श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-2 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा ‘भगोडा’ तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला.

गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास ‘मिलिटरी खाक्या’चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच ‘भगोडा’ असल्याची कबुली दिली. 

लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. 

त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. 

आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली.

अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.  

ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.   

गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले. 

इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग ‘भगोडा’ असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. 

मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, ‘जे जे होईल ते ते पाहावे’ असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले. 

या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा. 

CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे! 

त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. 

या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले. 

१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant  होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. 

गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले. 

या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.    

गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता ! 

– समाप्त – 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments