सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
कवितेचा उत्सव
☆ दहशतवादी माणूस होतो… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(पादाकुलक वृत्त – मात्रा:8+8=16)
☆
उंच उंच देवदार होते
नयनरम्य त्या मोहकस्थानी
हिमनग सारे अंथरलेले
किती देखणे आरस्पानी
*
कसे अचानक तिथे पातले
दानव सारे दुराभिमानी
काळ पातला वेळ घेउनी
विरून गेली अशी कहाणी
*
सौंदर्यातच क्रौर्य उतरले
स्वर्ग नरक ना भेद राहिला
यमदेवाचा घाव अचानक
या जागेने पुन्हा पाहिला
*
स्वप्न घेउनी आले होते
जीवन सारे करण्या सुंदर
पहेलगामने दिले असे की
संपत गेली रम्य धरोहर
*
दहशतादी माणूस होतो
विचार सारे विकृत ज्याचे
मरणाची ना भितीच कुठली
जगण्याशी ना नाते त्याचे
*
सौंदर्याने निसर्ग नटला
निष्पाप रक्त सांडले तिथे
सावित्रीचे श्वास थांबले
तो सत्यवान संपला जिथे
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈