श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

“संत माळेतील मणी शेवटला…

आज ओघळला एकाएकी … “

...सुमित्र माडगूळकर

रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकराकडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.

माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला ” समोर पहा, ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे, मला त्यात सामील व्हायचे आहे, तुम्हाला माहित नाही? गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.

आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग, प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली ” चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ, हीच या महाकवीला आपल्याकडून शेवटची श्रद्धांजली…. “.

—- 

१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ. असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.

— डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.

१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता, माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती, विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …

गदिमा आईला म्हणाले, “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा. तुम्हाला न्यायला गाडी येईल.”

आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.

”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले. गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते, रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंटवाला रुमाल. गदिमा म्हणाले ” मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप “. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले.थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला ” मंदे,अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.

विद्याताईंनी घाईघाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले ” कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा “. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले. गदिमांना दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून ” पपाआजोबा बोलत का नाहीत “  म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ? डॉक्टर काय करत आहेत ? “.

इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली.  ” महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले. अखेर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.

सकाळचाच प्रसंग..  बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ .. दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.

 फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता. बनुताइंचा प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली. बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती, पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या, त्यासाठी अडून बसल्या. शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली, सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास !.

पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्यांच्या निळ्या कोचावर सुद्धा. घरातले सगळे रडत होते, प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते. त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होतो, कधी नव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होतो. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.

— माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.

१५ डिसेंबर १९७७. प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली. जेव्हा अंतयात्रा डेक्कनवर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.

सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….

“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट… “

“संत माळेतील मणी शेवटला… आज ओघळला एकाएकी… “

अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. .गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत.

चंदनी चितेत जळाला चंदन…

सुगंधे भरून मर्त्यलोक 

लेखक : सुमित्र माडगूळकर 

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments