सौ. सुरेखा कुलकर्णी
☆ कवितेचा उत्सव ☆
☆ शब्दांची आरास… ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆
☆
कल्पनेच्या पालखीत
अक्षरांची रास
आशयाने मांडलेली
शब्दांची आरास ॥
*
भाव दाटती मनात
वाटे व्यक्त व्हावे
विचारांच्या सरितेने
प्रवाहात यावे
शब्द शब्द जुळवून
काव्य व्हावे खास॥
*
कधी दुःख सलते उरी
काट्यासमान
मायबोली मूर्त रूप
कवितेचा मान
दाद द्यावी रसिकांनी
हीच मनी आस ॥
*
मनातील आनंदाचे
शब्द रूप मोती
कागदाच्या गालिचावर
लेखणीने ओती
अलंकारानी सजवून
प्रतिभा सुवास॥
अक्षरांची रास
शब्दांची आरास॥
☆
© सौ. सुरेखा कुलकर्णी
सातारा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈