डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गुड टच बॅड टच… – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मानसी अमेरिकेला मुलीकडे गेली होती. तिची नात अक्षी चार वर्षांची. एकदा तिच्या प्री स्कूल मधून एक पत्रक घेऊन आली आणि ते फडफडवत म्हणाली ममा, “ व्हॉट इज गुड टच अँड बॅड टच? टीचर म्हणाल्या, आपल्या प्रायव्हेट पार्ट्सना कोणाला हात लावू द्यायचा नाही. लावला कोणी तर लगेच ममा किंवा टीचर ना सांगायचं ! व्हॉट आर  प्रायव्हेट पार्टस ममा? “ चार वर्षाचं ते निष्पाप मूल  आईला आणि आजीला विचारत होतं. मानसीच्या आणि अक्षीच्या आईच्या, अल्पनाच्या डोळ्यात पाणी आलं. “अक्षी,तू आत्ताच आलीस ना स्कूल मधून? मी रात्री नीट सांगते हं तुला ! “ 

मानसीला तिचं बालपणआठवलं.मानसी वाड्यात वाढलेली मुलगी.लहानपण सगळं एकत्र खेळण्यात, इतर बिऱ्हाडातील मुलांबरोबर वाड्यात खेळण्यात जात होतं. मानसी दिसायला अतिशय सुंदर. निरोगीपणाचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सगळी मुलं एकत्र खेळायची. त्यात मुलगा मुलगी असे भेदभाव नसत .ते वयच मुळी अल्लड आणि निष्पाप ! तरीही वरच्या गॅलरीतून एखाद्या काकू लक्ष ठेवून असायच्या.  वाड्यात बरीच बिऱ्हाडं. सगळे लोक कुटुंब वत्सल, सगळ्याना दोनतीन मुलं असलेले.

वाड्याच्या अगदी पुढच्या भागात एका खोलीत एक ब्रम्हचारी काका रहात.  अगदी सज्जन, देवभोळे, रोज पूजाअर्चा, नित्य नियमाने देवदर्शन.कधी मान वर करून बघायचे नाहीत कोणाकडे ! अडीअडचणीला धावून जातील, मुलांना खाऊ देतील, आवडते होते ते सगळ्यांचे. त्यांचं वय असेल पंचावन्न साठ तरी !  मानसीची आई आजी त्यांना दर सणावारी मुद्दाम जेवायला बोलावत. वाड्यातले इतर लोक सुद्धा त्यांना आवर्जून गोडधोड देत. त्या दिवशी त्यांना ताप आला होता म्हणून  मानसीच्या आजींनं मानसीला सांगितलं, 

“ मानू, त्या नानाकाकांना एवढं ताट नेऊन दे ग जाताना. मग मी जाऊन बघून येईन हं त्यांना ! “ उड्या मारत मानू ते ताट घेऊन नानांकडे गेली. नाना खुर्चीवर बसले होते. मानू म्हणाली “  इथे ठेवलंय ताट. जेवून घ्या हं नाना “ .नाना म्हणाले ,” मानू जरा  ये ग इकडे ! मानूचं वय आठ नऊ वर्षाचं. ती जवळ गेली त्यांच्या. त्यांनी तिला मांडीवर बसवलं आणि तिचे मुके घेऊ लागले. नको तिथे त्यांचा हात फिरू लागल्यावर मानूच्या लक्षात आलं, हा स्पर्श नेहमीसारखा नाही. काहीतरी वेगळा आहे. तिने कशीबशी सुटका करून घेतली आणि घरी येऊन मुसमुसून रडायला लागली. त्या रात्री  फणफणून  ताप भरला मानूला. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला, शुभाला मानूनं हे चार दिवसांनी सांगितलं. शुभाही मानू एवढीच. शुभा म्हणाली,

“ मानू,मीही कोणाला सांगितलं नाही ग, पण मलाही नानांनी असंच केलं होतं. मला आत बोलावलं, दार लावून घेतलं आणि माझ्या चड्डीत हात घातला. मी चावले त्यांना आणि आले पळून. वाईट आहेत नाना. घाणेरडे.कद्धी जायचं नाही आपण तिकडे आता. मी हे आईला पण नाही सांगितलं “ .शुभा रडवेली होऊन मानूला सांगत होती. “ अग, चॉकलेट देतो म्हणतात आणि आमच्या छोट्या बिट्टूशीही असेच घाण चाळे करतात.मानू, हे आपण तुझ्या आजीला सांगूया.” मानूला आपल्याबरोबर शुभाही आहे म्हणून धीर आला. मग शुभाची आई दुसऱ्या दिवशी मानूच्या आजीकडे आली. “आजी, कसं सांगू समजत नाहीये पण…”त्या घाबरून गप्प झाल्या.” अहो बोला ना शुभाच्या आई, काय सांगायचंय? “ शुभाच्या आईनं शुभा बिट्टू आणि आता  मानूलाही नानांनी काय केलं ते सांगितलं. आजी संतापाने लाल झाली. “ बरं झालं सांगितलंत मला ते. काय हो ही विकृत माणसं तरी ! वेळेवर लग्न करत नाहीत आणि अशा वासना भागवायला बघतात. काय करू काही सुचत नाहीये बघा. पण आपण खबरदारी घेऊया. कोणीही लहान मुलं त्यांच्याकडे पाठवायची नाहीत. सगळ्याना सांगून ठेवा तुम्ही. शी: ! मनातून उतरून गेला बघा हा माणूस ! पण आपणच खबरदारी घेऊया, आणि कोणतेही मूल, एवढंच कशाला, एकटी तरुण मुलगी, बाई कोणी जायचं नाही त्यांच्याकडे !” 

बहुतेक हे नानांच्या लक्षात आलं असावं. त्या काळी भाड्याने जागा मिळणं इतकं अवघड नव्हतं. काहीच महिन्यात नाना ती जागा सोडून गेले. वाड्यात सगळ्यांना  हायसं झालं. मानूची आजी वाड्यात सगळ्यांचा आधारवड होती.  तीही विधवा आणि तरुणपणीच नवरा गेलेला ! किती भोगलं सोसलं असेल तिनं. तिनं मानू आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलावलं आणि सांगितलं, “ तुम्ही अजून लहान आहात.  पण कोणी असं भलतीकडे हात लावायला लागलं, मग ते शाळेतले शिपाई असोत, गुरुजी असोत किंवा कोणीही असो, लगेच मोठ्या माणसांना सांगायचं. भिऊन गप्प बसून सहन नाही करायचं .मुलींनो, तुम्हीच जपायचं स्वतःला! यातून कोवळे मुलगेही नाही सुटले. बिट्टू, तूही हे ऐकून ठेव आणि तुझ्या मित्रांना सांग. आत्ता कदाचित हे तुम्हाला समजणार नाही. तरीही लक्षात ठेवा.” 

किती हुशार, चतुर, आणि चाणाक्ष होती मानूची आजी ! मानसी मोठी झाली, मेडिकलला गेली. आजी ही तिची जिवाभावाची मैत्रीण झाली. आईपेक्षा मानसीचं आजीशी जास्त जमायचं. मानसीला असे अनुभव पुढेही येत गेले. पण ती सावध असायची. गाण्याच्या क्लासमधले सर जेव्हा तिला एकटीला क्लास झाल्यावर थांब म्हणायला लागले तेव्हा ती कधीही थांबली नाही. ती आणि शुभा कायम बरोबर असत. बिट्टूही आता मोठा झाला. ‘कोणी असं केलं तर मला सांगा, बघतोच त्याच्याकडे,’ असं म्हणून त्याचा आधार वाटावा इतका मोठा झाला. 

मानसीने आजीला विचारलं, “ आजी आपले आजोबा तर तू किती लहान असताना गेले असं तू सांगतेस. मग कशी ग राहिलीस त्या एकत्र कुटुंबात? तुझ्यावर नाही का आले असे वाईट प्रसंग ? तू तर पंचवीस-तीस वर्षाचीच होतीस ना? “ आजीने मानूला जवळ बसवलं. “ मानू, तूही आता लग्नाला आलीस, डॉक्टर झालीस, तुलाही हे सगळं विकृत जग बघायला मिळाले असेलच, म्हणून बोलते तुझ्याजवळ. बाळा, नाही आले कसे ग? तो काळ किती वेगळा होता. बाईने म्हणजे उंबऱ्याआडच रहायचं. काय हिम्मत होईल तिची पुढं होऊन बोलायची? आम्ही मिळवत्या नव्हतो ग बाळा ! घराबाहेर काढलं तर कुठे जाणार? त्याकाळी आईवडीलही मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत नसत ग. कठीण होता तो काळ ! मी सुंदरच होते, तरुण होते,आणि मला नवऱ्याचा आधार नाही. मग काय ग ! माझ्यावरही कमी नाही प्रसंग आले मानू. लोकांना वाटायचं ही विधवा बाई, आहे आपल्याला सहज उपलब्ध !  कुठे मागणार ही दाद ! कोण म्हणेल ही खरं बोलते ! आमचे तेव्हा एकत्र कुटुंब,आला गेला पै पाहुणा तर सतत ! मला अजून आठवतं ,सकाळी मी जी लवकर उठून कामाला जुंपायची ती रात्रीच उशीरा पाठ टेकायची अंथरुणाला.  जावा सतत  बाळंतिणी. मी बरी होते  हमाल फुकट राबणारा ! “ 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments