श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल —– भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी

(“ते सोड.एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु,सिगरेट पिता येणार नाही.गुटखा खाता येणार नाही.मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा.मी हातही लावणार नाही”) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात सुऱ्या अष्टविनायक यात्रेला गेला.त्याअगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते .आपलं नांव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सुऱ्याला आनंदाचं उधाण आलं.आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला.

अष्टविनायक सफर करुन परत आल्यावर सुऱ्या मला भेटायला आला.जाम खुष होता.किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणूकीत प्रचंड फरक पडला होता.बोलण्यात, वागण्यात सभ्यपणा आला होता.

” दादा आता यापुढे काय करायचं?”उत्साहाने त्याने विचारलं.

” यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल”

” ट्रेकिंग?काय असतं हे?”

मी त्याला सविस्तर सांगितलं.राँक क्लायंबिंग आणि रँपलिंगचीही माहिती दिली.तो रोमांचित झाला

“पण याकरीता खुप पैसा लागतो.त्याच्यासाठी तुला काम करुन तो जमवावा लागेल”

“सांगा दादा.मी काहीही काम करायला तयार आहे”

” माझे एक वकील मित्र आहेत.त्यांना आँफिसकामासाठी एका मुलाची गरज आहे.तू जाशील?पाच हजार देतील ते”

” जाईन दादा.असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचेही खुष रहातील”

” हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम नाही करता येणार.नाहितर ते वकीलसाहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील”

” नाही दादा.ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन “

 सुऱ्या देशमुख वकीलांकडे जायला लागला.देशमुख वकील खुप हुशार,इमानदार पण कडक स्वभावाचे होते.सुऱ्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं.

५-६ महिने काम करुन पैसे जमवल्यावर मी सुऱ्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं.तिथलं साहस,निसर्गसौंदर्य पाहून तो वेगळी द्रुष्टी घेऊनच परत आला.आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारु,सिगारेटमधलं थ्रिलं विसरला.आमची भेट झाल्यावर तो मला म्हणाला.

” प्रशांतदादा आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत रहावं असं वाटतंय पण काही सुचत नाहीये”

“सुऱ्या अरे तू रोज देशमुख वकीलांकडे जातो.निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं,न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात.त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?”

त्याचा चेहरा उजळला

” हो वाटतं ना!पण माझा त्याच्याशी काय संबंध?”

“सुऱ्या अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला अनुभवता येईल”

त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला.

“दादा मी आणि वकील…?”

“हो सुऱ्या.तू मनावर घेतलं तर तेही होईल.पण त्याअगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल”

“बघतो दादा.विचार करतो”

गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला.बारावीच्या परीक्षा जवळच होत्या.मी त्याला फाँर्म भरायला लावला.त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली.निकाल लागला.आश्चर्य म्हणजे सुऱ्या चांगल्या मार्कांनी पास झाला.तोही काँप्या न करता.सुऱ्याच काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले.सुऱ्याला मी लाँ काँलेजला प्रवेश घेऊन दिला.सुऱ्या देशमुख वकीलांकडे काम करता करता काँलेजातही जाऊ लागला.

या घटनेला पाच वर्ष होऊन गेली.मी माझ्या विश्वात रमलो.दरम्यान माझंही लग्न झालं.दीड वर्षात मुलगीही झाली.सुऱ्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती.अर्थात देशमुख वकीलांकडून मला सुऱ्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच.अधूनमधून मधूकाकाही येऊन सुऱ्याची ख्यालीखुषाली कळवत होते.पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणायचे.त्याचं गुटखा खाणं आणि दारु पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे.एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं?

एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला.सुऱ्या बोलत होता.

“प्रशांतदादा घरी आहात का?येऊ का भेटायला?”

“का रे काही प्राँब्लेम?”

“दादा गुड न्युज आहे.मी वकील झालो.मला सनद मिळाली.”

“वा वा सुऱ्या काँग्रँट्स्!ये लवकर मी वाट पहातोय”

तो वकील झाल्याचा मलाच खुप आनंद झाला.माझ्या नजरेसमोर तो गुटखा खाणारा,मुलींची छेड काढणारा आणि लगेच वकीलाचा काळा कोट घातलेला सुऱ्या तरळला आणि माझे डोळे आनंदाने भरुन आले.

 संध्याकाळी मधूकाकांसोबत तो आला.आल्याआल्या माझे पाय त्याने धरले.मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला.

“दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं.तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहीलो असतो.”

“अरे मी काहीच केलं नाही सुऱ्या ! मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं.तू मनाने चांगला होताच फक्त संगतीने बिघडला होतास.तू मेहनत घेतली,कष्ट करुन शिकलास.बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले.”

“खरंय दादा”

त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला.

“आता सुऱ्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे.तुझ्यासारखे अनेक तरुण,त्यात तुझे काही मित्रही असतील,व्यसनांना थ्रिल समजुन वाया जाताहेत.त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे.सुऱ्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला

“नक्की दादा.आजपासूनच त्याची सुरुवात करतो”

तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली.

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments