चित्रकाव्य
बकुळी… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि कवी : अज्ञात – प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
( १ )
इवले इवले बकुळफुल
परंतु मंद गंधाचे भंडार
वळेसर बनुनी माळता
कचसंभारी अलंकार
*
प्रेमभारल्या आठवणींना
बकुळ फुलाची उपमा
दिवस कितीही लोटले तरी
गंध जाणिवाची प्रतिमा
*
काळजाच्या कुपीत जपती
मंदगंधीत आठवणींना
एकांती कुपी हळू उघडता
पुन्हः प्रत्यय येतो पुन्हा
*
बकुळ फुलासम आठवणी
वर्तमानी जगण्या बळ देती
हळू डोळे मिटून घेता
रिता खजिना आपुल्या पुढती
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆ ☆ ☆ ☆
☆ बकुळी… – ☆ सुश्री कवी : अज्ञात – प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे ☆
( २ )
बकुळीच्या झाडाखाली वेचत असता फुले
मनाच्या ओंजळीतून खूप काही सांडले
*
वेचता वेचता फुले लहानपण आठवले
उशीर झाला म्हणून पाठीतले धपाटे आठवले
*
एक फूल माझ्याशी व्यथा मांडून गेले
तेव्हापासून मनात त्याचे दुःख कोरले गेले
*
हल्ली मला उचलून घ्यायचे कष्ट कुणी घेत नाहीत
तसंही मला माळण्यासाठी लांब केसही उरले नाहीत
*
दोन वेण्या घातलेली परकरी नात बघता बघता गायब झाली
सर ओवत बसलेली आजीही नजरेआड गेली
*
बरं झालं तू आलीस ओंजळ तुझी भरली
कुणीतरी आमची दखल आज घेतली
*
माहिती आहे मला माझे जीवन एका दिसाचे
पण व्रत मात्र आमचे अव्याहत सुगंध लुटायचे
*
रोज झाडावरून ओघळून जमिनीकडे झेपावतो
तेव्हाच मनात आमच्या विचार एक येतो
*
असो जीवन एक दिवसाचे, आपण सुगंध लुटावा
प्रत्येकाच्या आयुष्याचा माझ्यापरी बकुळ व्हावा
*
सुकून गेलो तरीही गंध मागे ठेऊन जातो
प्रत्येकाच्या हृदयात अविरत मी दरवळतो
☆ ☆ ☆ ☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈