डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे… 🪔 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझा धर्म, माझा धर्म

तुझी जात, माझी जात

माझी देवता, तुझी श्रध्दा

घरात ठेवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझी साडी, माझी माडी

दाग-दागिने, कपडे भरजरी,

पैसे असतील खूप तिजोरी

घरात ठेवू श्रीमंती सारी

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तू गृहीणी, माझी नोकरी

तुझा पक्ष, सत्ता शिरजोरी

द्वेष, मत्सर, व्यंगावर मस्करी

चर्चा यावर नकोच करुया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

माझा गंध, तुझा रंग

सौदर्याचे विपरीत तरंग

विविध लोभी अंतरंग

नकली रुप सोंग-ढोंग

सोडून देऊया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझी माझी स्पर्धा कुणाशी ?

एकोप्याने सुंदर जगण्याशी

तिच्या मदतीला तिने धावण्याची

स्त्रीत्वातील माणूस जपण्याशी

ध्यानात ठेवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

क्षुद्र म्हणून तू-मी हिणलो

सावित्रीजोतीमुळे शिकलो सवरलो

आता कुठे भानावर आलो

निखळ जगणं अनुभवूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

तुझ्या माझ्यात द्वेष पसरेल

नफा त्याचा व्यवस्था उठवेल

व्यवस्था मग गुलाम बनवेल

स्वातंत्र्याचे मोल समजून

संघटीत राहूया..!

सावित्री होऊया ग सखे

माणूस होऊया..!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments