डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ गोड बोलुया… डॉ.सोनिया कस्तुरे ☆
गोड बोलूया..!
गोड तर आपण जरुर बोलूया,
गोड बोलण्याबरोबर
खरं बोलू या…!
खरं बोलता येईल इतकं
निर्भीड बनूया…
माणसा-माणसातील भेद
आणि वाद संपवूया,
सत्याच्या पाठीशी उभं राहूया.
गोड तर जरुर बोलूया…!
मनातली जळमटं काढून टाकूया…
द्वेषभाव, तिरस्कार
राग, लोभ, मोह,
यांना तिलांजली देऊया.
दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करुया…
लहानथोरांचा सन्मान करुया
एकमेकांना समजून घेऊन
शेष आयुष्य विशेष करुया.
गोड बोलण्याबरोबर
खरं बोलूया…!
निसर्गाच्या संक्रमणाबरोबरच
अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाऊया.
अंधःश्रद्धेकडून डोळसपणाकडे
वाटचाल करुया…
अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करुया…
दारिद्र्याकडून समृद्धीकडे
संक्रमित होण्यास हातभार लावूया…
गोड तर जरुर बोलूया;
गोड बोलण्याबरोबर
खरं बोलूया…!
आपली आई, बहीण,
पत्नी, मुलगी यांच्यासमवेत
अखंड स्त्रीवर्गाचा सन्मान करुया…
‘तिला’ खूप सांगतो आपण
‘त्याला’ ही थोडं सांगूया.
बलात्कार, अन्याय, अत्याचार
होणार नाही
असा समाज घडवूया.
थोडं विवेकी होऊया…!
पैशापेक्षा कष्टाचा, माणुसकीचा
सन्मान करुया…
गोड बोलण्याबरोबर खरं बोलूया.
सत्याच्या पाठीशी उभं राहूया…!
गोड तर जरुर बोलूया…!!
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈