सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

रामजानच्या तीस दिवसांच्या (उपवासाच्या)नंतर ईद आलीय. किती मनोहर, आनंददायी पहाट आहे. वृक्षांवर अजब हिरवेपण आहे. शेतात खास अशी चमक आहे. आभाळात वेगळाच लालिमा आलाय. आजचा सूर्य पहा. किती हवाहवासा, किती शीतल…. जसं काही सगळ्या जगाला शुभेच्छा देतोय. गावात किती गडबड आणि किती उत्साह आहे. इदगाहला जाण्याची तयारी होते आहे. कुणाच्या कुडत्याला बटण नाही. शेजारच्या घरातून आणण्यासाठी पळतोय. कुणाचे बूट कडक झालेत. त्याला तेल घालण्यासाठी तेल्याच्या घरी धावतोय. भराभर बैलांना वैरण-पाणी द्यायचं चाललय. इदगाहहून परतताना दुपार होईल. तीन कोसांचा रास्ता. पायी जायचं. तिथे शेकडो लोक भेटणार. यायला दुपार होणारच. मुलं अगदी खूश आहेत. कुणी एका दिवसाचा रोजा ठेवलाय. तोही दुपारपर्यंत. कुणी कुणी तेवढाही नाही. पण इदगाहला जायची खुशी त्यांनाही आहेच. रोजे मोठ्यांसाठी-म्हातार्‍यांसाठी असतील. मुलांसाठी मात्र ईद आहे. रोज ईदच्या नावाचा जप होतोय. ती आज आलीय. आता त्यांना घाई झालीय. ही मोठी माणसं लवकर लवकर का आवरत नाहीत.

संसारातील चिंता, अडचणी यांच्याशी मुलांचा काय संबंध? शेवयांसाठी दूध, साखर आहे की नाही, तो मोठ्यांचा प्रश्न. मुलं शेवया खाणार. त्यांना काय माहीत आब्बाजान व्याकूळ होऊन चौधरी कयाम अलींच्या घरी पळत पळत का जाताहेत? त्यांना काय माहीत, की त्यांनी स्नेह कमी केला, तर ईद मोहरममध्ये बदलून जाईल. त्यांच्या खिशात कुबेराचं धन भरलय. पुन्हा पुन्हा खिशातून आपला खजिना काढून ते मोजताहेत आणि खूश होऊन पुन्हा ठेवताहेत. महामूद मोजतोय. एक…. दोन… दहा… बारा… त्याच्याजवळ बारा पैसे आहेत. मोहसीनजवळ एक…. दोन… दहा… बारा…पंधरा पैसे आहेत. या अगणित पैशातून अगणित गोष्टी ते घेणार आहेत. खेळणी, मिठाई, शिट्टी, चेंडू….. आणखी न जाणे काय काय घेणार आहेत. सगळ्यात जास्त प्रसन्न आहे तो हमीद. तो चार-पाच वर्षांचा आहे. अशक्त आणि दुबळा. त्याचा बाप गेल्या वर्षी पटकीने गेला आणि आई कुणास ठाऊक, कशाने पिवळी पडत एक दिवस मरून गेली. काय आजार झाला, कुणाला कळलंच नाही. सांगितलं असतं, तरी ऐकणारं कोण होतं? जे अंगावर पडेल, ते मुकाट्याने झेलत होती बिचारी. आता हमीद आपली म्हातारी आजी अमिनाच्या कुशीत झोपतो. अगदी प्रसन्न आहे तो. कारण त्याचे अब्बाजान पैसे मिळवायला गेले आहेत आणि खूपशा थैल्या घेऊन येणार आहेत. अम्माजान अल्लाह मीयाँच्या घरून त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आणायला गेलीय. त्यामुळे तो अगदी प्रसन्न आहे.

आशा ही एक मोठी गोष्ट आहे. मुलांच्या आशेबद्दल काय बोलावं. त्यांची कल्पना तर राईचा पर्वत बनवते. हमीदचे बूट फाटले आहेत. डोक्यावर एक जुनी-पानी टोपी आहे. त्याचा गोंडाही काळा पडलाय, पण तो प्रसन्न आहे. त्याचे अब्बाजान पैशांच्या थैल्या घेऊन येतील आणि अम्मीजान दुर्लभ वस्तू घेऊन येईल, तेव्हा त्याची स्वप्नं पूर्ण होतील. तेव्हा तो बघेल, की महमूद, मोहासीन, नूरे आणि सम्मी कुठून एवढे पैसे आणतील?

अभागिनी अमिना आपल्या घरात बसून रडते आहे. आज ईद आहे, पण तिच्या घरात दाणाही नाही. आज अबीद असता, तर काय आशा तर्‍हेने ईद आली असती, आणि निघून गेली असती? या निराशेच्या आंधारात ती बुडत चालली होती. कुणी बोलावलं होतं या निर्लज्ज , बेशरम ईदला. या घरात तिचं काही काम नाही, पण हमीद! त्याचा कुणाच्या जगण्या-मारण्याशी काय संबंध? त्याच्या आत प्रकाश आहे. बाहेर आशा. विपत्ती आपलं सारं सैन्य-बळ एकवटून येऊ दे. हमीदच्या आत आसलेला उत्साह, आनंद तिचं विध्वंस करून टाकेल.

हमीद आत जाऊन दादीला सांगतो, ‘तू मुळीच घाबरू नकोस अम्मा, मी सगळ्यात आधी जाईन. तू आजिबात घाबरू नकोस.’

अमिनाच्या मनाला टोचणी लागली होती. गावातील सगळी मुलं आपापल्या बापाबरोबर चाललीत. हमीदला अमिनाशिवाय कोण आहे? त्याला एकट्याला जत्रेत कसं जाऊ द्यायचं? त्या गर्दीत मुलगा कुठे हरवला बिरवला तर? नाही अमिना त्याला एकट्याला नाही जाऊ देणार? तीन कोस कसा चालेल? पायाला भेगा पडतील. बूटसुद्धा नाहीत. ती गेली असती, म्हणजे अधून मधून त्याला कडेववर घेतलं असतं. पण इथे शेवया कोण शिजवणार? पैसे असते म्हणजे येताना सगळ्या गोष्टी आणून पटपट शेवयाची खीर बनवता आली असती. इथे तर सगळ्या गोष्टी जमा करायला तास न् तास जाणार. मागून आणायचं. त्यावरच भिस्त ठेवाया हवी. त्या दिवशी राहिमनचे कपडे शिवून दिले होते. आठ आणे मिळाले होते. ते आठ आणे तिने आजच्या ईदसाठी अगदी इमानदारीने सांभाळून ठेवले होते, पण काल गवळण अगदी डोक्यावरच बसली. मग काय करणार? हमीदसाठी बाकी काही नाही, तरी दोन पैशाचं दूध तरी हवं ना! आता फक्त दोन आणे राहिलेत. तीन पैसे हमीदच्या खिशात आणि पाच पैसे अमिनाच्या बटव्यात. एवढीच यांची दौलत आहे. ईदचा सण. अल्लाहच यातून पार करेल. धोबीण, न्हावीण, मेहतरीण, बांगडीवाली सगळ्या येतील. सगळ्यांना शेवया हव्या. थोड्या दिल्या तर कुणाला चालणार? कुणाकुणापासून तोंड लपवणार? वर्षाचा सण. जीवनात कल्याण, मंगल होवो, असं सांगणारा सण. ज्याचं त्याचं नशीब, ज्याच्या त्याच्या सोबत. मुलाला खुदाने सुरक्षित ठेवावं. हेही दिवस निघून जातील.

गावातून लोक निघाले. इतर मुलांसारखा हमीदही निघाला. मुलं कधी कधी पळत पुढे जात. मग एखाद्या झाडाखाली थांबून बरोबर आलेल्या मोठ्या माणसांची वाट बघत. त्यांना वाटे, ही माणसं इतकी हळू हळू का चालताहेत? हमीदच्या पायांना तर जसे पंख लागले होते. तो कधीच थकणार नाही. शहर आलं. शहराच्या दोन्ही बाजूला धनिकांच्या बागा आहेत. घराच्या चारी बाजूंनी पक्क्या भिंती आहेत. झाडं आंबे आणि लिची यांनी लगडलेली आहेत. एखादा मुलगा लहानसा दगड उचलून आंब्यावर मारतोय. माळी आतून शिव्या देत बाहेर येतो. पण मुले तेथू फर्लांगभर अंतरावर पोचली आहेत. खूप हसताहेत. माळ्याला कसं मूर्ख बनवलं.

मोठ्या मोठ्या इमारती येऊ लागल्या. हे कोर्ट. हे कॉलेज. हा क्लब. इतक्या मोठ्या कॉलेजात किती मुले शिकत असतील? सगळीच मुले नाहीयेत. मोठी मोठी माणसेसुद्धा आहेत. त्यांना मोठ्या मोठ्या मिशा आहेत. इतकी मोठी झाली, तरी अजून शिकताहेत. कधीपर्यंत शिकणार आणि इतकं शिकून काय करणार कुणास ठाऊक? हमीदच्या मदरशात दोन –तीन मोठी मुले आहेत. अगदी तीन कवडीची. रोज मार खातात. कामचुकारपणा करतात ना! या जागेतही तसल्याच प्रकारचे लोक असतील. क्लबमध्ये जादू आहे. इथे मृतांच्या खोपड्या धावतात, असं ऐकलय. मोठे मोठे तमाशे होतात, पण कुणाला आत जाऊ देत नाहीत. इथे संध्याकाळी साहेब लोक खेळतात. मोठी मोठी माणसे आहेत. दाढी मिशा असाणारी आणि मेमसुद्धा खेळतात. आमच्या अम्माला ते द्या. काय नाव? बॅट. तिला ती पकडताच येणार नाही. फिरवतानाच कोलमडून पडेल.

महमूद म्हणाला, ‘आमच्या अम्मीजानचा तर हातच कापू लागेल. अल्ला कसम.’

मोहसीन म्हणाला, ’ अम्मी मण मण पीठ दळते पण जरा बॅट पकडली, तर हात कापायला लागतील. शेकडो घागरी पाणी काढते. पाच घागरी तर म्हैसच पिते. कुणा मेमला पाणी काढायला सांगितलं, तर डोळ्यापुढे अंधेरी येईल.’

महमूद म्हणाला, ‘पण पळू तर शकत नाही ना! उड्या तर मारू शकत नाही ना!’

यावर  मोहसीन म्हणाला, ’हं! उड्या मारू शकत नाही, हे खरं; पण त्या दिवशी आमची गाय सुटली आणि चौधरींच्या शेतात गेली, तेव्हा अम्मी इतकी जोरात पळाली, की, मी तिला गाठू शकलो नाही, खरंच!’

मुलं पुढे गेली. ही पोलीस लाईन आहे. कॉन्स्टेबल कवायत करताहेत. रात्री बिचारे जागून जागून पहारा देतात. नाही तर चोर्‍या होतील. मोहसीननं प्रतिवाद केला, ‘मग फारच माहिती आहे तुला. अरे बाबा हेच चोर्‍या करवतात. शहरातले जेवढे म्हणून चोर डाकू आहेत, सगळे यांच्याशी संबंध ठेवून आहेत. रात्री हेच चोरांना सांगतात, चोरी करा आणि आपण दुसर्‍या मोहल्ल्यात जाऊन ‘जागते रहो… जागते रहो…चा पुकारा करतात. म्हणून यांच्याजावळ एवढे पैसे असतात. माझे एक मामा कॉन्स्टेबल आहेत. पगार वीस रुपये, पण पन्नास रुपये घरी पाठवतात. अल्लाह कसम! मी एकदा विचारलंसुद्धा, ‘मामू इतके पैसे आपल्याला कुठून मिळतात? हसून म्हणाले, बेटा, अल्लाह देतो. ‘ मग आपणच म्हणाले, ‘आम्हाला वाटलं, तर दिवसात लाख रुपये मारू शकतो, पण आम्ही एववढेच घेतो. त्यामुळे आमची बदनामीही होणार नाही आणि आमची नोकरीही जाणार नाही.’

हमीदने विचारले, ‘हे लोक चोरी करवतात, तर कुणी यांना पकडत कसं नाही?’ मोहसीन त्याच्या मूर्खपणावर दया दाखवत म्हणाला, ‘अरे वेड्या, यांना कोण पकडणार? पकडणारे तर हेच आहेत ना! पण अल्लाह त्यांना खूप शिक्षाही देतो. हापापाचा माल गपापाही होतो. थोड्याच दिवसात मामूच्या घराला आग लागली.  सारी जमा पुंजी जळून गेली. एक भांडंसुद्धा राहिलं नाही. झाडाखाली झोपले. अल्लाह कसम! मग कुठून कोण जाणे, शंभर रुपये कर्ज घेतलं, तेव्हा भांडी-कुंडी आली.’

‘शंभर तर पन्नासपेक्षा जास्त आहेत ना,’ हमीदने विचारले. 

‘कुठे पन्नास आणि कुठे शंभर? पन्नास तर एका थैलीतच मावतात. शंभर दोन थैल्यातसुद्धा मावणार नाहीत!’

  ईदगाह  क्रमश: भाग १ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments