सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नवे वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
दिनदर्शिका पाहता-पाहता
वर्ष सरते डिसेंबर सरता
कडु-गोड आठवणींनी
फेर धरला दाट विणींनी
सुख-दु:खाच्या या धाग्यांनी
स्मरण होई तरल मनी
वर्षातील या प्रसंगातुनी
कटुतेलाही ही दूर सारुनी
आठवू गोडी माधुर्यातुनी
आप्त-स्वकिया सवे घेऊनी
निरोप देऊ मोद मानुनी
ओंजळीतल्या बकुळ फुलांनी
गंधासह त्या धुंद होऊनी
गतवर्षाला मनीच स्मरुनी
कालचक्र हे नित स्मरुनी
स्वागतास ही सज्ज होऊनी
वाट पाहू या अधिर होऊनी
नव वर्षाच्या रम्य क्षणी.
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈