प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ रस्ते बोलतात… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
रस्ते बोलतात, रात्रीच माझ्याशी
मैत्रिण आहे आमुची तू खासी
सुखदु:खे सारी माहित ग तुला
तरीही सांगतो ठेविली उराशी…
*
किती वर्दळ ती किती ग वाहने
नशिबात आहे पण ग सोसणे
घेऊन तुम्हाला जाण्यात आनंद
युगे गेली आली जडलाय छंद…
*
रामकृष्ण झाले राजे आले गेले
अहिल्येने किती रस्ते ते बांधले
अशोकाने किती लावली ग झाडे
आमुच्याही सोयी केल्या लाडेलाडे…
*
घाट मंदिरे नि रस्त्याचे निर्माण
राजे राण्यांचा तो होताच ग प्रण
आता आज काल आले ग विज्ञान
झटपट होती रस्ते आता छान…
*
कर्म ते करावे सांगतो ईश्वर
आमुचाही देह आहे ग नश्वर
नवीन मुलामा नवीन तो जन्म
सेवाभाव मग वाटतसे धन्य….
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈