श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -1 श्री संभाजी बबन गायके 

(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी) 

तब्बल पंचवीस वर्षांनी ‘ती’ माझ्यासमोर उभी होती. अगदी पहिल्यांदा भेटली होती त्यावेळी माझ्या नजरेत भरलेले तिचे डोळे मात्र अजूनही तसेच होते…. चमकदार आणि एखाद्या खोल सरोवरासारखे…. नीतळ!

त्यावेळी सलग एक महिनाभर कित्येक वेळा बाजारात कधी वाणसामान तर कधी दूध तर कधी भाजीपाला घेण्यास आलेली ‘ती’ भेटली होती मला. मी ही असाच योगायोगाने त्याच ठिकाणी असायचो. कदाचित आम्ही असे भेटावं असंच विधिलिखित असावं.

अमृतसरमध्ये मी माझ्या मामांकडे आलेलो होतो. मी बारा वर्षांचा आणि ‘ती’ नऊ वर्षांची. माझे मोकळे सोडलेले लांब केस आणि तिची घोळदार सुरवार…. कुणीही ओळखेल आम्ही दोघंही शीख आहोत!

पहिल्या भेटीत तिच्याकडून मला समजलं की ती इथं तिच्या मामाकडे राहते. दुस-याच भेटीत मी तिला मस्करीत विचारलं होतं…”तुझं लग्न ठरलंय का?” त्यावर ती ‘ईश्श…!चल हट!” म्हणत लाजून तिथून पळत तिच्या मामाच्या घराकडे गेली होती. असं खूप वेळा झालं. माझा तोच प्रश्न आणि तिचं तेच उत्तर! तिला हे असं विचारताना मला गंमत वाटायची. पण का कुणास ठाऊक तिचं लग्न ठरू नये असं मला वाटत राहायचं!

एकेदिवशी माझ्या नेहमीच्या प्रश्नाला मात्र तिने अनपेक्षित उत्तर दिलं,” हो, ठरलं माझं लग्न! तुला दिसत नाही का माझ्या अंगावरचा रेशमी, फुला-फुलांचा शालू?” आणि असं म्हणून ती तिथून धावत धावत परत गेली आणि पुन्हा कधीच दिसली नाही!

मला धक्का बसला…. खरं तर असं धक्का बसण्यासारखं काही नव्हतं…पण मलाच कळलं नाही काय झालं ते!

मलाही पुरत्या ठाऊक नसलेल्या एका अनामिक निराशेने मी धावत घराकडे निघालो. वाटेत उभ्या असलेल्या एकाला गटारात ढकलून दिलं, हातगाडीवाल्याच्या हातगाडीवरलं दूध सांडवलं, एका कुत्र्याला विनाकारण दगड फेकून मारला, नदीवरून आंघोळ करून सोवळ्यात परतणा-या एका पुजा-याला मुद्दाम धडक दिली आणि त्याच्याकडून ‘आंधळा’ अशी उपाधी स्विकारली…. घरी कसा आलो ते समजलेच नाही! कशाचा राग आला होता… कुणास ठाऊक?

बाजारातल्या टांगेवाल्यांच्या नेहमीच्या गोड शब्दांतील ओरडण्याकडे आज माझे लक्षही गेले नाही…. इतर ठिकाणचे टांगेवाले रस्त्याने चालणा-यांना शिव्या घालतात तसे इथले टांगेवाले जीभ चालवत नाहीत…. गोड शब्दांत पण नेमकं असं बोलतात की…. माणूस बाजूला झालाच पाहिजे.. खजील होऊन!

त्यानंतर ती दिसली, भेटली नाही… कोण जाणे कुठे गेली असावी… लग्नानंतर! आणि आज तीच माझ्यासमोर उभी होती. मी तिला ओळखायच्या आतच तिनेच मला ओळखलं.. अगदी नावानिशी!

मिसरूड फुटताच मी फौजेत भरती झालो. लग्न झालं, मुलं झाली. बालवयातील त्या महिनाभरातल्या त्या भेटी आणि ती माझ्या स्मृतींच्या पडद्यामागे नाहीशी झालेली होती.

पलटणीतून सात दिवसांची सुट्टी घेऊन गावी आलो. शहरातल्या न्यायालयात वडिलोपार्जित शेतीवाडीचा खटला सुरू होता, त्या कामासाठी आलो होतो. तिथेच पलटणीच्या कमांडरचा आदेश मिळाला…. ‘फौज परदेशात कूच करणार आहे. युद्धावर जायचंय… ताबडतोब हजर व्हा.’

आमच्या तुकडीचे नायक सुभेदार हजारासिंग अमृतसरमध्येच भेटले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला, बोधासिंग, दोघांनाही पलटण कमांडरसाहेबांचा आदेश मिळाला होता. ते ही कामे आटोपती घेऊन फौजेत परतण्याच्या तयारीत होते.

सुभेदार साहेब मला म्हणाले, ”लहानासिंग, तु तुझ्या गावावरून निघताना माझ्या घरावरून जाशील ना, तेंव्हा माझ्या घरी ये. आपण तिघे मिळूनच निघू!”

मी ताबडतोब घरी पोहोचलो, बांधाबांध केली, आई-वडिलांचा, पत्नी, मुलांचा निरोप घेतला आणि अंगावर वर्दी चढवून माझी ट्रंक डोक्यावर घेऊन निघालो. वाटेत सुभेदार साहेबांच्या गावच्या वळणावरून त्यांच्या घराकडे गेलो. मी आल्याचे अंगणातूनच साहेबांना आवाज देऊन सांगितले. साहेब आणि त्यांचा नौजवान मुलगा, बोधासिंग तयार होऊनच बाहेर आले.

“लहनासिंग, घरात जा. माझ्या पत्नीला तू ओळखत नसशील बहुदा.. कारण ती रेजिमेंटच्या क्वॉटर्समध्ये कधी राहिलीच नाही. पण तिने तुला लांबून येताना पाहताच ओळखलंय वाटतं. तिने तुला आत बोलावलंय. जा, ती काय म्हणतेय ते बघून ये!”

मी आश्चर्यचकित होऊन साहेबाकडे पाहिलं. मी तर या सुभेदारणीला आधी कधीच भेटलो नव्हतो. मग ती कशी मला ओळखते? कमाल आहे! तरीही मी सुभेदार साहेबांचा हुकूम समजून घरात गेलो.

घराच्या आतल्या ओसरीवर ती उभी होती. ढिली सलवार, त्यावर हिरव्या रंगाची ओढणी, अंगापिंडाने एखाद्या सरदारणीला शोभेल अशी.

“लहनासिंग! आठवतंय… तो अमृतसरचा बाजार, तुझं मला ‘लग्न ठरलंय का?’ म्हणून छेडणं आणि माझं ‘चल हट’ म्हणत पळून जाणं?” ती चेह-यावर आठवणींचा फुलोरा फुलवीत म्हणाली.

तळ्याच्या काठावर उभे राहून फक्त एक पाय पाण्यात, फक्त थोडासा ओला करून घ्यावा, म्हणून बुडवावा आणि तिथे पाणी प्रचंड खोल असावं, आणि आपण थेट तळाशी जावं, असं झालं मनाला. ती आता अशी दिसते? नंतर कधी कशी भेटली नाही? मनासारखं झालं असतं तर आज तिचा मुलगा बोधासिंग… आमच्या दोघांचा मुलगा असता… नाही? माझं मन पंचवीस वर्षे मागे गेलं.

“लग्न होऊन मी या सुभेदाराच्या घरात आले. सगळं व्यवस्थित होतं. सरकारने यांना शौर्य गाजवल्याबद्दल तिकडे गावाकडे जमीन बक्षिस देऊ केलीये. आता कुठं स्थिरस्थावर होतंय असं वाटू लागतं न लागतं तोच ही मेली लढाई सुरू झाली. आणि ती ही आपल्या मुलुखात नाही तर लांब तिकडे विलायतेत. आणि आता हे दोघं बाप-लेक निघालेत मोहिमेवर.” ती बोलतच राहिली.

“एक पाठोपाठ चार मुलगे घातले वाहे गुरूंनी पदरात. पण पहिले तिघे हे जग सोडून गेले लवकरच. आणि हा धाकटा बोधा, माझा एकुलता एक लेक, बापाच्याच पावलावर पाऊल टाकून फौजेत भरती झालाय. म्हणतो, बापा सारखंच नाव कमावेन.”

“लहनासिंग, माझं एक काम करशील?” तिने विचारले.

नाही म्हणायचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. ती काय सांगते आहे हे ऐकण्याआधीच मी मनानेच होकार दिलाही होता.

“लहनासिंग, लढाईत या दोघांची जबाबदारी आता तुझी. यांना काहीही होऊ देऊ नकोस. बोधासिंग अजून लहान आहे. एकच वर्ष झालंय फौजेत भरती होऊन. बोधाला सांभाळून परत आणशील लढाईतून? सुभेदारसाहेबांच्याही पाठीशी उभा राहशील ना? मी तुझ्यापुढं पदर पसरते! या दोघांशिवाय या जगात माझं दुसरं कुणीही नाही रे!” तिच्या डोळ्यांत आसवं आणि आवाजात कंप होता…!

“सुभेदारणी! तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही! ह्या दोघांची जबाबदारी आता माझी…. तुम्ही मला हक्काने सांगितलंत… हेच खूप आहे माझ्यासाठी!” असं म्हणत तिच्या पाणीदार डोळ्यांत पहात मी तिला पाठमोरा न होता, मागे मागे सरकत घराच्या उंब-याबाहेर पडलो.

सुभेदार साहेब आणि बोधासिंग चार पावलं पुढे होते… मी लांब लांब ढांगा टाकीत त्यांच्या पुढे जाऊन चालू लागलो. बोधासिंगची एक वळकटी माझ्या डाव्या हातात घेतली.

बोधासिंग माझ्याकडे पहात राहिला आणि मी त्याच्याकडे पाहून हसलो… ”चलो, पुत्तर! बहोत लंबा सफर है!”

सुभेदारणी आमच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात उंब-यामध्ये उभी असेल याची मला खात्री होती. मात्र मी मागे वळून पाहिले नाही… पण तिचा चेहरा मात्र डोळ्यांसमोरून जात नव्हता…. ती नजर माझा अगदी परदेशातल्या या बर्फाने गाडल्या गेलेल्या खंदकामध्येही सोबत होती आणि तिचे शब्द….. ‘माझ्या नव-याला आणि मुलाला सांभाळशील ना, लहनासिंग?’

आता माझी लढाई दोन्ही आघाड्यांवर होती… शत्रूला ठार करणे आणि या दोघांना शत्रूपासून दूर ठेवणे.. आणि सहीसलामत घरी पाठवणे… तिच्याकडे!

परदेशातल्या लढाईतल्या मैदानातील खंदकातील आज आमचा पाचवा दिवस…. कसला गोळीबार नाही की समोरासमोरची हातघाईची लढाई नाही. घोड्याला रपेट नसली आणि सैनिकाला लढाई नसली की ते अस्वस्थ होतात… तसंच झालं होतं सर्वांचं.

सुभेदार साहेब म्हणाले, ”अजून फक्त दोन दिवस. दोन दिवसांनी ताज्या दमाची कुमक येईल, मग आपण मागे हटू.”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments