सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

उद्योजक प्रदीप ताम्हाणे … प्रमोद सावंत ☆ संग्राहक मंजुषा मुळे ☆ 

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला.

शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची.

२६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी माध्यम शाळेत प्रदीपचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरचं वातावरण टिपीकल मध्यमवर्गीय असंच होतं. त्याकाळी टॅक्सीत बसणं म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असायची. वर्षातून दोन-तीन वेळाच टॅक्सीमध्ये बसण्याची संधी मिळे.

दादरच्या किर्ती महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून त्याने पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी देखील संपादन केली. त्याच दरम्यान एका कंपनीत नोकरी मिळाली पगार होता फक्त ८०० रुपये. संशोधनाची आवड असल्याने दुसऱ्या एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात ‘कलर इनचार्ज’ म्हणून नोकरी केली.

कालांतराने औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीत प्रदीपला नोकरी मिळाली. या कंपनीची शाखा लंडन मध्ये होती. तिथे प्रदीप काम करायचा. उत्तम पगार, मर्सिडीज कार, राहण्यासाठी अलिशान घर अशा सगळ्याच सुख-सुविधा पायाशी लोळण घेत होत्या. ही कंपनी मुख्यत: रेडीमिक्स पावडर तयार करत असे. सुरुवातीला फक्त १३ किलो पावडर भारतात विकली जायची मात्र प्रदीपच्या तंत्रज्ञानाने काही दिवसांतच हे प्रमाण ५ हजार किलोवर गेले. भारतातील सर्वांत मोठ्या ५ औषधी कंपन्यांना हेच तंत्रज्ञान पुरविले जाई. मात्र त्याची किंमत अफाट होती.

२५०० रुपये किंमतीची ती पावडर २५ ते ३० हजार रुपयांना विकली जाई. इतकी मोठी तफावत असे. ही तफावत या कंपन्यांच्या लक्षात येत होती. या विषयी त्यांनी प्रदीपला सांगितलं देखील. मात्र हे तंत्रज्ञान पुरविणारी ती जगातील एकमेव कंपनी होती आणि तिचा बॉस एक अमेरिकन होता, ज्याच्यासमोर प्रदीपचं काहीच चालत नव्हतं हे त्यांना माहित होतं.

खरंतर हा अमेरिकन बॉस प्रदीपचा चांगला मित्र होता. प्रदीपने शोधून काढलेल्या तंत्रज्ञानावर एके दिवशी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक देशांतील औषध निर्मिती करणारे उत्पादक, तंत्रज्ञ त्या व्याख्यानास आले होते. ४५ मिनिटाचं ते व्याख्यान त्या सगळ्यांना इतकं आवडलं कि “वेळेची मर्यादा तुम्हांला नाही तुम्ही बोलत रहा असे”, त्या व्याख्यानमालेच्या गोऱ्या अध्यक्षाने प्रदीपला सांगितले. तब्बल साडेतीन तासानंतर व्याख्यान संपले. व्याख्यानास उपस्थित असलेल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारले.

व्याख्यान संपल्यानंतर प्रदीप कॉफीचा मग घेऊन बॉसच्या बाजूला बसला. बॉसने पण प्रदीपची तोंड भरुन स्तुती केली. ही योग्य वेळ आहे आपल्या भारतीय औषध निर्मात्या कंपन्याच्या व्यथा सांगण्याची, हे हेरुन प्रदीप बॉसला म्हणाला, “आपण भारतात आपलं कलर कोटींगचं तंत्रज्ञान पुरवितो. मात्र त्याचा दर प्रचंड आहे. तो दर कमी…” हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच त्या साडे-सहा-सात फूट अमेरिकन बॉसने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटला. आणि प्रदीपच्या अगदी डोळ्याजवळ बोट नेऊन मोठ्याने जवळपास किंचाळलाच. “You have to pay for our technology’’. “तुम्हां भारतीयांना आमचं तंत्रज्ञान आम्ही सांगू त्या किंमतीत घ्यावंच लागेल”.

कोणाही भारतीयाला जिव्हारी लागेल असे ते शब्द ऐकल्यानंतर प्रदीपने २ मिनिटांचा अवधी मागितला. तो शांतपणे रिसेप्शनिस्ट जवळ गेला. तिच्याकडून एक कोरा कागद घेतला. एका ओळीत राजीनामापत्र लिहीले. आपल्या घराची, गाडीची चावी देऊन तो शांतपणे तिथून निघून गेला. मात्र मनाशी एक निश्चय होता. या अमेरिकन कंपनीला टक्कर देणारी स्वत:ची भारतीय कंपनी सुरु करण्याची.

तो भारतात आला. आई, बाबा आणि पत्नीला सारं काही सांगितलं. घरच्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला आणि घरातल्या किचनमध्येच सुरु झाली प्रयोगशाळा. रात्री सगळ्यांची जेवणे उरकल्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ही प्रयोगशाळा चाले. तब्बल दीड महिन्यांचा अथक संशोधनानंतर यश मिळालं आणि रेडिमिक्स पावडरचं तंत्रज्ञान विकसित झालं.

हे तंत्रज्ञान त्या अमेरिकन औषधाच्या तुलनेत १० पटीने स्वस्त होतं. बाजारपेठेत औषधी कंपन्यासोबत ओळख होतीच. अशाच एका कंपनीच्या मालकाने ताम्हाणेंची ती रेडिमिक्स पावडर पाहिली आणि ताम्हाणेंना मिठीच मारली. एवढ्या स्वस्तात संपूर्ण भारतीय बनावटीची ती रेडीमिक्स कोटींग पावडर म्हणजे अविश्वसनीय बाब होती. त्याने तात्काळ ५ किलो पावडरची ऑर्डर दिली.

मात्र आपल्याकडे एवढी लहान ऑर्डरसुद्धा पूर्ण करण्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही असं ताम्हांणेंनी सांगितलं. “तुम्ही जर आता ही ऑर्डर पूर्ण नाही करु शकलात तर आयुष्यात पुढे या क्षेत्रात काहीच करु शकणार नाही”. कंपनीच्या त्या मालकाचे शब्द ताम्हाणेंच्या जिव्हारी लागले. त्यांनी चंग बांधला. आणि ती ऑर्डर पूर्ण केली. पहिल्याच वर्षी त्यांची दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

काही दिवसांनी त्यांना एक व्यावसायिक भागीदार मिळाला. खरा तर तो एक विकासक होता आणि त्याला झटपट विक्री करुन पैसे पाहिजे होते. ताम्हाणेंच्या व्यवसायात संशोधन करुन उत्पादन निघण्याची प्रक्रिया होती ज्यास वेळ लागणार होता. तेवढा संयम नसल्याने अर्ध्यातच त्या भागीदाराने सोबत सोडली. कंपनी विकावी लागली.

मात्र ताम्हाणेंनी धीर न सोडता १९९७ साली विनकोट्स कलर्स ऍण्ड कोटींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी उभारली. अंबरनाथला कारखाना सुरु केला. आज ही कंपनी जगातील ५० हून अधिक देशांमधील औषध निर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन पुरविते.

मनुष्यबळाकडे ताम्हाणेंचे विशेष लक्ष असते. कामगार हा कार्यक्षम रहावा यासाठी अंबरनाथ स्टेशन ते कारखाना अशी कामगारांना ने-आण करण्यासाठी रिक्षासेवा त्यांनी चालू केली होती. संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर कामगाराला एक मिनीट देखील थांबविले जात नाही. त्याने जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवला पाहिजे याकडे कटाक्ष असतो. एखादा कामगार अडचणीत असेल तर कंपनी त्याच्यामागे भरभक्कम उभी राहते.

एके काळी पत्र्याच्या घरात राहणारे कामगार स्वत:च्या टूबीएचके फ्लॅटमध्ये राहतात. जवळपास प्रत्येकाकडे किमान मोटरसायकल आणि कार आहेच. ताम्हाणेंकडे आज ५५ कामगार कार्यरत आहेत मात्र ५०० कामगारांच्या दर्जाचे काम करण्याची कार्यक्षमता त्यांनी अंगी जोपासली आहे.

अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत.

 

– प्रमोद सावंत

८१०८१०५२३२

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments