सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते. 

एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती.

आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली. 

एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन ‘फौजी’ लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!

मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले. 

त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, “रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे.”

त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या ‘रक्षणकर्त्या’ च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले. 

मी “थँक यू” म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, “Not at all, Ma’am” या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, “तुम्ही सैन्यदलात आहात का?” 

“होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे.  महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो.”

“अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते.”

सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील ‘आँखोंदेखी’ ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही). 

ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून! 

ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले! 

युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच  भावना आणि हेच  घनिष्ट  परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात!

मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. “सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments