सौ. उज्ज्वला केळकर
चित्रकाव्य
– कळाहीन…
☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
कधी काळी
मला एकट्यालाच टाकून
तू गेली होतीस निघून
शिशिराच्या गोठवणा-या थंडीत.
त्यावेळी
तुझ्या त्या पाठमो-या आकृतीवर,
तुझ्या पाऊलखुणांवर,
गतस्मृतींवर,
नजर खिळवित उभा होतो मी
त्यांना आपले वैभव अर्पित,
अश्रू ढाळीत आसमंतात.
मग आज अशी अवचित
दशदिशांना दिपवीत
कणाकणाला उजळीत
कशाला आलीस पुन्हा,
अमृतकण शिंपीत?
माझ्या पतझड़ल्या
थकलेल्या, शिणलेल्या
गात्रांना जीवन द्यायला
संजीवनी होऊन ?
☆
नको घालूस त्यावर
तुझी चैतन्याची फ़ुंकर
नको ग पालवूस
नव्या पालवीची पाखर
नको नको भारूस
तुझ्या वासंतिक पैंजणांनी
नको नको ग फुलवूस
मधु मधुर गंधांनी…
☆
कारण माहीत आहे मला,
अशीच फ़सवून, फुलवून
पुष्पपाशात बद्ध करून
तू जाणार आहेस निघून
पुन्हा मला कळाहीन करून.
☆
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈