सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ माऊली… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
भिंतीवरले ताटाळे
अर्धचंद्र आकाराचे
पितळेचे रोवलेले
साक्षीदार स्वातंत्र्याचे
देशभक्त अन्नपूर्णा
रात्रंदिवस राबते
कार्यकर्त्यांचे जेवण
न थकता बनवते
“वंदे मातरम्” शब्द
मनामध्ये ठसविला
प्रेरणा, शक्ती देणारा
कार्यभाग निवडला.
माऊली न मागे कधी
देशकार्य प्रथम ते
स्वतःच्या या कृतीतून
आदर्श पुढे ठेवते
घडल्या पिढ्या अशाच
सुसंस्कारी सहजच
म्हणूनी, विश्वात शोभे
“भारत देश” एकच
पळीभर रक्त रोज
स्वातंत्र्याच्या कामी आले
सांडशीने निखाऱ्यास
युक्तीने हुलकावले
सत्पात्री अमृत दान
अनेक वीर जेवले
गाजविता पराक्रम
ताटाळे सोन्याचे झाले.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈