श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

 शत्रूत्वाचा नायनाट… श्री मकरंद पिंपुटकर

मंदार एंटरप्राईझेसच्या रवी सरांना डायमंड मिल्समधून कोण्या बॅनर्जीचा फोन आला होता. “मैं डायमंडसे बॅनर्जी बोलता है. ये तुम लोगोंने क्या बकवास भेजा है इधर ?”

डायमंड मिल : भारतातील टेक्सटाइल जगतातले खूप मोठे नाव – अगदी रेमंड, बॉम्बे डाईंगसारख्या दिग्गज टेक्सटाइल कंपन्यांच्या तोडीचे. 

ऑर्डरनुसार customised मशिनरी बनवून देणे ही रवी सरांच्या मंदार एंटरप्राईझेसची खासियत. डायमंड मिल हे त्यांचे जुने कस्टमर. इतके जुने की करोडो रुपयांच्या डायमंड मिलचे मालक वीरेनभाई त्यांच्या वैयक्तिक परिचयाचे होते. 

डायमंड मिलला यावेळी टेक्सटाइल मशिनरीमधील एका मशीनचा एक भाग वेगळ्या पद्धतीने modify करून हवा होता. त्याप्रमाणे modify केलेले भाग रवी सरांनी डायमंड मिलमध्ये पाठवलेले होते. मोरे नावाच्या ज्या मॅनेजरांनी ऑर्डर फायनल केली होती, त्यांच्या कंपनी e mail account वर mail पाठवून हे भाग कसे जोडायचे (assemble करायचे) ते रवी सरांनी विस्ताराने कळवले होते. त्यांचा काही निरोप / प्रति उत्तर आलं नाही, त्यामुळे सगळं आलबेल आहे असं ते समजत होते आणि आत्ता अचानक हा फोन आला होता. 

दोन पाच मिनिटांनी बॅनर्जीचा पहिला आवेग आणि आवेश शांत झाल्यावर रवी सरांना अर्थबोध झाला तो असा की मोरे दोन महिन्यांपूर्वीच कंपनी सोडून गेले होते. त्यानंतर हे सुटे भाग व मेल पोचले होते. मोरे नोकरी सोडून गेले असल्याने, त्यांची मेल कोणी तपसलेलीच नव्हती.  

हा बॅनर्जीदेखील गेली अनेक वर्षे टेक्सटाइलमध्येच काम करत होता, बॉम्बे डाईंगमधून आता मोऱ्यांच्या जागेवर, डायमंडमध्ये आला होता. त्याच्या देखरेखीखाली त्याने ते भाग जोडून (assemble) घेतले होते व मशीन चालवायचा प्रयत्न केला होता. 

या मशीनमध्ये गिअर बॉक्स होता, एका बाजूला हे भाग गिअरमध्ये अडकवायचे व दुसरी बाजू लॉक करायची असायची. एकदा यंत्राची जोडणी झाली की त्यातील ऑईल ठराविक तापमानापर्यंत तापवावे लागायचे, याला तीन एक तास लागायचे. तेल तापलं की मगच यंत्र चालू करता यायचे. 

इथे अडचण अशी होत होती की लाहिरीने यंत्र जोडणी करून घेऊन तेल तापवले की गिअर बॉक्सवाली बाजू उष्णतेने प्रसरण पावायची, गिअर्स सटकायचे आणि त्यामुळे यंत्र चालू होत नव्हते.

बॅनर्जीने दोन तीनदा यंत्राची जोडणी करायचा प्रयत्न करून बघितला आणि दर वेळी तो असफल ठरला, इकडे दर वेळी वीरेनभाईंचा यंत्राबाबत चौकशी करणारा फोन यायचा, त्यांना नकारार्थी उत्तर द्यावं लागायचं, त्यामुळे बॅनर्जी वैतागला होता आणि त्याने भडकून रवी सरांना फोन केला होता.

“साला, कैसा काम करता है ? हर बार गिअर चार चार इंच मिसमॅच होता है ? वो मैं कुछ नहीं जानता. मेरे को कल सुबह तुम खुद इधर हमारे कंपनीमे मंगता, तुमने आने का, मशीन चालू कर के देने का, नहीं तो अपना सडा हूवा मटेरियल, अपने खर्चे से, वापस ले जाने का. बस, बात खतम,” म्हणत रवी सरांचे काही न ऐकून घेता त्याने फोन ठेवला देखील.

दुसऱ्या दिवशी रवी सर, त्यांच्या एका मदतनीसासोबत, डायमंड मिलमध्ये पोचले. काय घडल्याने चूक होत आहे याचा त्यांना प्राथमिक अंदाज आला होता. त्यानुसार, तिथल्या मुख्य फिटरकडून बॅनर्जी कोण आहे, कसा आहे, त्याच्या देखरेखीखाली हे मशीन कसे जोडले होते ही माहिती ते घेत होते. 

बॅनर्जी आला, आणि आल्याआल्या त्याने आदल्या दिवशीचा आक्रस्ताळेपणा पुन्हा सुरू केला. “मेरा कोई भी फिटर मैं तेरे को नहीं देगा. तेरी इनसे पुरानी जान पेहचान हैं, तू कोई temporary झोल कर के मशीन चालू हुवा ऐसा दिखायेगा, और तेरे जानेके बाद फिरसे सब ठप हो जाएगा,” असं म्हणत त्याने त्या मुख्य फिटरची तेथून उचलबांगडी केली, एका अक्षरश: गेल्याच आठवड्यात रुजू झालेल्या एका तद्दन नवशिक्या कामगाराला यांच्यासोबत दिले.

बॅनर्जीने त्याच्या एका खास माणसाला तिथे तळ ठोकून बसवलं आणि बजावलं, “अपने कंपनीसे और कोई भी इनको हेल्प करने के लिये आना नहीं चाहिए. मेरे को हर घंटे reporting चाहिए.”

“देखिये बॅनर्जीभाई, मुझे लगता हैं assembly करते वख्त आपसे कोई गलती हुई है. मैं आप को समझाता हूं …” काय चुकलं आहे आणि काय केले पाहिजे हे रवी सर बॅनर्जीला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण बॅनर्जी उलट आणखीनच गरम झाला.

“तू मेरा मिष्टेक निकालता हैं ? मैं क्या कल इस लाईन मे आया ? जा, जाकर बॉम्बे डाईंग मे पूछ. लोग आज भी मेरा तारीफ करता हैं उधर,” बॅनर्जी संतापाने लालपिवळा झालेला. “तेरा कोई नाटक नहीं चाहीये. मिश्टेक खुद करनेका और बिल मेरे नाम पर फाडनेका ! मैं खुद वीरेन भाई को फोन कर के बोलनेवाला है,” म्हणत बॅनर्जीने खरंच वीरेनभाईंना फोन लावला आणि आपली कैफियत सांगू लागला. 

“और आपसे मिस्टेक हुवा होगा तो ?” त्याचा फोन चालू असताना रवी सरांनी शांतपणे त्याला विचारलं. 

“तू ये मशीन चालू करके दिखायेगा, तो मैं on the spot resign करेगा, इस्तिफा दे देगा. वीरेन सर, आप भी सून लो, मैं इस्तिफा दे देगा. लेकीन इस से मशीन चालू नहीं हुवा, तो इसका punishment क्या, ये आप को तय करना होगा.”

प्रकरण भलतंच चिघळलं होतं. साधारण चार तासांनी बॅनर्जीच्या माणसाने त्याला फोन केला, “सर, वो मशीन चालू हो गया, सर.”

“इतने जलदी ? ऐसे कैसे हो सकता हैं ? रूक, मैं अभी आया,” म्हणत बॅनर्जी तेथे पोचला, “वो मेजरींग टेप ला इधर. गिअर कितना बाहर आया है देख ले.”

गिअर व्यवस्थित जोडले गेले होते, अजिबात mismatch नव्हते. 

बॅनर्जी बघतच राहिला. “ये अभी temporarily जैसेतैसे जगह पर अटका होगा. जरा दस मिनिट मशीन चलने दे, देख, वो गॅरंटीसे फस जायेगा. ये मशीन चालू करने के बाद जो नुकसान होगा, वो तेरे माथे पर,” रवी सरांकडे बोट दाखवत बॅनर्जीने मशीन चालू करायला लावले. 

तास होऊन गेला, मशीन सुरळीत चालू होते. 

“सर, आप मेरी बात सुनिये. मेरे खयाल से आपने assemble करते वख्त …” रवी सर सांगायचा प्रयत्न करत होते. 

“No, no, no, no. मेरे को ग्यान मत दे,” म्हणत बॅनर्जी तेथून निघून गेला.

रवी सरांनी वीरेन भाईंना फोन करून मशीन सुरू झाल्याचे सांगितले. Fitting करताना दुसरी बाजू मोकळी / फ्री ठेवून, गिअरची बाजू लॉक करायची होती, तापणाऱ्या तेलाने दुसरी बाजू प्रसरण पावणे अपेक्षित होतं. हे लक्षात न घेता, बॅनर्जीने दुसरी बाजू लॉक केली, गिअर मोकळे ठेवले, त्यामुळे उष्णतेने गिअर प्रसरण पावले आणि mismatch झाले. पण हे स्पष्टीकरण ऐकून घ्यायची त्याची तयारीच नव्हती.

“कोई बात नहीं, रवी, मैं बोलता हूं उसको. तू एक काम कर, बहुत रात हो गयी है. तू आज इधर कंपनी गेस्ट हाऊस मे ही रुक. Dinner वगैरा कर ले. कल सुबह ब्रेकफास्ट कर के आराम से निकल,” वीरेन भाई रवी सरांना आश्वस्त करत होते.

बॅनर्जीसुद्धा कंपनी गेस्ट हाऊसलाच उतरला होता. जेवताना दोघे एकमेकांसमोर आले. बॅनर्जी अजून घुश्श्यातच होता. रवी सरांनी पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, त्याने तो उडवून लावला.

“मेरे को तेरे साथ कुछभी बात नहीं करने का. वादे के मुताबिक मैं अपना इस्तीफा वीरेन भाईको सोप दिया हैं. खुश ? Happy ?” बॅनर्जी फणफणला. 

रात्र गेली. सकाळी चहा घेताना बॅनर्जी रवी सरांच्या समोर आला. त्याचा घुस्सा आता शांत झाला होता, वास्तवाची जाणीव बहुधा त्याला आता भेडसावत होती. पहिल्यांदाच तो रवी सरांशी नीट बोलत होता.

“Good morning, रवी साब. वो सॉरी, मैं बहोत गलत ढंग से पेश आया आपसे. आपका मशिन अभी भी अच्छे से चल रही हैं. मुझे मेरे असिस्टंटने बताया मैने क्या गलती किया वो. Actually, मेरे “एक्स”असिस्टंटने बताया – ऐसा कहना चाहिए. वो, गुस्से मे, कल मैने resignation दे दिया, और वीरेन भाईने उसे accept कर लिया. आप के पहचान मे कोई जॉब हैं तो बोलिये, रवी साब.” बॅनर्जी अगदीच मवाळ झाला होता. 

योगायोगाने, रवीच्या ओळखीतल्या एका कंपनीत एक तोलामोलाचा जॉब होता. रवीने शब्द टाकला, बॅनर्जीला इंटरव्ह्यूचे बोलावणे आले, आणि चार दिवसांत तो त्या नव्या कंपनीत रुजूदेखील झाला.

नंतर एकदा बोलताना वीरेन भाई रवी सरांना सांगत होते, “अरे, रवी, तू कैसा आदमी है ? वो बॅनर्जी बिना वजह से तेरा दुश्मन बन रहा था, और तू हैं के अपनी खुद की शिफारस देकर उसको जॉब लगवाया ?” 

मंद हसून रवी सर म्हणाले, “अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकन म्हणाले होते – एखाद्या शत्रूला हरवायचे असेल, त्याला नेस्तनाबूत करायचे असेल, तर त्याला तुमचा मित्र करा. There is no better way to destroy your enemy, than making him your friend. (Abraham Lincoln). दोस्ती झाली, की दुश्मनी संपते. बस, मी एवढंच केलं. मी शत्रूला नाही संपवलं, सर. मी शत्रूत्व संपवलं.” मंद हसत रवी सर सांगत होते आणि वीरेन भाई गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments