श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
वाऱ्याच्या बेताल वागण्याने
झाडा- घरांचे फारसे नाही बिघडले…
उभे पीक मात्र मोडून पडले…
***
कडूनिंबाची असो वा आंब्याची
दाट सुखावह असते छाया…
जशी आईची माया….
***
बहराचा ऋतू संपला की
झाड ओकबोक होतं..
मनातून..जनातून एकाकी पडतं…
***
वादळाने शेता घराची झालेली
पडझड साऱ्यांनीच पाहिली…
पण मनाची कुणालाच नाही दिसली…
***
वादळाने उठसूठ
धूळ..पाचोळयांचा छळ मांडला…
डोंगराशी झुंजताना मात्र घायाळ झाला…
***
फळांवर धरलेला नेम
चुकून चुकला….
निष्पाप फांदीने घाव सोसला…
***
वहातं पाणी थांबलं.
गढुळलं..शेवाळलं..
तहानलेल्या गुरांनीही टाळलं….
***
बेसूर वारे
कळक-बनातून गेले…
त्यांचे नादमधूर सूर झाले…
***
मकरंदासाठी फुलपाखरू
फुला फुलांवर गेलं…
पराग-सिंचन घडलं….
***
आडव्या डोंगराला
नदीने वळसा घातला…
प्रवाह हवा तिथे पोचला….
***
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈