श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
गेले ते दिन गेले… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
(एकाच शीर्षकाच्या पण भिन्न आशय असलेल्या दोन रचना करायचा प्रयत्न केला आहे!) 🙏
☆
😪😪 “गेले ते दिन गेले! ” 😪😪 (१)
☆
आग ओकुनि मध्यान्हीला
निघतसे रविराज अस्ताला,
जाणून संकेत सारे पक्षीगण
येती परतुनी घरट्याला!
*
येता नजीक सांजवेळ ती
धेनू वासरे गोठ्या वळती,
बाया बापड्या माजघरात
करती सारख्या सांजवाती!
*
सुरु करती पाढे परवचा
बसून ओळीत सान थोर,
रांधण्या स्वयंपाक बायका
मग बांधिती ओचा पदर!
*
भोजनोत्तर झोपाळ्यावर
चाले भेंड्यांचा रम्य खेळ,
तो संपताच साधे कुणी
टाळांचा अभंगाशी मेळ!
*
येता फर्मान आजोबांचे
सगळे शयनगृही पळती,
गोष्ट ऐकण्या आजीची
कान आपापले टवकारती!
*
भिऊन गोष्टीतल्या राक्षसा
बसे पोरांची पाचावर धारण,
कळत नसे केव्हां जाती
मग निद्रादेवीच्या अधीन!
मग निद्रादेवीच्या अधीन!
☆ ☆ ☆ ☆
🙏 😞🙏 गेले ते दिन गेले! 🙏😞🙏
☆
पंगत लग्नाची पाटावरची
आता आठवात राहिली,
पंगतीत भोजनानंदाची
हल्ली वेळच नाही आली!
*
घमघमाट उदबत्यांचा
अजून दरवळे नाकात,
ताटा समोर रांगोळीचे
रूळ धावती रेषेत!
*
ताट सजे पाटापुढचे
नानाविध पदार्थांनी,
वाढती स्वतः यजमान
आग्रह कर करुनी!
*
होता गजर नमः पार्वतीपतेचा
उडे लगबग वाढप्यांची,
जिलब्या खाण्यावरून
पैज लागे खवय्यांची!
*
कधी चालती रुसवे फुगवे
आहेर देण्या घेण्यावरूनी,
मामा करे मांडवळ मांडवात
नवरदेवास छान पटवूनी!
*
होता मग संध्याकाळ
सुरु तयारी वरातीची,
दिवे पेट्रोमॅक्स डोक्यावरचे
शान वाढवती खास तिची!
*
सुजाता ब्रास बँड वाजवी
सगळी दर्दभरी गाणी,
निरोप देई लेकीस वधूपिता
लपवून डोळ्यातले पाणी!
लपवून डोळ्यातले पाणी!
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈