श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

भारतीय प्रमाणवेळ फ्रान्सपेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक १४ जुलै, २०२३ रोजी फ्रान्समध्ये सकाळचे दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे होतील, त्याच क्षणी एका मराठमोळ्या योद्ध्याचा भरभक्कम आवाज घुमेल आणि आसमंत थरारून उठेल! 

त्याच्या एका आज्ञेसरशी एकशे चोपन्न पावलं तिथल्या लष्करी संचलन पथावर आपल्या मजबूत पावलांचा पदरव करीत मोठ्या डौलाने चालू लागतील ! त्यांच्या पुढे असतील महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन अमन हनुमानराव जगताप…. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा ! 

फ्रान्समध्ये भारतीय सैनिकांची पडलेली ही काही पहिली पावलं नसतील. दोन्ही महायुद्धांमध्ये भारतीय सैनिक दोस्तसैन्याच्या बाजूने लढले आणि हजारोंच्या संख्येने धारातीर्थीही पडलेत! पहिल्या महायुद्धाने एक लाख तीस हजार भारतीय सैनिकांपैकी सुमारे चौऱ्याहत्तर वीरांचा बळी घेतला तर सदुसष्ट हजार योद्ध्यांना अपंगत्व पत्करावे लागले. दुसऱ्या महायुद्धातून तर तब्बल सत्त्याऐंशी हजार सैनिक माघारी परतले नाहीत! 

या युद्धांची कारणे, परिणाम काहीही असली, शत्रू-मित्र देश कोणतेही असले तरी, या युद्धयज्ञात एक लाख एक्केचाळीस हजार भारतीयांनी बलिदान दिले आहे, हा इतिहास आहे. यात पंजाबी वीरांची संख्या सर्वाधिक, अर्थात सुमारे त्र्याऐंशी हजार भरते. कणखर मनाच्या पंजाबी देहांतल्या रक्तात परंपरेने वहात असलेलं सैनिकी रक्त आज आपल्या स्वतंत्र भारताचे एक मोठे बलस्थान आहे!  

राष्ट्रगीताच्या पहिल्याच ओळीत आधी पंजाब आणि अखेरीस मराठा हे शब्द येतात, हा एक योगायोग खचितच नसावा! 

फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात चौदा जुलै हा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि फ्रान्स देश या दिवसाच्या स्मृती तेथील जनमानसात कायम रहाव्यात म्हणून या दिवशी खास लष्करी पथसंचलनाचे आयोजन करतो.

आपला भारत आणि फ्रान्स यांचं लष्करी नातं तसं खूप जुनं असलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत या संबंधांना उत्तम भक्कम परिमाण लाभले आहे. राफेल विमानांनी आपल्या वायूदलाला अधिक बळ प्राप्त झालेले आहे. जागतिक राजकारणातही फ्रान्स आपला मित्रदेश आहे. 

भारत-फ्रान्स लष्करी सहकार्याचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याचं निमित्त साधून फ्रान्सने भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. याच बरोबर भारताच्या तिन्ही सेनादलांची प्रत्येकी एक तुकडी या पथसंचलानात सहभागी होत आहे. राजपुताना रायफल्सचा वाद्यवृंदही आमंत्रित केला गेला आहे. 

भारताचे लष्करी सामर्थ्य, सैनिकांचा रुबाब जगाला दाखवण्याची ही संधी साधणं हेही खूप महत्त्वाचं आहे. या दृष्टीने हा समारंभ साऱ्या भारतासाठी महत्त्वाचा ठरावा! 

यातील वायूदलाच्या संचलनाचे नेतृत्व एक महिलेच्या हाती असणार आहे… स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी हे त्यांचं नाव. तर भारतीय आरमाराचं प्रतिनिधित्व कमांडर व्रत बघेल करणार आहेत. 

पंजाब रेजिमेंटचं राष्ट्रीय दिनांवेळचे राजपथावरील संचलन हे अतिशय नयनरम्य अभिमानास्पद वाटावे असेच असते. फ्रान्स मध्ये ‘बॅस्टील डे परेड’वेळी आपल्या भारतीय पायदळाचे प्रतिनिधित्व पंजाब रेजिमेंट करणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात या रेजिमेंटने २०१८ मध्ये आणि २०२३ मध्ये उत्कृष्ट पथकाचं पारितोषिक पटकावले आहे. यातील २०२३ च्या संचलनाचे नेतृत्व केले होते कॅप्टन अमन हनुमानराव जगताप यांनी!

अर्थातच फ्रान्स मधली ही जबाबदारीही या आपल्या कॅप्टन साहेबांच्या खांद्यांवर आहे आणि ते ती उत्कृष्टपणे निभावतील यात शंकाच नाही.

फ्रान्स मधील संचलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी कॅप्टन साहेबांविषयी (विशेषत: दै.सकाळ, पुणे) माहिती प्रसिद्ध केली होतीच. पण त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी स्वत: कॅप्टन अमन साहेबांनी स्वत:चा एक छोटा जीवनपट एका युट्यूब विडीओच्या माध्यमातून प्रसारीत केला आहे. हा विडीओ खूप प्रेरणादायी आहे. त्यात बालक अमन हे लष्करी गणवेशात सल्यूट करताना दिसतात एका छायाचित्रात. बालपणीचा त्यांचा देशसेवेचा ध्यास आज एका अभिमानास्पद वळणावर येऊन ठेपला आहे. 

पुण्यात जन्मलेल्या आणि नगरमध्ये शिक्षण घेतलेल्या कॅप्टन अमन हनुमानराव जगताप साहेबांनी अगदी ठरवून आपले लष्करी जीवन घडवले आहे. राजपथ संचलन हे एका अर्थाने त्यांच्या खूप आवडीचं आणि सवयीचं बनलं आहे, असेच आढळते.

एन.सी.सी. मध्ये विद्यार्थी कडेट असताना दिल्लीच्या राजपथावर एन.सी.सी. पथकाच्या पथसंचलनाचे नेतृत्व अमन साहेबांकडेच होते आणि त्यावर्षी त्याच पथकाला प्रथम क्रमांक मिळाला होता! पुढे सैन्यात भरती झाल्यावर त्यांची नेमणूक पंजाब रेजिमेंटमध्ये झाल्यावर त्यांनी संचलनाचे नेतृत्व करावे, हे जणू ओघाने आलेच! त्यांची शिस्त, पथसंचलनातील जोश, रूबाब, अचूकता, सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि नियंत्रण, त्यात अत्यंत रुबाबदार पंजाबी सैनिक, या गोष्टींमुळे त्यांच्या पथकाला सर्वश्रेष्ठ स्थान न मिळते तरच नवल! 

चौदा जुलैच्या पथ संचलनात भारताच्या पायदळाच्या संचलन पथकाच्या अग्रभागी अत्यंत अभिमानाने आणि रुबाबाने चालत नेतृत्व करणाऱ्या या मराठमोळ्या मर्दाला पाहताना प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेलच! 

कॅप्टन साहेब, आपल्याला शुभेच्छा ! जयहिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments