श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके 

अंक शिकवले जाताना ते एक ते दहा असेच शिकवले जातात. पण शून्य स्वतंत्र नाही शिकवला जात. शून्य असतेच….अध्याहृत ! त्याच्या पुढची पायरी म्हणजे दहाच्या पटीत शंभर पर्यंत. मानवी जीवनाचं सूत्रच जणू ही मोजदाद. आयुष्यमर्यादा शंभर आणि जन्माच्या एकातून आरंभ झालेला प्रवास शून्य नावाच्या अंतिमात विलीन होणं सुद्धा तेव्हढंच नैसर्गिक ! शून्याचा शोध तर जगाला भारताचीच देणगी. कुठलीही स्पर्धा, शर्यत सुरू करताना एक—दोन—तीन म्हटलं जातं. हा छोटासा प्रवास स्पर्धकांना भला भासतो. 

एरव्ही साध्या व्यवहारात एक तर दहा ते शून्य अशी गणती केली जात नाही. पण अवकाश मोहिमांमध्ये दहापासून मागे मागे सरणारा प्रवास शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागतो…हे भारताने चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या वेळी अनुभवले ! या आणि अशा अनेक मोहिमांच्या वेळी हे शून्य प्रत्यक्षात जगलेली एक महिला तीन सप्टेंबरला शून्यात विलीन झाली. एन. वल्लरमथी हे त्यांचं नाव. ‘ दिवसेंदिवस विकसित होत जाणारा, मोठा मोठा होत जाणारा चंद्र ‘ हा वल्लरमथी या नावाचा अर्थ….यापेक्षा आणखी कोणता योगायोग असू शकतो चांद्रमोहिमेत काऊंटडाऊन करणा-या व्यक्तीच्या बाबतीत? 

तमिळनाडूमधल्या अरियालूर मध्ये एक जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या वल्लरमथी यांनी माध्यमिक शिक्षण तमील भाषेत घेतले होते ! अंगभूत हुशारीच्या जोरावर त्यांनी इंजिनियरींग आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन मध्ये उच्च पदवी संपादन केली. एकोणीसशे चौ-याऐंशी साली वल्लरमथी इस्रो मध्ये आल्या. 

Insat 2A, IRS IC, IRS ID, and TES सारख्या अतिशय महत्त्वाकांक्षी अवकाश योजनांमध्ये त्या सहभागी होत्या. २०१२ मध्ये भारताने रडार इमेजिंग सॅटेलाईट -१ अर्थात ‘ रिसॅट ‘ हा भारताने स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केलेला उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या वल्लरमथी ! या कामाच्या शेवटच्या वर्षात वल्लरमथी दिवसातील फक्त पाच तास स्वत:साठी ठेवत. बाकी संपूर्ण वेळ प्रकल्पासाठी !  या कामगिरीबद्द्ल त्यांना दोन हजार पंधरा मध्ये ‘ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कारा ‘ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यासाठी वल्लरमथींना निवडण्यात येणे हे त्यांच्यासाठी आणि इस्रोमधील महिला शास्त्रज्ञांसाठी अभिमानाचे होते. 

अवकाशात प्रक्षेपक सोडण्यापूर्वीची वीस मिनिटे अतिशय महत्त्वाची आणि नाजूक असतात. इतक्या दिवसांची अथक मेहनत याच वीस मिनिटांमध्ये यशस्वी किंवा दुर्दैवाने अयशस्वी होणार असते. परंतू यातील शेवटची दहा-अकरा सेकंड्स खूपच तणावपूर्ण असतात. हाच तो काल….ज्यामध्ये जे काही शिल्लक राहिलं आहे ते सांगून मोहिम थांबवता येते..अन्यथा एकदा का शून्य झाले की आपल्या हातात काहीही नाही रहात ! हा काऊंटडाऊन उच्चारणारी व्यक्ती अतिशय प्रशिक्षित आणि बुद्धीमान असावी लागते. एरव्ही उलट आकडे उच्चारणे तसे सोपे काम असू शकते. पण एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मोहिमांमध्ये जराशीही चूक होऊन चालत नाही. आणि त्यात सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेत तर मानसिक तणाव किती मोठा असेल, याची कल्पना करवत नाही. हे आपण सर्वांनी चांद्रमोहिमेत अनुभवले असेलच. असो. माझ्यासारख्या किंवा आपणांपैकी ब-याच जणांना यातील तांत्रिक बारकावे माहित असण्याची शक्यता कमीच आहे. पण काऊंटडाऊन म्हणजे आय.पी.एल. सामन्यातील सामूहिक किंवा एखादा पूल सुरूंग लावून पाडण्याच्यावेळी केलेले काऊंटडाऊन..केवळ आकडे उच्चारणे नव्हे, हे मात्र समजते. 

चांद्रयान-३ मोहिमेवेळी हे काऊंटडाऊन करणा-या एक महिला होत्या, त्या ज्येष्ठ,अनुभवी अंतराळ शास्त्रज्ञ होत्या हे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जास्त समजले. आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा माणसाला कर्तव्यासाठी तहानभूक विसरायला लावते. वल्लरमथी यांना मोहिम यशस्वी झाल्यानंतर आणि आपले सूर्ययान आदित्य यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाल्यानंतर आपल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान निश्चितच झालेले असणार. यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी परलोकीची यात्रा आरंभ करावी, हा योगयोगच म्हणावा लागेल. ‘ एन.वल्लरमथी…आपला प्रवास निर्विघ्न पार पडो…तुम्हाला असलेलं अवकाशाचं वेड आता कदाचित तुम्हाला त्या विशाल,अनंत,अनाकलनीय अवकाशाची खरीखुरी सफर घडवत असेल. तुमच्या जाण्याचं काऊंटडाऊन खुद्द काळानेच म्हटलं असावं, असं वाटल्यावाचून राहवत नाही. 

… मॅडम  तुमच्या आत्म्यास सदगती मिळो, ही समस्त भारतीयांच्या वतीने अवकाशाच्या आणि सकल सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना. आपल्या भविष्यातल्या काऊंटडाऊनसाठी तुम्ही हव्या होतात..तुमच्या आवाजात आम्हांला दहा ते शून्य अंक नव्याने शिकल्यासारखं वाटलं !    

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments