सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ फुरसत🌊 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
आभासी या जगात साऱ्या
गुंता नकली नात्यांचा
कोण ते कसे कळावे
बाजारची हा मुखवट्यांचा
भासमान या दुनियेमध्ये
लाईक कमेंट अवती भवती
ज्याला त्याला विसर पडतो
आपली माती कुठली नाती
विश्व आले आज अवघे
ज्याच्या त्याच्या मुठीमधूनी
क्षितीज कवेत घेण्यासाठी
दूर चाललो काय सोडूनी?
मोबाईलशी जुळले नाते
विश्वाचे अंगण होई खुले
दोन प्रेमळ शब्दांसाठी
वृध्द जीव हे आसुसले
विस्तारू दे तरु कीर्तीचा
आम्हाही अभिमान तयाचा
फुरसत काढून वळून पहा
हालहवाल पुसा मुळांचा
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈