओसरीवर आले. नारायणभट गेली कित्येक वर्षे मुंबईला लेकाकडे असत. खरं तर गोविंदभटांना त्यांनीच तर भिक्षुकीचे धडे दिले होते. नारायणभटांचा धाकटा भाऊ म्हणून पंचक्रोशीतली गावकरी मंडळी गोविंदभटांचा रागीट स्वभाव चालवून घेत. शिवाय बामनकाका म्हणजे देव अशी भावना अजूनही गावांमध्ये आहेच. आणि नारायणपंतांच्या लाघवी स्वभावामुळे, यजमानांना अवाजवी खर्चात न पाडता पण तरीही धार्मिक कृत्यांत कुठेही तडजोड न करता सर्व कार्य पार पाडण्यात हातखंडा असण्याच्या कीर्तीमुळे हा आदर टिकून होता. नारायणपंतांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरांत स्थिरावली आणि वाढत्या वयाचा भार, सुरू झालेली आजारपणं यांमुळे आपले वडील आपल्या नजरेसमोर असावेत या हेतूने मुलांनी नारायणपंतांना बळेच शहरात ठेवून घेतले होते. पण त्यांना गावकीची आंतरीक ओढ होतीच. संधी मिळेल तेंव्हा ते गावी परतत. आजही ते सकाळी सकाळीच गावी परतले होते.

नारायणपंतांनी झाला प्रकार समजून घेतला. आपण सुदामला वंशखंड होईल असा शाप दिल्याचा मात्र गोविंदभटांनी उल्लेख केला नव्हता. कदाचित आपण रागाच्या भरात असं बोलून जायला नको होतं, असंही त्यांना वाटलं होतं. आपल्या पोटी मूलबाळ नाही हे गोविंदभट कधी कधी विसरून जात. आणि मग त्यांच्या तोंडी असे शब्द येत असत. वास्तविक भिक्षुकीवाचून त्यांचं काही अडत नव्हतं. पण वाडवडिलांनी सांभाळलेली परंपरा ते पाळत असत. भिक्षुकीत फार काही पारंगत होते अशातलाही भाग नव्हता. मात्र थोरल्या भावाच्या, नारायणपंतांच्या हाताखाली काम करून करून गरजेपुरते विधी ते खूप मन लावून आणि छान करायचे. त्यामुळे लोक त्यांना सोडत नव्हते आणि ते लोकांना.

“गोविंद,चल कपडे घाल. सर्व सामान घे. आपण सुदामकडे जाणार आहोत!” नारायणपंतांनी आज्ञा केली. हे ऐकून गोविंदभट चपापले. नारायणपंतांनी गावातल्या वसंत जीपवाल्याला निरोप दिला. लगेच निघायचंय म्हणाले. तो ही लगबगीने हजर झाला. नारायणपंतांनी आपली ठेवणीतली टोपी डोईवर चढवली. स्वच्छ धोतर नेसले,अंगरखा चढवला,नवं कोरं उपरणं खांद्यावर टाकले आणि निघाले.

आपल्या घरासमोर जीप थांबलेली पाहून सुदामच्या घरातल्यांना आश्चर्य वाटले. सकाळी सकाळी गोविंदभटांनी उच्चारलेल्या शापवाणीने ते भोळे भाबडे लोक भांबावून गेले होते. आता उत्तरपूजेचे काय करायचं या विचारात होते. घरातले पाहुणे-रावळे अजूनही तसेच बसून होते.

“सुदामा,आहेस का रे घरात?” नारायणपंतांनी त्यांच्या नेहमीच्या प्रेमळ आवाजात हाक दिली आणि ओळखीचा आवाज ऐकून सुदाम धावतच बाहेर आला. समोर नारायणपंतांना पाहून त्याने पटकन खाली वाकून त्यांच्या पायांवर डोके ठेवले. सुदामचं नामकरणही नारायणपंतांनीच केलं होतं आणि त्याच्या लग्नातही भटजी म्हणून तेच हजर होते. “काका,तुम्ही?” तुम्ही तर मुंबईला होता ना?”

“अरे,चल आत चल. मग बोलू. तू आंघोळ केलीयेस का? नसली तर करून घे चटकन. आणि तुझ्या बायकोलाही तयार व्हायला सांग. आपण आधी उत्तरपूजा करून घेऊ!” नारायणपंत म्हणाले तसे सुदामच्या चेह-यावर आनंदाचे शिवार फुलले. हौसाबाई तरातरा बाहेरच्या खोलीत आल्या आणि खुर्चीवर बसलेल्या नारायणपंतांच्या पायांवर डोई ठेवली. “लई दिवसांनी दर्शन झालं,काका!”

“तुझा संधीवात कसा आहे,हौसाबाई!” “मी मागच्या वेळी सांगितलेलं औषध घेतीयेस ना अजूनही?”नारायणपंतांनी विचारले. तसे हौसाबाई म्हणाल्या,”तुमच्या औषधांचा गुण येतोय बघा,काका!” नारायणपंत म्हणजे पंचक्रोशीतलं चालतं-बोलतं सेवाकेंद्र. आयुर्वेदी औषधं,गावठी उपचार यांचा त्यांचा बराच अभ्यास होता.

तोवर सुदाम आणि त्याची बायको तयार होऊन आले. नारायणपंतांनी आपल्या खड्या,स्वच्छ,तयार वाणीने सुदामचे घर भरून टाकले. अगदी मुख्य पूजेच्या थाटात उत्तरपूजा बांधली. पाच आरत्या म्हटल्या आपल्या गोड आवाजात. गोविंदभट त्यांच्या सोबतच होते. पण सुदामच्या नजरेला नजर देत नव्हते फारशी. नारायणपंत आल्याचे पाहून शेजारच्या घरातले ज्येष्ठ लोकही सुदामकडे आले. नारायणपंतांनी त्यांची डोळ्यांनीच दखल घेतली आणि गोड हसले. म्हाता-या शिरपतनं “काय काका, बरं आहे ना?’ अशा अर्थानं आपले दोन्ही हात उंचावले आणि काकांनीही त्याला मान लववून प्रतियुत्तर दिले. घरात धुपाचा,उदबत्तीचा सुवास दरवळत होता.

सुदाम आणि त्याची बायको,नारायणपंतांच्या पायावर डोके ठेवते झाले. पंतांनी त्यांना तोंडभरून आशीर्वाद दिला. ती जोडी गोविंदभटांच्याही पायाशी वाकली…भटांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या तोंडून उदगार बाहेर पडले,”पुत्रवती भव!” आणि हे ऐकून सुदामच्या मनातलं मळभ दूर पळालं!

दोन्ही काकांसाठी दूध दिले गेले, ते त्यांनी स्विकारले. बोलता बोलता, सकाळी गोविंदभट नेमके काय म्हणाले होते हे सुदामने नारायणपंतांच्या कानांवर घातले होतेच. गोविंदभटांनी ‘पुत्रवती भव, कल्याणम अस्तू!” असा आशीर्वाद दिल्याचे ऐकून त्यांनाही बरे वाटले.

“सुदाम,अरे गोविंदचं काही मनावर घेऊ नकोस. रागाच्या भरात बोलला असेल तो. तसं त्याच्या मनात काही नव्हतं. आणि त्याने शाप दिला असला तरी आता आशीर्वादही त्यानेच दिलाय ना?” नारायणपंत सुदामला जवळ घेऊन म्हणाले. सुदामच्या डोळ्यांत ओलसरपणा दिसला. त्याची आईही पदराने डोळे पुसू लागली. “अरे,हे शाप बिप काही खरं नसतं. खरे असतात ते आशीर्वाद! मनापासून दिलेले! आणि सर्व आपल्या मानण्यावर असतं. तुम्ही अजूनही आम्हांला मान देता, पाया पडता हे काय कमी आहे?

सुदामने शिधा नारायणपंतांच्या पुढे ठेवला. त्यांनी तो गोविंदभटांना स्विकारायला सांगितला. सुदामने दक्षिणेचे पैसे असलेलं पाकीट नारायणपंतांच्या हाती ठेवले. त्यांनी मोजली रक्कम. पाचशे अकरा रुपये होते. नारायणपंतांनी त्यातील एक रुपया घेतला आणि बाकी रक्कम पाकीटात पुन्हा ठेवली. आणि ते पाकीट सुदामच्या हाती दिलं. “तुझी दक्षिणा पोहोचली मला…तुझा आधीच एवढा खर्च झालाय…ठेव तुला हे पैसे.! आणि पुजेवरची जमा झालेली चिल्लर,नोटा गावातल्या भैरोबाच्या दानपेटीत घाल”

एवढे बोलून नारायणपंत उठले. गोविंदभटांनीही पिशवी सावरत उंब-याच्या बाहेर पाऊल ठेवले. सुदामच्या घरातली झाडून सारी मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी अगदी रस्त्यापर्यंत आली होती. नुकतंच घरभरणी झालेलं सुदामचं नवं कोरं घर उन्हातही हसत उभं होतं!

– समाप्त –

(कथाबीज अस्सल. नावे, संदर्भ, स्थळ, प्रसंगांचा क्रम बदल करणे अपरिहार्य.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments