?इंद्रधनुष्य? 

☆ जगातली सर्वात उंच गणेशमूर्ती ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.

गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे. 

थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.

थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली. 

संस्थेला ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात ४० हजार वर्ग मीटर जागा निश्चित करण्यात आली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली. सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आलं. यानंतर मग मूर्ती बसवण्यात आली. 

चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे. 

मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली. 

गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. 

गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments