डॉ. भारती माटे
चित्रकाव्य
ताठ कणा एकच सांगतो… कवी : श्री प्रमोद जोशी
प्रस्तुती : डॉ. भारती माटे ☆
☆
वाफाळलेला भात नाही,
तव्यावरची नाही पोळी!
पुढ्यात घास, मागून शिरते,
बंदुकीची अज्ञात गोळी!
*
आवडलं तर मागणं नाही,
नावडलेलं टाकणं नाही!
ताठ कणा एकच सांगतो,
मृत्युसमोर वाकणं नाही!
*
डायनिंग टेबल सोडाच राव,
ताट नाही, पाट नाही!
मरण मात्र येतं तेव्हा,
एवढा मोठा थाट नाही!
*
पांढरं कफन आपलं आणि,
तिरंग्यातून त्यांचा देह!
प्रत्येक क्षण घाताचा पण,
मातीवरती सच्चा स्नेह!
*
आपण खातो खाण्यासाठी,
त्यांचं जितं ऱ्हाण्यासाठी!
बर्फात कुठलं ऊन पाणी,
रसिकपणे न्हाण्यासाठी?
*
सगळं नको तसंच असून,
तक्रारीचा नाही सूर!
दिवा तेवतो वंशाचा तो,
हजार मैल असतो दूर!
*
त्यांच्या डोळ्यात तेल तरी,
आपल्या डोळ्यात नसतं पाणी!
त्यांच्या घरात शोक म्हणून,
आपल्या ओठात सुरेल गाणी!
*
पगार मिळतो मरणासाठी,
अशी दुसरी नोकरी नाही!
थोडीतरी उब आहे,
अशी यांची भाकरी नाही!
*
“भारत माँ की जय! “म्हणताच,
रक्त आतूर सांडण्यासाठी! …
☆
कवी : श्री प्रमोद जोशी
देवगढ़
© प्रस्तुती : डॉ. भारती माटे
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈