श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ बिदागी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
जसे करावे तसे भरावे असेच आहे
पुराणातले वचन खरे तर शिळेच आहे
मनी भरवले तसेच केले चुकले तेथे
बंधन काही वागायाला हवेच आहे
नकळत थोडा स्वार्थ साधला तुझाच तेव्हा
तुला वाटले जग सगळे हे खुळेच आहे
डळमळताना अंदाजाने पाय टाकला
थोडे घडले घडणे बाकी बरेच आहे
भ्रमात राहू नको वेंधळ्या उगीच खोट्या
तुला बळीचा बकरा केला बळेच आहे
सौजन्याच्या बुरख्या मागे लपव चेहरा
अपराधाने तुला बनवले लुळेच आहे
माणसासही प्रखर लालसा फसवत जाते
अविचाराने पाय घसरतो खरेच आहे
सोन्याची तर कुठे मिळाली तुला बिदागी
हाती आले ते कथलाचे कडेच आहे
आनंदाचा वसा घेतला टिकला नाही
उरले नशिबी अपमानाचे रडेच आहे
आता जगती कोण कुणाचा तारक नाही
तुझ्या चुकांचे भोग भोगणे तुझेच आहे
(अनलज्वाला)
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈