सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री विनायक कुलकर्णी
🪻 अभिनंदन 🪻
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी तर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा ‘केशवसुत साहित्य पुरस्कार’ यावर्षी आपल्या समुहातील ज्येष्ठ गझलकार श्री. विनायक कुलकर्णी यांच्या ‘ऋतुपर्ण’ या गझलसंग्रहास प्रदान करण्यात आला आहे.
श्री. विनायक कुलकर्णी यांचे ‘ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 🌹
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त गझलसंग्रहातील गझल.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ कुठे?… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
[वृत्त.. पादाकुलक+बालानंद]
(मात्रा.. ८-८+८-६)
☆
ही पैश्यावर चाले दुनिया
माणुसकीला मोल कुठे?
दिसता बंडल मरते नीती
इथे मनाचा तोल कुठे?
*
नातीगोती लयास गेली
आपुलकीचे बोल कुठे?
उथळ जाहली आज सभ्यता
मनात माया खोल कुठे?
*
पुसून गेल्या साऱ्या सीमा
संस्काराचा गोल कुठे?
कुठे कालचा मानव होता
आणि आजचा झोल कुठे?
*
पिसाट झाले पापी सारे
पापकऱ्यांना टोल कुठे?
दानवतेचे तडतड ताशे
मानवतेचे ढोल कुठे?
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈