? इंद्रधनुष्य ?

☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमजवळ समुद्र सपाटीपासून आठशे फूट  उंच असलेल्या सुरेख व अप्रतिम  डोंगराचे नाव आहे  सिंहाचलम…!  सिंह आणि अचलम( पर्वत) म्हणजे सिंहाचलम..! सिंहाचा पर्वत ..!  समुद्रातीरावरच्या आंध्र प्रदेशातल्या  उत्तर विशाखापट्टणम पासून केवळ सोळा किलोमीटरवर  जवळ एक अप्रतिम असा पर्वत आहे आणि या पहाडावर एक सुरेख अनेक वृक्षांनी बहरलेले लहानसे स्वच्छ सुंदर शहरच आहे.पहाडा वरच्या रम्य वनश्रीत वसलेली जणूकाही देवभूमीच..! या उंच मार्गावर अननस,आंबे व अनेक फळांची व फुलांच्या झाडांची नुसती बहार आहे. या अनेक वृक्षांखाली मोठमोठ्या दगडी शिला स्थापित आहे आणि अनेक भाविक पर्यटक येथे दर्शना अगोदर नंतर  या सिंहाचलम पर्वतावर विश्रांती घेत असतात. हा पर्वत म्हणजे प्रभु नृसिंहाचे निवासस्थान मानले जाते.भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरिता प्रभू नृसिंह प्रगट झाले अशी अनादि काळापासून पारंपारिक मान्यता आहे आणि आपले बालपण अशा गोष्टीत रमून गेले होते.

लुनार वंशाचे ऋषि पुरुरवा हे आपली पत्नी उर्वशी सोबत वायु भ्रमण करत असताना एका विशिष्ट नैसर्गिक शक्तीने प्रभावित होऊन या सिंहाचलम पर्वतावर पोहोचले व त्यांना  एक विष्णूची प्रतिमा/मूर्ती  डोंगरात पुरलेली दिसली. ती मूर्ति काढून धुळ साफ करताना  भगवंताची आकाशवाणी झाली .मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन वर्षातून फक्त  एकदा भक्तांना मुळ मूर्तीचे दर्शन घडवावे व भक्तांचे कल्याण करावे.ऋषि पुरुरवा यांनी ही भगवंताची  आज्ञा मानून या शोधलेल्या ठिकाणी प्रतिमा /मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि भक्तांचा ओघ सुरू झाला. आज येथे भव्यदिव्य  श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात संपूर्ण चंदनाचा लेप असलेली  नरसिंहाची मूर्ती बघायला मिळते.या मंदिराची विशेषता अशी की येथे भगवान विष्णु हे वराह आणि नृसिंहच्या संयुक्त अवतारात लक्ष्मीसोबत स्थापित झालेले आहे आणि याची स्थापना भक्त प्रल्हादाने केली आहे असे मानल्या जाते.हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भक्त प्रल्हादाने हे मंदिर बांधले आणि ते काळाच्या ओघात या पहाडात गडप झाले आणि ऋषि पुरुरवा यांच्या दृष्टीस पडले.आतले मंदिर अतिशय भव्य असून बघितल्या बरोबर प्राचीनत्व जाणवते . मंदिरातले वातावरण अत्यंत भारावलेले असून मंद दिव्यांच्या आराशीची एक दिव्य झळाळी चन्दन मूर्ती समोर व मंदिरात दिसते.मूर्ती जवळ प्रवेश मिळतो. अकराव्या शताब्दीत मुळ मंदिराचे  गर्भगृह बांधल्या गेले असे समजते. विष्णूच्या  “वराह नरसिंह” रूपातले हे मंदिर आहे व इथल्या अनेक मंदिरात प्रत्येक खांबावर मूर्तीकलेचा प्राचीन  कलात्मक आविष्कार  बघायला मिळतो आणि त्या कलावंतांना दाद द्यावीशी वाटते. . वर्षभर मूर्ती चन्दन लेपाने झाकलेली असते आणि पुजारी पाटा वरवंट्यावर चंदनाचा लेप तयार करताना मंदिर परिसरात दिसतात. येथील मुख्य उत्सव चैत्र शुद्ध एकादशीला होणारा  “वार्षिक कल्याणम” आणि वैशाखातल्या तिसर्‍या दिवशीची “चन्दन” यात्रा असते  .याला “ चंदनोत्सव ” म्हणतात. मंदिरात कपाळावर चन्दन लाऊन चंदनाचा प्रसाद वाटला जातो. वैशाखातल्या अक्षयतृतीयेला संपूर्ण सिंहाचलमचे महोत्सवाचे  दृश्य बघण्यासारखे असते आणि देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. अक्षयतृतीयेच्या  दिवशी भगवान लक्ष्मीनृसिंहाचा ओल्या चन्दनाने अत्यंत आकर्षक शृंगार केल्या जातो. भगवंताचे वास्तविक स्वरूप केवळ याच एका दिवशी बघायला मिळते.

असुर शक्तिची संस्कृती  शक्तिशाली होत असताना असुर राज हिरण्यकश्यपू व कयाधुच्या पोटी विष्णुभक्त  प्रल्हादाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचे  वरदान असल्याने उत्तरप्रदेशातल्या हरदोईचा हा राजा हिरण्यकशपु  निरंकुश झाला होता.या राजाच्या  आदेशानुसार कुणीही राज्यात  विष्णुची भक्ति करू शकत नव्हते. पण पुत्र  भक्त प्रल्हादाची भगवान विष्णुवर  अतूट श्रद्धा असल्याने क्रोधित होऊन राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि बहीण होलीकाने या कपटात त्याला  मदत केले. होलिकेला आगीपासून संरक्षण असल्याने ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली परतू भगवंताच्या कृपेने प्रल्हादाला काहीच न होता होलीका भस्म  झाली आणि दुसर्‍याच  दिवशी भगवान नरसिंहाने विष्णुचे रूप घेऊन हिरण्यकशपुला मारले आणि प्रजेला अत्याचारा पासून मुक्त केले.ही घटना मात्र हरदोई येथे घडली असे समजते तर काही अभ्यासकांच्या मते ही घटना सिंहाचलमच्या पहाडावर  घडल्याचे सांगितल्या जाते.याची आठवण म्हणून होलिका दहन उत्सत्वाला हरदोइ पासून सुरवात झाली.  हिरण्यकश्यपुचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्याचा आणि तो तेथला राजा सुद्धा होता ..!   पण अत्यंत कठोर  तपस्येने व  भक्तीने त्याने ब्रंहादेवाकडून विचित्र वर मागून जवळपास अमरत्व प्राप्त केले. त्याला असे वरदान होते की कुठलाच मनुष्य,पशु, दैत्य, देवता, नाग, प्राणी, यांच्या कडून आकाश आणि जमिनीवर  मृत्यु येऊ नये. तसेच घरात व बाहेर , दिवसा व रात्री सुद्धा मृत्यु येऊ नये .पण भगवान विष्णुने नृसिंहाचे(ना स्त्री ना पुरुष)  असे रूप घेऊन त्याचा  अंत हरदोईच्या पहाडा वरील उंचीवरच्या  महालाच्या दरवाज्यात ऐन सायंकाळी केला आणि हिरण्यकशपुचे वरदान सुद्धा कायम राहिले.हिरण्यकश्यपूला मारल्यावर अनेक दिवसपर्यंत नृसिंहाचा क्रोध कायम होता व भक्त प्रल्हादाने हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. हाच क्रोधाग्नी शांत करण्याकरिता ते या  डोंगरावर  आले व “सिंहाचलम” हे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले . हरदोईला हिरण्यकशपुच्या किल्ल्यांचे काही अवशेष अजूनही बघायला मिळतात असे समजते. “हरिद्रोह” म्हणजे हरीचा द्रोह करणारा हे नाव हिरण्यकशपुने  ठेवले कारण तो हरी सोबत नेहमी द्रोह करायचा व पुढे त्याचे  हरदोई झाले.तर काही  अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार येथे हरीचे दोन अवतार झाले आणि ते  म्हणजे नृसिंह आणि वामन..! हरीने दोन वेळा येथे अवतार घेतले म्हणून याला “हरिद्वय”म्हणतात ..पुढे त्याचे हरदोई झाले अशीही मान्यता आहे . .हरदोईला हिरण्यकश्यपुची नगरी मानल्या जाते.प्रल्हाद कुंड व प्रल्हाद किल्ला व  नृसिंह मंदिर आजही हरदोईला बघायला मिळतात. याच्या वरून सिंहाचलम व हरदोई ही दोन्ही स्थळे प्रभु नृसिंहाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.भारतामध्ये नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत पण सिंहाचलमला नृसिंहाचे घर म्हटल्या जाते.         

पद्म पुराणानुसार प्राचीन काळात वैशाख महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह प्रकट झाल्याने हा त्यांचा जन्मदिवस मानला  जातो. 

असे हे भक्त प्रल्हाद व प्रभू नृसिंहाचे निवासस्थान   “नृसिंहाचलम” ..! पण काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन नृसिंहाचलम चे आज “सिंहाचलम” झाले ..!

लेखक :श्री श्रीकांत पवनीकर

पर्यटन लेखक, नागपूर.  

मो -9423683250

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments