सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ दिलासा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
गाठोडे प्रारब्धाचे
सोबतीला आणले
घुसमटता जीव
प्रवासी ते रडले
आईच्या कुशीतच
दिलासा ही मिळाला
इथे सापशिडीचा
तो खेळ सुरू झाला
पडलेल्या दानात
कोलांट्या मारताना
पहावेच लागते
शेजारी तुटताना
सुखदुःखाचे कोडे
उकलण्यात गुंतला
रहस्य रोज नवे
पाहून हरखला
नवल भूवरीचे
एकांतात पहावे
जन्म अपुरा आहे
हेच मान्य असावे
जगा आणि जगू द्या
मंत्र हा गिरवावा
श्रीरामास वंदूनी
आनंद जागवावा
प्रभूचीच रचना
आईची पाठराखण
आशीर्वाद कृपेचा
दुःखाची बोळवण
निराळ्या रूपांतच
आसपास भेटते
माऊली जगतास
मायेने सांभाळते
सुकर्म करण्यात
समय सजवावा
मिळाला जन्म असा
सार्थकीच लावावा.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈